Sunday, 1 May 2016



“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

महाराष्ट्राचा मंगलदिन..!

अब तक छप्पन..!

आज महाराष्ट्र दिन.आपल्या मातृभूमीचा,महाराष्ट्राचा हा मंगलदिन. १ मे १९६० रोजी म्हणजेच आजपासून ५६ वर्षांपूर्वी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.महाराष्ट्राला मुंबई मिळण्यासाठी अनेकांनी लढा दिला,रक्त सांडले आणि बलिदानही दिले.जीवाची बाजी मराठी माणसाने मुंबई मिळवली.२००९ - १० साली संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला.आता संयुक्त महाराष्ट्राची वाटचाल शतकाकडे सुरु आहे.सध्याचा महाराष्ट्र हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र असला तरी बेळगाव,कारवार इत्यादी गावांसह अखंड महाराष्ट्र नाही हि खंत या मंगलदिनी प्रत्येक मराठी मनात आहे.त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राची ७५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी अखंड महाराष्ट्राची स्थापना व्हायलाच हवी अशी शपथ प्रत्येक मराठी माणसाने घेतली पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी योगदान द्यायला हवे.

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव खूप वर्षांपासून सुरु आहे,मात्र महाराष्ट्रद्रोह्यांचे हे दिवास्वप्न शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांमुळे अधूर राहिलेलं आहे.महाराष्ट्राला मुंबई मिळालेली नसून महाराष्ट्राने ती मिळवलेली आहे,त्यासाठी अनेकांनी बलिदान दिलेलं आहे.त्यामुळे महाराष्ट्र अखंडच राहील आणि तो राहावा यासाठी तमाम मराठी जनता लढा देईल,प्रसंगी बलिदानही देईल.या लढ्यात शिवसेना आणि शिवसैनिक सदैव अग्रेसर राहून महाराष्ट्रद्रोह्यांना धूळ चारतील आणि महाराष्ट्र अखंड ठेवतील.आजकाल स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा जोर धरू लागलेली आहे.तो कोण चणे,फुटाणे का वाटणे,नाही नाही अणे स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याचे दिवास्वप्न रंगवून मनातल्या मनात मांडे खात आहे.त्याचबरोबर तो संघ परिवारही महाराष्ट्राचे तुकडे करायला टपून बसलेला आहे.महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणाऱ्यांच्या खांडोळ्या करून महाराष्ट्र अखंडच ठेवण्याचे कार्य करायला महाराष्ट्रप्रेमी मराठी माणूस समर्थ आहे,सज्ज आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं.

काल-परवा त्या अणेने म्हणे स्वतंत्र विदर्भाचा झेंडा बनवला.अहो अणे,या महाराष्ट्राचा झेंडा भगवाच होता,भगवाच आहे आणि भगवाच राहणार.तुम्ही लाख झेंडे बनवाल हो,पण त्यात शिवरायांच्या पवित्र भगव्याचे तेज येणार नाही,कदापि नाही.चार-पाच वेगवेगळ्या रंगांची फडकी जोडली आणि काठीला लावली म्हणजे त्याचा झेंडा होत नाही.झेंड्याला इतिहास असावा लागतो.भगव्याला इतिहास आहे.भगवा हा हिंदू धर्माचा झेंडा आहे.तोच भगवा हाती घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले.त्यानंतर तोच भगवा शिवसेनाप्रमुखांनी हाती घेतला आणि तोच भगवा सध्या शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसैनिकांच्या हातात आहे.भगव्याचा हा वारसा शिवसेना समर्थपणे सांभाळत आहे.त्यामुळे महाराष्ट्रात झेंडा फडकणार असेल तर तो भगवाच फडकेल,बाकी कोणतही फडक इथे फडकणार नाही.महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव शिवसेना कदापि यशस्वी होऊ देणार नाही.त्यासाठी शिवसैनिक शेवटच्या श्वासापर्यंत लढा देईल.

आता राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाचा.विदर्भवादी लोकांना वाटते भाजपला आपण मतदान केले आहे,ते विदर्भ वेगळा करतील आणि आपला विजय होईल.अहो वेगळा विदर्भ हे भाजपचे निवडणुकीपुढे दिलेले आश्वासन होते.वेगळ्या विदर्भाचे गाजर दाखवून विदर्भवादी लोकांची मते घेऊन भाजप सत्तेवर आहे मात्र ते सरकार आज केवळ शिवसेनेमुळे अस्तित्वात आहे.त्यामुळे भाजप वेगळा विदर्भ करूच शकत नाही,त्यांना ते शक्य नाही.भाजप पृथ्वीतलावरील सर्वात मोठा पक्ष असला तरी महाराष्ट्र आणि शिवसेनेसमोर ठेंगणा आहे.महाराष्ट्रद्रोही वळवळ केल्यास मराठी माणूस भाजपला महाराष्ट्रातून उखडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना चांगलच माहिती आहे.त्यामुळे त्यांच्याकडून वेगळ्या विदर्भाची अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे.त्याऐवजी विदर्भवाद्यांनी केंद्र व राज्यातील भाजप नेते,मंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांना कात्रीत पकडून विदर्भाचा विकास करून घ्यावा आणि महाराष्ट्रीय म्हणून अभिमानाने राहावे.

महाराष्ट्र जिंकू पाहणारे,महाराष्ट्र तोडणारे आणि गिळणारे कित्येक महाराष्ट्रद्रोही आले आणि गेले,महाराष्ट्र मात्र अखंडच आहे आणि अखंडच राहणार.गेल्या ५६ वर्षात महाराष्ट्राने ५६ श्रीहरी अणे पाहिलेत आणि ठेचलेत,यापुढेही महाराष्ट्रद्रोही कितीही अणे निर्माण झाले तरी ते गाडून महाराष्ट्र अभेद्य राहील अखंड राहील.अब तक छप्पन आणि यापुढेही प्रत्येक महाराष्ट्रद्रोही आडवा करून बेळगाव,कारवार इत्यादी गावांसह अखंड महाराष्ट्र निर्मू आणि शिवरायांचा भगवा सदैव फडकवत ठेवू हाच आजचा संकल्प.सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!



जय महाराष्ट्र..!

No comments:

Post a Comment