Friday, 9 November 2018

युवासेनेची स्थापना फक्त आदित्य ठाकरेंच्या राजकारण प्रवेशासाठी?



लेखक : शशांक देशपांडे 

(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )
“वाघगर्जना: दिवाळी विशेष लेखमाला”

दिवस सातवा – लेख चौदावा

युवासेनेची स्थापना फक्त आदित्य ठाकरेंच्या राजकारण प्रवेशासाठी?

शिवसेनाप्रणीत युवासेनेच्या स्थापनेला नुकतीच आठ वर्षे पूर्ण झाली. १७ ऑक्टोबर २०१० रोजी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत युवासेनेची स्थापना झाली. युवासेनाप्रमुखपदी आदित्य ठाकरे यांची निवड झाली. शिवसेनाप्रमुखांनी आदित्य ठाकरेंना तलवार सुपूर्द करून आशीर्वाद दिले. ठाकरेंची तिसरी पिढी शिवसेनेच्या राजकरणात आली. साहजिकच त्यामुळे शिवसेनेवर घराणेशाहीची टीका सुरू झाली. तसेच अनेकांनी “उद्धव ठाकरेंच्या तुलनेने उशिरा झालेल्या राजकीय प्रवेशाची चूक आदित्य ठाकरेंच्या बाबतीत टाळण्यासाठी शिवसेनेने युवासेनेची स्थापना केली” अशीही टीका केली.  मुळात युवासेनेची स्थापना फक्त आदित्य ठाकरेंच्या राजकारण प्रवेशासाठी झाली नाही, तर ती युवावर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी झाली. हिंदुस्थानात युवावर्गाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. युवावर्ग दिशाहीन झाला तर आगामी काळात देशाच वाटोळं होईल. त्यामुळे युवावर्गाला योग्य दिशा देण्यासाठी शिक्षण, आरोग्य व रोजगार हे मुद्दे घेऊन “लेट्स टॉक डेव्हलपमेंट, नॉट पॉलिटिक्स” हे ब्रीद घेऊन युवासेनेची स्थापना झाली.

अनेक पक्षांच्या युवा संघटना आणि विद्यार्थी संघटना आहेत. या संघटनांचे बहुतांश पदाधिकारी मात्र अगदी ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतात. हे वय तरुण वर्गाच्या वयोमर्यादेपलीकडील असल्याने अशा पदाधिकार्‍यांना युवावर्गाचे प्रश्न सहजतेने समजत नाहीत. युवकांना दिशा देण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याच वयोगटातील आणि त्यांच्याच भाषेत बोलू शकणारा नेता हवा हे लक्षात घेऊन केवळ २० वर्षे वयाच्या आदित्य ठाकरेंना “युवासेनाप्रमुख” पद देण्यात आलं. असं देशातील इतर कोणत्याही संघटनेत घडत नाही. युवासेनेच्या स्थापनेनंतर आदित्य ठाकरेंनी युवकांसाठी विविध कार्यक्रम हाती घेतले. विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण, महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण, एसएससी आणि एचएससी सारख्या शैक्षणिक बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण, “बेस्ट ऑफ फाइव्ह” सारख्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहणं, एचएससी परीक्षेच्या काठीण्यपातळीवर भाष्य करून विद्यार्थ्यांची बाजू मांडण इत्यादि अनेक कामे युवासेना विद्यार्थ्यांसाठी करत असते. २०१६ मध्ये युवासेनेने “केजी”पासून “पीजी” पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्न व मागण्यांना वाचा फोडण्यासाठी विराट “केजी टू पीजी महामोर्चा” काढून सरकारला जाग आणली होती.

विद्यार्थ्यांना खेळाची मैदाने, क्रीडासाहित्य, उपहारगृह, वसतिगृह, स्वच्छतागृह,पिण्याचे शुद्ध पाणी, सुसज्ज वाचनालय इत्यादि मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी युवासेना सातत्याने झटत असते. प्राध्यापक संपासारख्या गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांची फरपट होऊ नये यासाठी युवासेना सातत्याने विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करते. या सर्व कामांच्या बळावर युवासेनेला विद्यापीठ सिनेट निवडणुकीत प्रचंड यश मिळालं. युवसेनेने आजपर्यंत २ वेळा मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक लढवली. पहिल्या वेळेस युवसेनेला १० पैकी ८ जागांवर विजय मिळाला होता, तर याच वर्षी झालेल्या दुसर्‍या निवडणुकीत शिवसेनेने भाजपप्रणीत अभाविप आणि मनविसे यांना अस्मान दाखवत १० पैकी १० जागांवर भगवा फडकावला. यासह इतर अनेक सिनेट निवडणुकांत युवासेनेला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा प्रचंड यश मिळालं. युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने केलेल्या भरीव कार्याची ही पोचपावतीच म्हणावी लागेल.



हिंदुस्थानात फुटबॉलचा खेळ रुजवण्यासाठी आदित्य ठाकरे विशेष प्रयत्न करत आहेत. मुंबईत फुटबॉलसाठी आवश्यक अशी मैदाने उपलब्ध करून त्यावर विविध स्तरांवरील प्रतिष्ठित संघांचे सामने आयोजित करण्यात त्यांचा पुढाकार आहे. “मुंबई नाईटलाइफ” संकल्पना राबवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील जिजामाता उद्यानात “हंबोल्ट पेंग्विन” आणण्याची त्यांची संकल्पना अत्यंत यशस्वी झाली आहे आणि त्यामुळे महापालिकेचा महसूल सुद्धा कित्येक पटींनी वाढला आहे. विद्यार्थ्यांना दप्तराचं ओझं वहावं लागू नये यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्नशील आहेत. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत “टॅब” वाटपाच्या उपक्रमात त्यांचा पुढाकार आहे. प्रतिवर्षी बारावी विज्ञान शाखेचे लाखो विद्यार्थी “एमएच सीईटी” या महत्वाच्या आणि भविष्याची दिशा ठरवणार्‍या परीक्षेला सामोरे जात असतात.  त्यांना सरावासाठी युवासेनेमार्फत “वायएस सीईटी” या मोफत सराव परीक्षेचे आयोजन आदित्य ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली केलं जातं. या परीक्षेचा “सोल्युशन सेट” परीक्षेनंतर तत्काळ उपलब्ध करून दिला जातो तसेच त्यातील उत्तरांच विस्तृत स्पष्टीकरण देणारे आणि संकल्पना समजाऊन सांगणारे व्हिडिओ संच सुद्धा पुर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जातात.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात युवावर्गाला व्यायामासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. परिणामी आरोग्यविषयक तक्रारी उद्भवतात. हा मुद्दा लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी मोफत “ओपन जीम” ठिकठिकाणी उभारल्या आहेत. मुली व महिलांची सुरक्षा हा आजचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. यावर भरीव उपाय म्हणून युवासेनेच्या पुढाकाराने महिला व मुलींना आत्मरक्षणाचे धडे मोफत कार्यशाळा आयोजित करून दिले जात आहेत. मुंबईत ठिकठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात युवासेनेचा पुढाकार आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिक हानिकारक आहे व ते नष्टही होत नाही हे आपण जाणतोच. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी लागू करण्यात आदित्य ठाकरेंची प्रमुख भूमिका आहे.

युवानेता म्हणून नुसती चमकोगिरी आणि दादागिरी न करता विद्यार्थी व युवकांसाठी युवाहृदयसम्राट, युवासेनाप्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवसेना भरीव काम करत आली आहे व यापुढेही करेल. युवासेनेची स्थापना फक्त आदित्य ठाकरेंच्या राजकारण प्रवेशासाठी झाली” अशी टीका करणार्‍यांना आदित्य ठाकरेंनी त्यांच्या कृती व कार्यातून चोख उत्तर दिलेलं आहे, हेच युवासेनेच्या आणि आदित्य ठाकरेंच्या आजपर्यंतच्या वाटचालीवरुन स्पष्ट होतं.              


             लेखक : शशांक देशपांडे 
(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )

2 comments:

  1. Adity sahebanche kary chimahati vaggajanache madamatun vachayala milali thanks gohead shivsena

    ReplyDelete