(माझा आजचा लेख:)
डोंबिवलीत आगडोंब..!
..म्हणून जैतापूर प्रकल्प रद्द करा..!
मागील आठवड्यात डोंबिवली मधील “प्रोबोस” नामक केमिकल कंपनीत स्फोट झाल्याने डोंबिवलीत आगडोंब उसळला.कंपनीत स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला.त्यामुळे कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.या स्फोटाच्या भीषणतेमुळे आजूबाजूच्या सहा कंपन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.कंपनीपासून जवळच असलेल्या लोकवस्तीतील घरांच्या आणि दुकानांच्या काचाही या स्फोटामुळे फुटल्या.या स्फोटात शेकडो लोक जखमी झाले असून मृतांचा आकडाही वेगाने वाढत आहे.या स्फोटामुळे लागलेल्या आगीच्या धुरामुळे आजूबाजूच्या लोकांना श्वास घेण्यास त्रास झाला तसेच परिसरातील मोबाईल सेवाही विस्कळीत झाली.
अचानक झालेल्या या स्फोटाचा आवाज जवळपास ५ किमी लांबवर ऐकू गेला.डोंबिवलीत अफवांना उधाण आल्याने धावपळ झाली.या स्फोटामुळे हवेत पसरलेला धूर,केमिकल्सचा जळका वास,त्यामुळे प्रदूषित झालेली हवा आणि हवेतील कार्बन मोनोक्साईडच वाढलेले प्रमाण यामुळे डोंबिवली शहरातील रहिवास्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यामुळे योग्य ती काळजी न घेतल्यास डोंबिवली शहराला श्वसनाच्या विकारांचा विळखा बसू शकतो अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.कार्बन मोनोक्साईडच हवेतील परिणाम वाढल्याचा परिणाम थेट मानवी आरोग्यावर होणार असून याचा परिणाम शरीरातील हिमोग्लोबिनवर होण्याची शक्यता आहे.परिणामी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होऊ शकते.हा त्रास वाढल्यास रुग्णाला व्हेंटीलेटरवर ठेवावे लागत असल्याची भिती डॉक्टरांनी बोलून दाखवली.
डोंबिवलीत झालेल्या या स्फोटामुळे एका नवीन प्रश्नाला वाचा फुटली.डोंबिवलीतील औद्योगिक भागात रासायनिक,टेक्स्टाईल,फार्मा,रबर,प्लास्टिक असे जवळपास २५० कारखाने आहेत.या कारखान्यात वेगवेगळे रासायनिक,विषारी,ज्वलनशील पदार्थ व वायू वेळोवेळी हाताळले जातात.तरीही कारखान्यांकडून सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती विशेष काळजी घेतली जात नाही.आपत्कालीन परिस्थितीची सूचना देणारे सेन्सर किंवा अलार्म या कंपन्यात नाहीत.तसेच या कंपन्यांच्या कामगारांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याचे ट्रेनिंगही देण्यात आलेले नाही.कारखाने बांधताना व चालवतांना घालून दिलेल्या अटी पाळल्या जात नाहीत.या सर्व गोष्टींमुळे भविष्यात आणखी मोठा अपघात होऊन शहर उध्वस्त होऊ शकते.त्यामुळे परिसरातील लोकांचा जीव धोक्यात आला असून त्यावर काय उपाय करता येईल हा प्रश्न उभा ठाकला आहे.
डोंबिवलीतील या स्फोटातील मृतांची संख्या आता ११ वर जाऊन पोहोचली असून स्फोटाच्या भीषण हादरा बसल्याने सभोवतालच्या तब्बल १५७३ घरांचे प्रत्येकी जवळपास १० ते १२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.त्यानुसार एकूण नुकसानाचा आकडा २ कोटींच्या घरात गेला आहे.तसेच इतर कंपन्यांचे झालेले नुकसान आणि अन्य व्यवसायिकांचे झालेले नुकसान धरून एकूण नुकसानाचा आकडा कोटीच्या कोटी उड्डाणे घेणार आहे.प्रोबेज कंपनीत मदतकार्य सुरु असताना ढिगाऱ्याखाली प्रोपाझील अल्कोहोल या अत्यंत ज्वलनशील आणि थायोलीन क्लोराईड या अत्यंत विषारी अशा केमिकल्सचे प्रचंड साठे आढळले असून या साठ्यांना आगीचा स्पर्श झाला असता तर डोंबिवलीत भोपाल वायू दुर्घटनेसदृश स्थिती निर्माण झाली असती अशी माहितीही समोर आली आहे.
डोंबिवलीत झालेल्या या स्फोटामुळे हाहाकार उडाला आहे.त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्या तसेच इतर हानी यामुळे सुरक्षेविषयी अनेक त्रुटी समोर आल्या असून सर्वांची तारांबळ उडाली आहे.आपत्कालीन व्यवस्थेतील त्रुटीही या स्फोटामुळे उघड्यावर पडल्या असून धोक्याची जाणीव झाल्याने सर्वांचे डोळे या स्फोटाने खाडकन उघडले आहेत असेच म्हणावे लागेल.एका केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामुळे जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर कोकणात जैतापूर येथे स्थानिकांचा विरोध झुगारून अणुउर्जा प्रकल्प उभारण्याची तयारी कशाचा बळावर केली जात आहे.याद राखा,अणुउर्जा प्रकल्पाट जर काही असा वेडावाकडा प्रकार झाला तर अक्खा कोकण बेचिराख होईल.अणुभट्टी उभारणे म्हणजे हातभट्टी वाटली की वीटभट्टी? केमिकल कंपनी स्फोटामुळे जर काही अक्कल आली असेल तर त्यातून शिकलेला धडा म्हणून जैतापूर प्रकल्प रद्द करा.
जय महाराष्ट्र..!