Saturday, 8 October 2016



"वाघगर्जना"


(माझा आजचा लेख:)


सीमोल्लंघन म्हणजे काय?


विजयाचं सोनं लुटा..!


दसरा म्हणजेच विजयादशमीचा उत्सव आता जवळ येऊन ठेपलेला आहे.याच दिवशी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवलेला होता.त्याचं प्रतिक म्हणून नवरात्रोत्सव पर्वात ठिकठिकाणी रामलीला सादर केली जाते.तसेच दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करून रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा केला जातो.आज लंकापती रावण नसला तरी भ्रष्टाचार,अत्याचार,दहशतवाद, गुन्हेगारी,महागाई,दुष्काळ,दारिद्य्र,रोगराई,कुपोषण आणि अंधश्रद्धा ही दहा तोंडे असलेला समस्यारूपी रावण आजही जिवंत आहे.हा रावण आजही कित्येकांचे बळी घेत आहे.लंकानरेश रावणाला श्रीरामांनी यमसदनी धाडून त्यावर विजय मिळवलेला होता.आजच्या काळात प्रभू रामचंद्रांची भूमिका कोणी एकटा बजावू शकणार नाही.त्यासाठी एकजूटच हवी.

दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे.सर्वत्र गावाची वेस ओलांडून आई भवानीचा उदो उदो करत विजयादशमी साजरी केली जाते.याच दिवशी भवानीमातेने महिषासुराचा वध केला होता.याच दिवशी पांडवांनी त्यांची शस्त्रे शमीच्या झाडावरून उतरवली होती.त्यामुळे दसऱ्याला शस्त्रपूजनही करतात.इतकच नव्हे तर इतर साहित्याच,वाहनांच अथवा वास्तुंच पूजन केल जात.दसऱ्याला आपट्याची पाने सोनं म्हणून वाटण्याची प्रथा आहे.आपट्याच्या पानांनाही दसऱ्याच्या दिवशी सोन्याइतक महत्व असतं.साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दसऱ्याला सर्वत्र विजयोत्सव साजरा केला जातो.

दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची प्रथा खूप प्राचीन आहे.ती आजही टिकून आहे आणि सदैव राहील,पण सीमोल्लंघन म्हणजे काय? कधी केलाय विचार? सीमांच उल्लंघन म्हणजे सीमोल्लंघन.संस्कृती आणि प्रथा-परंपरा म्हणून या दिवशी गावाची सीमा ओलांडली जाते.ही परंपरा जपणं आपलं काम आहे,पण दसऱ्याच्या दिवशी खरच आपल्या एखाद्या सीमेच उल्लंघन केलं तर? ज्याप्रमाणे रामाने रावणावर विजय मिळवला त्याप्रमाणे आपण आपल्यातील एका दुर्गुणावर विजय मिळवला तर? पांडवांनी जशी दसऱ्याला आपली शस्त्रे शमीच्या झाडावरून उतरवली तसेच आपण आपले एखादे कला अथवा सद्गुणरुपी शस्त्र जे व्यापामुळे बाजूला पडले आहे ते पुन्हा उपयोगात आणले तर? किंवा ते उपयोगात असल्यास त्याला अधिक धार लावली तर? सीमोल्लंघनाचा खरा अर्थ असा आहे.

प्रत्येकाला आपल्या सीमा-मर्यादा माहिती असतात.उदाहरण घ्यायचे झाल्यास साधारणतः सर्वचजण उजव्या हाताने लिखाण करतात.अगदी कमी लोक डाव्या हाताचा वापर लिखाणासाठी करतात.दोन्ही हातांनी लिखाण करू शकणारे या जगात किती लोक असतील? लाखात एक? किंवा कोटीत एक म्हणा.आपण हे का आत्मसात नाही करू शकत? काही कारणाने जर उजवा हात निकामी झाला तर डाव्या हाताचा वापर करून लिखाण किंवा कामे करता येतील.आता असे दुर्दैव प्रत्येकाच्या वात्यालायेत नाहीच हेही सत्य आहे.तरीही आपली एक मजबूत बाजू म्हणून त्याचा आपल्याला नक्कीच आयुष्यभर फायदा होईल. त्याचप्रमाणे एखाद्याला लागलेले व्यसन सुटत नसेल तर त्या मर्यादेच उल्लंघन त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर करायला हरकत नाही.एखाद्याला स्टेजवर जाऊन बोलता येत नसेल तर या भीतीवर मात करता येईल.एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विषय अवघड वाटत असेल तर त्याचा अभ्यास करून तो सोपा करता येईल.इतर एखादा अवगुण असल्यास तो या मुहूर्तावर दूर करता येईल.असे सीमोल्लंघन करण्याचा संकल्प प्रत्येकाने केल्यास प्रत्येकाचाच उत्कर्ष होईल आणि प्रत्येकाला यश,विजय मिळेल.आमच्याबद्दल सांगायचे झाल्यास आम्ही डाव्या हाताने लिखाण करण्याची कला आत्मसात करण्याचा संकल्प केला आहे.

नुसतं गावाची सीमा ओलांडून किंवा रावणाचे पुतळे जाळून परिस्थिती बदलणार नाही.सगळ सुजलाम्-सुफलाम व्हावं, आपल जीवन भयमुक्त,सुखी,आनंदी आणि समाधानी व्हावं अस सगळ्यानांच वाटत.हे व्हायचं असेल तर देशातलं सरकार बदलून उपयोगाच नाही.सरकार फक्त सुविधा पुरवत असत. भ्रष्टाचार,अत्याचार,दहशतवाद, गुन्हेगारी,महागाई,दुष्काळ,दारिद्य्र,रोगराई,कुपोषण आणि अंधश्रद्धा हे सगळ जर समाजातून मुळासकट नष्ट करायचं असेल तर प्रत्येकाने सुपंथावर चालण्याचा संकल्प करावा.सगळच बरोबर आणि उत्तम करायला आपण देव नाहीत,संतही नाहीत,पण वाईट वागायला आपण राक्षसही नाहीत.प्रत्येकाने दुसऱ्यांना सुधरवत बसण्यापेक्षा स्वतःमध्येबदल करावा.एक एक सद्गुण आत्मसात करण्याचा प्रतिवर्षी दसऱ्याला संकल्प करावा.एक दुर्गुण किंवा कमतरता दूर करून एक सद्गुण आचरणात आणला तर आयुष्यात आपल्याला खूप मोठी मजल मारता येईल.आयुष्य हे असच जगायचं आहे.त्यामुळे यंदाच्या दसऱ्यापासून असं सीमोल्लंघन करा आणि दुर्गुणांवर,मर्यादांवर मिळवलेल्या विजयाच सोन सुख-समाधानाने लुटा.विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!



जय महाराष्ट्र..!

No comments:

Post a Comment