Saturday, 17 December 2016

"वाघगर्जना”

(माझा आजचा लेख:)

नोटाबंदीची झळ जनसामान्यांनाच..!

भाबड्या जनतेची अपेक्षा..!

पंतप्रधान मोदींच्या घोषणेनुसार ५०० आणि १००० च्या चलनातून बाद झालेल्या नोटा बदलण्यास आता केवळ १३ दिवस उपलब्ध आहेत.नोटाबंदीस जवळपास ४० दिवस उलटले असले तरी देशातील जनता अजून बँका आणि एटीएमच्या रांगेतच उभी आहे.मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नोटाबंदीची झळ सोसत पैसे बदलण्यासाठी अथवा आपला पगार घेण्यासाठी हालअपेष्टा सोसत रांगेत उभी असलेली सामन्य जनता नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल या आशेने मोदींच्या पाठीशी आहे.प्रत्यक्षात मात्र भोळ्या प्रजेची ही अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीये.यामागील महत्वाचं कारण म्हणजे आजही देशभरात कित्येक हजार कोटी रक्कम काळ्या पैशाच्या स्वरूपात पकडली जात आहे.महत्वाचं म्हणजे ही रक्कम जुन्या नोटांच्या नव्हे तर नवीन नोटांच्या स्वरूपात असल्याचं चित्र दिसतंय.याचा नेमका अर्थ काय आहे?

"अच्छे दिन" येतील या भाबड्या आशेने जनता मोदींच्या ५० दिवस त्रास करण्याच्या आवाहनास प्रतिसाद देताना दिसली खरी मात्र आता जनतेचा धीर सुटत चाललेला आहे.नोटबंदीचा फास आवळूनही सापडत असलेला पाण्यासारखा काळा पैसा,काळा पैसा पांढरा करताना जाळ्यात अडकलेले कर्मचारी पाहून जनता हताश झाली आहे.काळ्या पैशाच्या स्वरूपातील जुन्या नोटा बदलून नव्या नोटा मिळवणारे आणि त्यांना नोटा बदलून देणारे अधिकारी पाहून जनता साफ निराश झालेली आहे.अवैध मार्गाने नोटा बदलून देण्यात चक्क आरबीआयपासून ते मोठमोठ्या बँकापर्यंत रॅकेट सुरु असून त्यात अधिकारी वर्गाचाही समावेश आहे.हे सर्व सामान्य जनतेच्या कल्पनेपलीकडील आहे.त्यामुळे हे सगळं पाहताना जनतेच्या मनात प्रश्नांचं वादळ घोंघावतंय.सामान्य जनतेला गरजेपुरती रक्कमही उपलब्ध होणं अवघड झालेलं असताना ज्या रकमांचे आकडे लिहिणं सोडाच,पण वाचणं किंवा लक्षात ठेवणंही सामान्य जनतेला कठीण वाटत एवढ्या रकमेच्या नोटा भ्रष्ट लोकांनी कशा बदलून घेतल्या? त्यात सामील असणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या नेमकी किती? "सापडला तो चोर" या न्यायाने पकडलेल्या गुन्हेगारांना शिक्षा मिळेलच,पण जे सापडणार नाहीत त्यांचं काय? ते सहीसलामत सुटले.याचा अर्थ नोटबंदीचा निर्णय फसला का? असे एक ना अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहेत.याची उत्तरे कोण देणार?

मोदींच्या आवाहनानुसार अजून जवळपास १२ दिवसांनी जनता त्रासमुक्त होण आणि "अच्छे दिन" सुरु होण अपेक्षित आहे.सध्या या निर्णयाला महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटलेला असून काळ्या पैशाला आळा बसण्याची चिन्हं दिसत नाहीयेत.मग आगामी दहा-बारा दिवसात अशी काय जादू होणार आहे? भ्रष्ट लोकांनी दिलेल्या मुदतीच्या आधीच कोट्यावधी रुपयांचा काळा पैसा पांढरा करून घेतला किंवा नवीन नोटांच्या स्वरुपात रुपांतरीत केला.मग नोटाबंदीचा काय उपयोग? उलट नव्या २००० च्या नोटांमुळे हे पैशांचे ढीग साठवण सोपं झालं असल्याच दिसत.म्हणजे नोटाबंदीची झळ फक्त जनसामान्यांनाच..! हा प्रकार चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा आहे.त्यामुळे या बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी नोटाबंदीचे नेमके फलित काय? हा यक्षप्रश्न आहे.

नोटाबंदीचा निर्णय यशस्वी झाला तर सर्वांनाच आनंद आहे.आगामी काळात या निर्णयाचा निकाल लागेल आणि त्याचे परिणाम समोर येतील.हे परिणाम चांगलेच असावेत आणि जनसामन्यांची भाबडी आशा सार्थ ठरवणारे असावेत अशीच आमची इच्छा आहे.नोटाबंदीचा निर्णय फसल्यास संपूर्ण जबाबदारी घेण्यास आपली ५६ इंचाची तथाकथित छाती घेऊन पुढे येण्याची तयारी पंतप्रधान मोदींनी दाखवली आहे,मात्र हा निर्णय फसल्यास नुसती जबादारी घेऊन काय फायदा? देशाची झालेली आर्थिक हानी आणि सामान्य जनतेने सोसलेल्या त्रासाची,तसेच गमावलेल्या प्राणाची भरपाई कशी होणार? या सगळ्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मोदींनी जनतेच्या मनातील गोष्ट समजून घ्यावी आणि हा गुंता सोडवावा हीच भाबड्या जनतेची अपेक्षा..!


जय महाराष्ट्र..!






No comments:

Post a Comment