Saturday, 22 October 2016



"वाघगर्जना”

(माझा आजचा लेख:)

गोव्यात नवचैतन्य..!

जय महाराष्ट्र..! जय गोमंतक..!!

शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत.शिवसेना पक्षप्रमुखांच्या या दोन दिवसीय गोवा दौऱ्यामुळे केवळ गोव्यातील शिवसैनिकांतच नव्हे तर संपूर्ण गोव्यात नवचैतन्य संचारलं आहे.पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध असलेलं गोवा राज्य आज शिवसेनेच्या भगव्या वादळाच्या आगमनामुळे भगव झालं आहे.आगामी वर्षात गोवा विधानसभेची निवडणूक आहे.ही निवडणूक शिवसेना संपूर्ण ताकदीने लढवणार असून स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी गोव्यात दाखल झाले आहेत.गोवा हे महाराष्ट्राच्या शेजारच देशातील सर्वात छोट राज्य आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल राज्य आहे.गोव्यात विधानसभा निवडणुकीचे ४० मतदारसंघ आहेत.मराठी आणि कोकणी भाषेचं वर्चस्व असणाऱ्या गोव्यात आता शिवसेनेच्या वाघाची डरकाळी घुमणार असल्यानं पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण हिंदुस्थानच लक्ष लागल आहे.

गोव्यात संध्या भाजपची सत्ता आहे.असं असूनही तेथे मातृभाषेवर गदा येत आहे.शिवसेना नेहमीच मातृभाषेच्या सन्मानार्थ लढा देत आलेली आहे व आता गोव्यातही शिवसेना तसाच लढा देईल.गोव्यात संध्या रा.स्व. संघातून बाहेर पडून भाषा सुरक्षा मंचची स्थापना करणाऱ्या सुभाष वेलिंगकर यांचा मातृभाषेसाठी लढा सुरु आहे.भाजपने आपली घोर निराशा केली अस म्हणत भाजपला धडा शिकवण्यासाठी वेलिंगकर यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे.वेलिंगकरांच्या या नव्या पक्षासोबत शिवसेनेची युती होण्याची चिन्ह आहेत.तसेच गोव्यात एकेकाळी प्रमुख आणि सत्ताधारी पक्ष असलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षही शिवसेनेसोबत येऊ शकतो.अर्थात या शक्यता कितपत खऱ्या ठरतात आणि या पक्षांशी युती करायची किंवा नाही याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुखच घेतील.गोव्यात शिवसेना,मगोप आणि वेलिंगकरांच्या पक्षाची युती झाल्यास सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्याशिवाय एक भक्कम आणि मजबूत पर्याय गोव्याच्या जनतेला मिळेल.

शिवसेना पक्षप्रमुखांनी आज आपल्या गोवा दौऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलताना “हिंदुत्वात फूट नको म्हणून कायम भाजपला साथ देत आलो.निवडणुकीच्या रिंगणात उतरलो नाही,नाहीतर आतापर्यंत शिवसेनेनं गोव्याचा मुख्यमंत्री दिला असता” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.त्याचबरोबर “आमचं धोरण फक्त निवडणुकी पुरता नाही.मातीसाठी लढणाऱ्यांना आम्ही नेहमीच साथ दिली आहे. त्यांच्यासाठी शिवसेना लढत आली आहे.गोव्याच्या विकासासाठी म्हणूनच आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरत आहोत.निवडून आल्यानंतर गोव्यातील सर्वसामान्य व्यक्ती इथला मंत्री होईल, असं वचन देखील त्यांनी यावेळी दिलं.” गोव्यातील शिवसैनिकांना “गोव्याच्या प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा हवी आहे. तुम्ही शाखा उघडा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जे मुंबईत करतोय तेच इथे करेन. ज्या गावात शाखा उघडेल, तिथे मी स्वतः शाखेला भेट द्यायला येईन” असं सांगत शिवसेना पक्षप्रमुखांनी विश्वास दिला.

गोव्यातल्या या मेळाव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांनी वेलिंगकर यांची भेट घेतली.त्याबद्दल बोलताना मातृभाषा आणि संस्कृती रक्षणसाठी शिवसेना जो लढा देत आली आहे त्याच विचारांनी गोवा सुरक्षा मंचचे संस्थापक सुभाष वेलिंगकर यांनी गोव्यात लढा दिला आहे. तेव्हा विचार आणि तत्त्वासांठी आम्ही आज एकत्र आलो आहोत. मात्र अधिकृत युती ‘लवकरच’ जाहीर करू”अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांनी दिली.शिवसेना पक्षप्रमुखांच्या या गोवा दौऱ्याच्या उद्या समारोप होणार आहे.त्यांच्या या गोवा दौर्यामुळे गोव्याचे आणि हिंदुस्थानचे राजकारण ढवळून निघत आहे.

शिवसेनेने आजवर हिंदुस्थान भाजपकडे सोपवला होता.त्यामुळे शिवसेना महाराष्ट्राबाहेर निवडणुका लढवत नव्हती.जर एखाद्या राज्याची विधानसभा निवडणूक शिवसेनेने लढवलीच तर ती संपूर्ण ताकदीनिशी लढवली जात नव्हती.आता काळ बदलला आहे.गोवा आणि उत्तर प्रदेशात शिवसेनेने संपूर्ण ताकदीने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे.गोव्यात मराठी भाषिक लोकांची संख्या जास्त आहे.मराठी आणि कोकणी या सख्या बहिणी आहेत.त्यामुळे गोव्यात स्थानिक भाषेची अस्मिता आणि हिंदुत्व या दोन प्रमुख मुद्द्यांवर शिवसेना निवडणूक लढवेल.गोवा हे राज्य लहान असल्याने गोव्यात विधानसभेच्या केवळ ४० जागा आहेत.शिवसेनेने संपूर्ण ताकदीने लढा दिल्यास गोव्यातील आणि पर्यायाने हिंदुस्थानातील राजकारणात मोठे बदल होतील.

गोवा राज्यात शिवसेनेला यंदा मोठे यश मिळावे यासाठी युवासेना प्रमुख आणि शिवसेना पक्षप्रमुख मैदानात उतरलेले आहेत.गोव्याबरोबरच इतर राज्यांतही शिवसेनेने ताकदीने लढा दिल्यास शिवसेना राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या दृष्टीने वेगाने पुढे सरकेल.आज महाराष्ट्र आणि गोव्यातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात शिवसेनेची गरज आहे.इतके दिवस जे केलं नाही ते आता करून दाखवत शिवसेना पक्षप्रमुख शिवसेनेला आणखी एक पाउल पुढे घेऊन जातील हे नक्की.त्याची सुरुवात गोव्यातून होईल अस म्हणायला हरकत नाही.यापुढे गोव्यात “जय महाराष्ट्र..! जय गोमंतक..!!” असाच नारा घुमेल.शिवसेना प्रत्येकवेळी स्थानिक भाषेच्या रक्षणासाठी आणि भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढत राहील.



जय महाराष्ट्र..!

No comments:

Post a Comment