(माझा आजचा लेख:)
स्वधर्माभिमान हवाच..!
परिस्थिती बदलेल काय?
आज २०१६ या “कॅलेंडर इयर” चा अखेरचा दिवस.उद्यापासून २०१७ हे नवीन वर्ष सुरु होईल.अर्थात हे नूतन वर्ष इंग्रजी कॅलेंडरनुसार असून हिंदू नववर्ष गुढीपाडव्याला सुरु होत असल्याने १ जानेवारी हा दिवस नववर्षारंभ म्हणून साजरा केला जावा किंवा नको यावर अनेक मत-मतांतरे आहेत.उद्या पाश्चात्य संस्कृती आणि दिनदर्शिकेनुसार नवीन वर्ष सुरु होत आहे.हिंदू सणांवर टीका करायची, आपल्या पूर्वापार चालत आलेल्या आणि विज्ञानाला धरून असलेल्या परंपरा मोडीत काढायच्या,हिंदू सण-उत्सवांवर टीका करायची आणि पाश्चात्य संस्कृती जोपासायची हा प्रकार आजकाल जोरात चालू आहे.हिंदूंच्या प्रथा अंधश्रद्धा ठरवायच्या,हिंदू सणांना प्रदूषण,पैशांची नासाडी अशी कारणे देऊन निर्बंध घालायचे.ख्रिसमसच्या रात्री मात्र सांताक्लॉज येणार म्हणून आकाशाकडे डोळे लावून वाट पहायची.ही अंधश्रद्धा नव्हे काय? या असल्या किरकोळ गोष्टींमुळे हिंदू धर्माला काडीमात्र फरक पडणार नाही.हिंदू धर्म महान होता,महान आहे आणि राहील,पण सगळे निर्बंध,कायदे,नियम,अटी फक्त हिंदूंच्या सणांनाच आहेत काय?
उद्या हिंदू नववर्षारंभ नसला तरी जागतिक कॅलेंडर मात्र बदलणार आहे.त्यामुळे हा जागतिक नववर्षारंभ साजरा करण किंवा त्याच्या शुभेच्छा देणं चुकीचं निश्चितच नाही.असं असलं तरी नववर्षारंभ साजरा करण्याच्या नावाखाली मनमानी करणे,दारू पिऊन धिंगाणा घालणे,रात्रभर हिडीस नृत्य करणे,ड्रग्जच्या नशेत बेधुंद होणे हे निश्चितच बंद व्हायला हव.१ जानेवारीला नववर्षारंभ साजरा करण्यास विरोध कोणाचाच नाही.विरोध हिंदू संस्कृती विसरून,हिंदू संस्कृती मोडीत काढून किंवा तिच्यावर टीका करून आणि तिला अंधश्रद्धा ठरवून पाश्चात्य संस्कृती स्वीकारण्यास आहे.जो हिंदू आपल्या धर्माच्या सर्व प्रथा परंपरांचा यथोचित सन्मान करतो,आपले सण-उत्सव जल्लोषात साजरे करतो,आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगतो आणि हिंदू धर्म जोपासतो त्याने उद्या जागतिक नववर्षारंभ म्हणून जल्लोष करायला आणि आप्तेष्टांना शुभेच्छा द्यायला हरकत नाही.अर्थात हा जल्लोष हिंदू संस्कृतीला शोभेल असाच आणि मर्यादित असावा.
हिंदू धर्म कधीच इतर धर्मांचा अपमान करण्याची शिकवण देत नाही.हा धर्म विश्वव्यापी आहे.हिंदू धर्मग्रंथातसुद्धा इतर धर्मांच्या बाबतीत अपमानास्पद मजकूर नाही.इतर धर्मांचा अपमान करून हिंदू धर्म मोठा झालेला नाही.इतर धर्माच्या योग्य आणि विज्ञानाला धरून असलेल्या प्रथांचा आदर केला पाहिजे हे खरं,पण जो आपल्या धर्माचा मान राखू शकत नाही तो दुसऱ्या धर्माचा मान कसा राखणार? आम्ही आधी हिंदू आहोत.हिंदू असल्याचा आम्हाला अभिमान आहे.“गर्वसे कहो हम हिंदू है” ही भूमिका मान्य असेल तर तुम्ही खुशाल दुसऱ्या प्रथा-परंपरांचा सन्मान करा.त्यास कोणाचाही आक्षेप नाही.हिंदू धर्माला तुच्छ लेखून जर कोणी इतरांच्या धर्माचा कौतुक सोहळा करत असेल तर तर मात्र आम्ही कदापि सहन करणार नाही.अशा बाटग्या लोकांना धडा शिकवायलाच हवा.
उद्या इंग्रजी नववर्षारंभ असला तरी कॅलेंडर सोडून काय बदलणार आहे? हिंदू नववर्षारंभ गुढीपाडव्याला होतो.त्यादिवशीपासून ऋतुमान बदलत.त्याला शास्त्रीय आधार आहे.तो निसर्गचक्राचा आरंभ असतो.इंग्रजी नववर्षारंभ हा १ जानेवारीला असतो आणि त्याला शास्त्रीय आधार नाही.फक्त कॅलेंडर बदलून परिस्थिती बदलेल काय? तरीही जागतिक कॅलेंडर बदलणार म्हणून हा नववर्षारंभ स्वीकारताना स्वधर्माचा अनादर होता कामा नये.स्वधार्माभिमान हवाच..!हे जर मान्य असेल तर उद्या खुशाल नववर्षारंभ साजरा करा.नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
जय महाराष्ट्र..!