(माझा आजचा लेख:)
पडदा फाटला
सत्य झाकता येत नाही हेच खरे...!
नुकत्याच हाती आलेल्या महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालानुसार महाराष्ट्रात शिवसेनेने प्रचंड यश मिळवत आहे.मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट जागांवर विजय मिळवत शिवसेनेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.शिवसेनेची ही वाटचाल नक्कीच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे.विशेष बाब म्हणजे शिवसेना पक्षप्रमुखांनी या निवडणुकीची जबाबदारी शिवसैनिकांच्या खांद्यावर सोपवलेली होती.त्यामुळे या निवडणुकांच्या प्रचारात शिवसेना पक्षप्रमुख आणि युवासेना प्रमुख उतरलेले नव्हते.प्रचाराची धुरा ही स्थानिक पदाधिकारी,संपर्कप्रमुख आणि शिवसैनिकांनीच सांभाळली होती.या निवडणुकीत मिळालेले यश हे शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचे शिवसैनिकांच्या निष्ठेचे प्रतीक आहे.शिवसेनेच्या या विजयाची तुलना इतर कोणत्याही पक्षाने मिळवलेल्या विजयाशी करता येणार नाही.
या निवडणुकांत सरकारची तसेच विरोधी पक्षांची जनमत चाचणी होणार होती.शिवसेना सत्तेत सहभागी आहे.सत्तेत असूनही सरकारच्या चुकीच्या निर्णयांना ठाम विरोध करण्यात शिवसेना अग्रेसर असते.शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी नसून जनतेशी आहे.शिवसेना सरकारमध्ये असली तरी सरकारजमा झालेली नाही.शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी घेतलेली ही स्पष्ट आणि रोखठोक भूमिका आहे.याच भूमिकेवरून शिवसेनेवर सातत्याने टीका होत असते.शिवसेनेची ही भूमिका दुटप्पीपणाची असून महाराष्ट्रातील जनता ती स्वीकारणार नाही आणि याचा शिवसेनेला निवडणुकीत फटका बसेल असे चित्र सर्वांनीच निर्माण केले होते.महाराष्ट्रातील जनतेने मात्र शिवसेनेच्या बाजूने कौल देत शिवसेनेच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांना चपराक लगावली आहे.या निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्राची जनता शिवसेनेच्या बाजूने असल्याचे सिद्ध झाले आहे.
पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या नोटबंदी निर्णयानंतर ही पहिलीच जनमत चाचणी ठरली.भाजपच्या म्हणण्यानुसार ९३% जनता मोदींच्या पाठीशी असल्याने मोदींच्या निर्णयात त्रुटींमुळे गैरसोयींबद्दल शिवसेनेने बोलणं चुकीचं आहे.ही भूमिका राज्यातील जनतेला मान्य नाही.त्यामुळे जनता भाजपला कौल देईल.निवडणुकांचे निकाल पाहता भाजपला या निवडणुकीत प्रचंड यश मिळालेले आहे.भाजपचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक विजयी झालेले आहेत.हे चित्र जितकं स्पष्ट आहे तितकाच मिळालेल्या यशाचं चित्र स्पष्ट आहे.त्यामुळे जनतेला शिवसेनेची भूमिका मान्य आहे हेच दिसून येते.जनतेचा केवळ पाठिंबा असता आणि शिवसेनेला विरोध असता तर या निवडणुकीत भाजपला यापेक्षाही दुप्पट यश मिळाले असते आणि शिवसेनेला निम्मे यश मिळाले असते.प्रत्यक्षात असं घडलं नाही.
या निवडणुकांच्या निकालातून एक निष्कर्ष येईल.तो असा की मोदींची लाट आहे,मोदींना जनतेचा पाठिंबा आहे,जनता भाजपच्याच पाठीशी आहे आणि मोदी जे करतील ते जनतेला मान्य असून जनता भाजपलाच देईल असे एकंदरीत जे चित्र निर्माण केलं ते साफ खोटं आहे.मोदींची लाट ही प्रामुख्याने प्रसारमाध्यमे आणि सोशल नेटवर्किंग साईट्स पूर्ती मर्यादित आहे.मतदानावर मात्र त्या लाटेचा प्रभाव नाहीये.असा निष्कर्ष काढण्यामागील प्रमुख कारण म्हणजे शिवसेनेला जनतेच्या आशीर्वादाने मिळालेलं भरघोस यश.शिवसेना सरकारमध्ये असून सरकारच्या भूमिकांना विरोध कसा करते? शिवसेना सरकारमधून बाहेर पडून सरकारला का विरोध करत नाही? शिवसेनेची सरकारच्या निर्णयाला विरोध भूमिका केवळ राजकीय स्वार्थासाठी आहे का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना या निकालाने शिवसेनेची ताकद आणि लोकमान्यता दिसली असेलच.मोदींना विरोध म्हणजे देशद्रोह असं चित्र निर्माण करणाऱ्यांना या निकालाने चांगलाच धडा शिकवलेला आहे.तेंव्हा आंधळ्या मोदीसमर्थकांनी "कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही" हे लक्षात घ्यावं.
राज्यातील प्रसारमाध्यमांनी मोदिनामाचा जप करण्याऐवजी शिवसेनेच्या भूमिकेचा अभ्यास करून त्यातले तथ्य शोधले असते आणि शिवसेनेच्या भूमिकेला न्याय दिला असता तर आज शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजपच्या दुप्पट असते.ही आजची पत्रकारिता निःपक्षपाती मुळीच राहिलेली नाही. शिवसेनेने काहीही केलं तरी त्यावर टीकेचा भडीमार करायचा आणि इतरांनी काहीही केलं तरी त्यांचा उदोउदो करायचा हा दुजाभाव कशासाठी? असो.सत्य शोधण्यापेक्षा जनतेच्या डोळ्यासमोर मोदीलाटेचा पडदा निर्माण करण्यातच आजकालचे पत्रकार धन्यता मानत आहेत.नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालामुळे हा पडदा फाटला आहे.महाराष्ट्रातील सुज्ञ आणि सुजाण जनतेने तो फाडला आहे.सत्य झाकता येत नाही हेच खरे...!
जय महाराष्ट्र..!
No comments:
Post a Comment