(माझा आजचा लेख:)
भाजपच्या कर्माचे फळ..!
मुंबई-ठाण्यावर भगवाच फडकेल..!
आगामी वर्षात मुंबई,ठाणे,पुणे,नागपूर,नाशिक,पिंपरी-चिंचवड,सोलापूर अशा महाराष्ट्रातील तब्बल १० महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत.त्याचसोबत अनेक नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही याच काळात होणार आहेत.महाराष्ट्रात इतकी वर्षे या निवडणुका प्रामुख्याने काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना-भाजप अशाच लढल्या गेल्या.मनसे हा पक्ष सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नसला तरीही २०१२ साली मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक या महानगरपालिकांच्या निवडणुकांत मनसेच अस्तित्व उदयाला आलं होत.यापैकी पुण्यात मनसे विरोधीपक्ष तर नाशिकात चक्क सत्ताधारी पक्ष ठरलेला होता.त्यामुळे किमान या महापालिकांत मनसेच नावं विजयी पक्ष म्हणून समोर आल नाही तरी पराभूत म्हणून मात्र चर्चिलं जाईल.बाकी बहुतांश ठिकाणी आघाडी विरुद्ध युती किंवा काँग्रेस,राष्ट्रवादी विरुद्ध युती असाच सामना इतकी वर्षे रंगला.अगदी २०१२ पर्यंत हेच चित्र कायम होते.२०१४ ला लोकसभा निवणूक झाली.त्यावेळी मोदी लाटेमुळे भाजपला प्रचंड यश मिळाले.त्या विजयाची मस्ती भाजप नेत्यांना चढली आणि शिवसेना-भाजप ही तब्बल २५ वर्षे अभेद्य राहिलेली युती तुटली.
२०१४ साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १२३ तर महाराष्ट्रात एकाकी टक्कर देणाऱ्या शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या.मोदींचा चौफेर उधलेला विजयरथ महाराष्ट्रात शिवसेनेने अडवला.भाजपला मिळालेल्या १२३ जागा हे यश प्रचंड असलं तरी ते बहुमताच्या आकड्यापासून २१ पावलं दूरचं होत.त्यामुळे साहजिकच शिवसेनेला सोबत घेण भाजपसाठी बंधनकारक ठरलं.त्यातही मोदी लाटेमुळे आणि आयात उमेदवारांमुळे मिळालेल्या यशामुळे हवेत गेलेल्या भाजपने शिवसेनेला कमी महत्वाची खाती देत दुय्यम दर्जाची वागणूक देण्याचा प्रयत्न केला.विधासभा निवडणुकीनंतर शिवसेनेला कमी लेखण हा भाजप नेत्यांचा एककलमी कार्यक्रम ठरलेला आहे.त्याउलट शिवसेना पक्षप्रमुखांनी भाजपने दिलेला वाटा स्वीकारला.त्यावेळी भाजप नेत्यांनाच काय तर महाराष्ट्रालाही शिवसेना पक्षप्रमुखांच्या मनात काय चालू आहे हे ओळखता आलं नाही.काळ जसा पुढे जायला लागला तसं शिवसेनेने सरकारच्या चुकीच्या मुद्द्यांवरून सरकारला जाब विचारण सुरु केलं.महाराष्ट्रात विरोधीपक्ष असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनाच सरकारला चुकीच्या धोरणांचा जाब विचारू लागली.
शिवसेनेचं सत्तेत असताना सरकारला घेरण सर्वांनाच अनपेक्षित होत.त्यावरून शिवसेनेवर टीकाही झाली, मात्र शिवसेना सत्तेत असली तरी ती जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहील अस ठणकावत शिवसेना पक्षप्रमुखांनी आपली भूमिका मांडली.शिवसेना नुसती सरकारवर टीकाच करत बसली नाही तर दुष्काळग्रस्तांना मदतकार्य करण्यासाठी शिवसेनेने अनेक योजना राबवल्या.शिवसेनेच्या आमदार,खासदार, मंत्र्यांनीच नव्हे तर खुद्द युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरेंनी मराठवाडा व इतर दुष्काळी भाग पिंजून काढत मदतीचा महायज्ञ केला.यावेळी नुसतीच भाषणबाजी न करता आणि आश्वासनांची खैरात न करता प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना मदत करण्यात आली.शेतकऱ्यांच्या मुलींचे कन्यादान करण्यासाठीही शिवसेनेने विशेष योजना राबवली.तब्बल ५०० हून जास्त विवाह या योजनेअंतर्गत झाले.यामुळे शेतकऱ्यांच्या तसेच तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शिवसेनेबद्दल आपुलकी निर्माण झाली.तसेच शिवसेना नुसती टीका करत नाही तर ती मदतकार्यातही अग्रेसर आहे ही गोष्टही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात पक्की झाली.या सर्व घडामोडींचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे.
मागील दोन वर्षात घडलेल्या या घडामोडींचा आढावा आज घेण्यामागील कारण म्हणजे आगामी निवडणुकांत शिवसेना-भाजप युती होणार कि नाही हा प्रश्न.शिवसेनेकडून युतीचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे घेतील व त्यांनी दिलेला आदेश तमाम शिवसैनिकांना शिरसावंद्य असेल.२०१४ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ज्या महापालिकांच्या निवडणुका झाल्या त्यात शिवसेनाच भाजपला वरचढ ठरलेली दिसली.युती असूनही नवी मुंबई,संभाजीनगरमध्ये भाजपला समाधानकारक यश मिळवता आलं नाही.लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजपला स्वबळावर मुंबई महानगरपालिका जिंकण्याचे वेध लागलेले आहेत.असं असलं तरी भाजप खरचं मुंबई-ठाण्यात स्वबळावर विजय मिळवण सोडा निदान लढू तरी शकते का? हा संशोधनाचा विषय ठरेल.
मागील आठवड्यात शिवसेनेची एक महत्वपूर्ण बैठक शिवसेना पक्षप्रमुखांच्या “मातोश्री” निवास्थानी पार पडली.त्यात आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीत युती करावी किंवा नको यावर चर्चा झाली.मराठी वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असे वृत्त प्रकाशित केले.भाजपला जर खरच स्वबळावर लढायचं असतं किंवा स्वबळावर किमान लढता तरी येईल इतका आत्मविश्वास असता तर या बातमीमुळे भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटायला हव्या होत्या.शिवसेना स्वबळावर लढणार असेल तर खुशाल लढू देत,आम्हीही स्वबळावर लढू आणि मुंबई,ठाणे महानगरपालिका जिंकून अशा आशयाचं एखाद वक्तव्य भाजपच्या बाजूने व्हायला हवं होत.शिवसेना-भाजप युतीत सतत बिबा घालण्यात अग्रेसर असणाऱ्या किरीट सोमय्या,आशिष शेलार,माधव भंडारी यांनी दिवाळीच्या १५ दिवस आधीच आपली इच्छा पूर्ण झाल्याच्या आनंदात फटके फोडून मिठाई वाटायला आणि मुंबई-ठाण्यातील भाजप कार्यालयांवर तोरण लाऊन विद्युत रोषणाईचा झगमगाट करायलाही हरकत नव्हती.प्रत्यक्षात मात्र अस काहीच घडलं नाही.
शिवसेना स्वबळावर लढणार असे वृत्त वृतावाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केलेलं आहे.शिवसेनेची अधिकृत भूमिका शिवसेना पक्षप्रमुख पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रासमोर मांडतील असे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.हे माहिती असूनही शिवसेना स्वबळावर लढणार ही बातमी ऐकून भाजपचे अवसान गळाल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले.शिवसेना स्वबळावर लढणार हे वृत्त प्रकाशित होताच भाजपच्या तीन प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया देताना युतीच्या बाजूनेच प्रतिक्रिया दिली.यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस,प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे.भाजप स्वबळावर लढण्यासाठी खरचं सज्ज असेल तर त्यांनी युतीच्या बाजूने का विधाने केली? याचं नेमक कारण शोधलं असता भाजपकडे स्वबळावर जिंकण्याचा सोडा लढण्याचाही आत्मविश्वास नाही हे उत्तर मिळेल.भाजपचा स्वबळावर लढण्याचा नारा फक्त मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेकडून जास्त जागा मिळवण्यासाठी होता.स्वबळावर लढण्याची हवा निर्माण करून शिवसेनेकडून जास्त जागा पदरात पडून घ्यायच्या,मात्र हे करत असताना युती तुटेल इतक ताणायचं नाही.परिणामी युतीत राहून जास्त जागा लढवायच्या,युतीचा फायदा घेऊन त्या निवडणूक आणायच्या आणि शिवसेनेच्या मात्र शक्य तितक्या जागा पाडायच्या असा यामागे विचार असू शकतो.
सध्या महाराष्ट्रात असलेल्या शिवसेना-भाजप सरकारला २ वर्षे पूर्ण आहेत.हा काळ महाराष्ट्रातील बहुतांश नेत्यांनी शिवसेनेला कमी लेखण्यात आणि खिजावण्यात घालवला.मुंबईत तळागाळातील मोर्चेबांधणीस प्राधान्य न देता नुसतचं युती तोडून स्वबळावर मुंबई जिंकण्याची विधाने करण्यास आणि शिवसेनेवर खोटेनाटे आरोप करण्यास भाजप नेत्यांनी प्राधान्य दिले.त्याउलट शिवसेनेने भाजपच्या आरोपांना आणि टीकेला फारशी भिक घातली नाही.त्यामुळे भाजप नेत्यांना सध्या शिवसेना पक्षप्रमुख नेमका काय निर्णय घेतील आणि भाजपला कोणत्या परिस्थितीला सामोर जावं लागेल याचा अंदाज बांधण कठीण झाल आहे.भाजपने स्वतःहून युती तोडली तरी मुंबई-ठाण्यात शिवसेनेला अजिबात अडचण होणार नाही.शिवसेनेच्या शाखांच जाळ,शिवसैनिकांची फौज आणि केलेली विकासकाम या त्रिसूत्रीच्या बळावर शिवसेना मुंबई-ठाण्यात स्वबळावरही सहज विजय मिळवू शकते.त्यामुळे भाजपचा कल शिवसेनेसमोर आपल्या ताकदीचा भ्रम निर्माण करून युती टिकवत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण आणि त्या जिंकण याकडेच आहे.
मुळात सध्या शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे.भाजप हा या दोन्ही सरकारमधील मोठा पक्ष आहे.शिवसेना सत्तेत सहभागी आहे,मात्र सरकारच्या चुकांवर “आपलं सरकार” म्हणून पांघरूण न घालता विरोधीपक्षांच्याही आधी शिवसेनाच त्या चुका दाखवून देते आणि त्या सुधारूनही घेते.त्यामुळे अनेकदा सत्तेबाहेर पडण्याचा सल्लाही विरोधकांनी तसेच भाजप नेत्यांनी दिलेला आहे.शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडाव,आधी सत्ता सोडून मग सरकारच्या निर्णयांना विरोध करावा असं आजवर म्हणत आलेल्या भाजप नेत्यांच्या मनात आज वेगळीच भीती आहे.ती भीती म्हणजे जर युती तुटली आणि शिवसेनेने मुंबई-ठाण्यासह इतर महानगरपालिका निवडणुकांत स्वबळावर मिळाल्या तर शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात एकदम पुढे जाईल.२०१९ साली होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या या प्रमुख महानगरपालिका स्वबळावर जिंकताच शिवसेनेचा आत्मविश्वास,शिवसेनेची ताकद वाढेल आणि शिवसेना पुन्हा भाजपला मागे टाकेल.याचा दुसरा भाग असा की जर शिवसेना दुर्दैवाने मुंबई आणि ठाणे महानगरपालिका जिंकण्यात अपयशी ठरलीच आणि भाजपला यश मिळाले तरीही भाजपला आनंदून जाण्याचे कारण नाही.शिवसेना या निवडणुकात अपयशी ठरली तर शिवसेना अजून प्रखरतेने केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयांना विरोध करेल.प्रसंगी सत्तेतून बाहेर पडायलाही मागेपुढे पाहणार नाही.याच भीतीपोटी भाजप सध्या अस्वस्थ आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय-पराजय काहीही झालं तरी त्याचा फायदा शिवसेनेलाच होणार आहे.त्यामुळे युती व्हावी हीच भाजपची इच्छा आहे.आगामी निवडणुकीत शिवसेनेला भाजपशी युती करण्याची गरज नाही तर भाजपलाच शिवसेनेशी युती करण्याची गरज भासत आहे.ही गोष्ट कठीण वाटत असल्याने भाजप एकदा स्वबळावर लढू असा नारा देताना तर दुसऱ्या वेळी युती व्हावी अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहे.भाजपची ही अवस्था होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर निवडणुकीच्या मैदानात संपूर्ण ताकदीने उतरण्याचा घेतलेला निर्णय.इतकी वर्ष शिवसेनेने आणि शिवसेनाप्रमुखांनी “हिंदुस्थान तुमचा-महाराष्ट्र आमचा” हा भाजपवर दाखवलेला विश्वास भाजपला सार्थ तर ठरवता आला नाहीच,त्याउलट भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत असलेली युती सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी तोडून शिवसेनेला डिवचण्याचे काम केले.त्यामुळे पेटून उठलेली शिवसेना यापुढे नेहमीच भाजपला वरचढ ठरेल.भाजपची ही अवस्था हे भाजपच्या कर्माचे फळ आहे.त्याची चव कडू असली तरी ती त्यांना चाखावीच लागेल.आगामी काळ फक्त शिवसेनेचाच असेल हे त्रिकालाबाधित सत्य आहे.शिवसेना संपवण्याच स्वप्न पाहणे स्वतः संपलेत,शिवसेना अजून जिवंत आहे,ज्वलंत आहे.हे सत्य भाजपन स्वीकारलं पाहिजे.तरच महाराष्ट्रात यापुढेही भाजप टिकेल अन्यथा महाराष्ट्र भाजप इतिहासजमा होईल.महाराष्ट्रात फक्त शिवसेनेच्या वाघाची डरकाळीच घुमेल आणि शिवरायांचा आणि शिवसेनेचा भगवाच फडकेल.बाकी कोणतही फडक इथे फडफडू शकणार नाही.मुंबई आमच्या साहेबांची होती,आहे आणि राहील.हे समीकरण कोणालाही तोडता येणार नाही.त्याचबरोबर शिवसेनेचे ठाणे-ठाण्याची शिवसेना हेही शिवसेनेच्या जन्मापासून असलेल नात कदापि तुटणार नाही.मुंबई-ठाण्यावर भगवाच फडकेल..!
जय महाराष्ट्र..