Sunday, 13 March 2016


“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

बॉलीवूडच्या खिलाडीचे सामाजिक भान..!

विशाल मनाचा श्रीमंत..!

कालच एका मराठी चित्रवाहिनीवर बॉलीवूडचा “खिलाडी” म्हणून प्रसिध्द असलेला अभिनेता अक्षयकुमारला एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले गेले होते.यावेळी अक्षयकुमारने समाजातील विविध समस्या आणि घटनांबद्दल त्याची मते मांडली.या सर्व मतांवरून अक्षयकुमारचे सामाजिक भान आणि समाजाप्रती असलेली आस्था दिसून येते.

सध्या महाराष्ट्राला दुष्काळाने ग्रासलेले आहे.त्यामुळे शेतकरी बांधव आत्महत्येचा दुर्दैवी मार्ग नाईलाजाने स्वीकारत आहेत.शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे अधिकाधिक वाढतच आहे.त्या ओझ्याखाली दबून बळीराजा आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याने त्याचे घरदार उघड्यावर येत आहे.अशा परिस्थितीत शिवसेनेने शेतकऱ्यांना दिलासा म्हणून मदतयाग सुरु केला आहे.तसेच शेतकरी बांधवांच्या कन्यांचे कन्यादानही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेंतर्गत शिवसेना करत आहे.नुकताच परभणी येथे ३३० हून अधिक जोडप्यांचा सामुदायिक विवाह शिवसेनेने थाटामाटात लावून दिला.शिवसेनेसोबत “नाम” सारख्या संघटनाही शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी झटत आहेत.काही अभिनेते आणि क्रिकेटपटू,खेळाडूंनी शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केलेला आहे.यात अक्षयकुमारही अग्रेसर आहे.

काल एका मराठी चित्रवाहिनीशी बोलताना अक्षयकुमारने शेतकऱ्यांना आणखी मदत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे जाहीर केले.तसेच स्वच्छ भारतसाठी टॅक्स लावला,तसा शेतकऱ्यांसाठीही देशवासियांवर टॅक्स लावा असाही विचार त्याने मांडला.सध्या देशातील शेतकऱ्यांच्या मुलांना शेतकरी व्हावंसं वाटत नाही,अशी परिस्थिती आहे अस म्हणत अक्षयकुमारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या सर्वांसाठी लाजिरवाण्या असल्याचे मत मांडले. माझे वडीलही शेती करायचे, त्यामुळे शेतकऱ्यांचं दु:ख मी जाणतो अस म्हणत बॉलीवूडच्या खिलाडीने शेतकऱ्यांना मदत म्हणून पैसे देणं गरजेचं नाही,त्यांना उभं करणं आवश्यक असल्याच मत मांडल.याविषयी पुढे बोलताना “जवानांप्रमाणेच शेतकरीही महत्त्वाचा,तो आपल्याला अन्न पुरवतो“ अस म्हणत त्याने “सैनिकांसाठी जेवढा निधी खर्च केला जातो, तेवढा शेतकऱ्यांसाठी होतो का?” असा सवालही उभा केला.”शेतकरी दत्तक योजनांसारखे प्रकल्प हाती घ्यायला हवेत” अस मत मांडतानाच अक्षयकुमारने “शेतकऱ्यांसाठी माझ्या उत्पन्नातील अर्धा वाटा द्यायची वेळ आली,तरीही मी मागे हटणार नाही” असही स्पष्ट केल.
अक्षयकुमारने एका चित्रवाहिनीवरील कार्यक्रमात चर्चा करताना मांडलेली मते पाहून त्याच्या सामाजिक जाणिवेची कल्पना येते.बॉलीवूडचा सुपरस्टार असला तरी तो महाराष्टारील आणि देशातील समस्यांचा किती गांभीर्याने विचार करतो किंबहुना त्यावर काही उपाय सुचवतो,शक्य तितकी मदत करतो हे अक्षयकुमारच्या बोलण्यावरून स्पष्ट होते.बॉलीवूडच्या खिलाडीचे सामाजिक भान पाहून इतरांनीही त्यातून प्रेरणा घ्यायला हरकत नाही.अक्षयकुमार पडद्यावरचा हिरो तर आहेच,मात्र तो “रिअल लाईफ हिरो” सुद्धा आहे हेच त्याने त्याच्या वागण्यातून दाखवून दिल.

आजच्या युगात श्रीमंत आणि गरीब अशा दोन गटात विभागल्या गेलेल्या जनतेला जोडण्यासाठी अक्षयकुमारसारख्या लोकांची गरज आहे.अन्यथा समाजातील या दोन वर्गांतील दरी वाढतच जाईल.अनेकदा शहरी श्रीमंत शहाण्यांना सामाजिक समस्यांचे भान आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल नसल्याचे पाहायला मिळते.परिणामी नैराश्य आलेले गरीब शेतकरी श्रीमंत प्रवार्गावर टीका करतात.यामुळे या दोन वर्गातील दरी आणखीनच रुंदावते.शिवसेनाप्रमुख एकदा म्हणाले होते की “तुम्ही श्रीमंतांना गरीब करू नका,पण गरिबांना श्रीमंत करून ते पुण्य पदरी घ्या”.या वाक्याप्रमाणे जर गरिबांना उभारण्यासाठी प्रयत्न केले,त्यांना मदतीचा हात दिला तर तेही आपोआपच श्रीमंत होतील.

जगातील अनेक श्रीमंत व्यक्ती या आधी अत्यंत गरीब होत्या.त्यांनी गरिबीशी संघर्ष केल्याने त्या व्यक्ती श्रीमंत झाल्या.देशात योग्य मार्गाने,कष्ट करून श्रीमंत झालेल्या व्यक्तींना गरिबांनी दोष देण्याचे कारण नाही,कारण ते त्यांच्या मेहनतीने आणि हिंमतीने श्रीमंत झाले आहेत,मात्र अस असाल तरीही कष्ट करून श्रीमंत झालेल्या व्यक्तींनी नंतर श्रीमंतीचा माज न दाखवता सामाजिक भान राखायला हवे आणि शेतकऱ्यांना आणि गरजूंना मदतीचा हात पुढे करायला हवा.या दोन्ही गोष्टी जर सम प्रमाणात झाल्या तरच देशातील श्रीमंत आणि गरीब या दोन प्रवर्गांतील दरी कमी होईल.त्यामुळे ज्याप्रमाणे अक्षयकुमारने कृतीतून दाखवून दिले की तो केवळ पैशामुळे श्रीमंत नाही तर सामाजिक भान राखणारा “विशाल मनाचा श्रीमंत” आहे त्याचप्रमाणे इतरांनीही त्याचे अनुकरण करून मनाची श्रीमंती दाखवायला हवी.शेतकरी जगला तरच आपण जगू हे सत्य स्वीकारायला हवे,आणि शेतकऱ्यांचे अश्रू पुसून त्यांच्या वेदनांवर फुंकर घालायला हवी..!



जय महाराष्ट्र..!

No comments:

Post a Comment