"वाघगर्जना"
(माझा आजचा लेख:)
मोदी सरकारची दोन
वर्षे..!
उत्तरे तयार
ठेवा..!
“अबकी बार मोदी
सरकार” आणि “अच्छे दिन आनेवाले हैं” अशा घोषणा देत प्रचंड बहुमताने ऐतिहासिक विजय
मिळवत केंद्रात सत्तेत आलेल्या पंतप्रधान मोदींच्या सरकारला आता दोन वर्षे पूर्ण
झाली आहेत.म्हणजेच मोदी सरकारच्या हातात आता ३ वर्षे उरली आहेत.२ वर्षांचा कालावधी
हा सरकारच्या एकूण कालावधीच्या निम्म्याहून थोडा कमी असला तरी मोदी सरकारची दोन
वर्षे हिंदुस्थान आणि हिंदुस्थानी जनतेसाठी नेमके काय देणारी ठरली याचा उहापोह
होणे निश्चित आहे.सत्ताधाऱ्यांनीही या उहापोहातून योग्य तो निष्कर्ष काढून पुढील ३
वर्षांतील सरकारच्या वाटचालीची दिशा ठरवणे गरजेचे आहे.
मोदी सरकार
आल्यामुळे नेमका काय फरक पडला या प्रश्नाचे उत्तर शोधायचे झाल्यास पारदर्शी आणि
जलद कामकाजाचा मुद्दा प्राधान्याने विचारात घेतला पाहिजे.मोदी सरकारचा २ वर्षातील
कारभार हा अत्यंत पारदर्शी राहिलेला असून अनेक सेवा जलदगतीने उपलब्ध झाल्या आहेत.या
दोन वर्षांच्या कार्यकाळात रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी प्रवाशांच्या काही समस्या
ट्विटरमार्फत समजताच त्यावर उपाययोजना करून तत्काळ त्या समस्या सोडवल्याचे पाहायला
मिळाले असून हे जलदगती कारभाराचे उदाहरण ठरू शकेल.ट्विटरमार्फत कळवलेल्या समस्या
जलदगतीने सोडवणे ही गोष्ट कौतुकास्पद आहेच मात्र महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांचा
आक्रोश आणि आत्महत्याग्रस्तांचा टाहो ऐकूनही मोदी सरकारने दुष्काळावर एखादा
कायमस्वरूपी उपाय म्हणून योजना जाहीर करण्यास आणि ती जलदगतीने पूर्ण करण्यास काय
हरकत आहे? महाराष्ट्रात राष्ट्रवादीवाल्यांनी सिंचनाचा राडा केला आहे हे मान्य,मात्र
त्या घोटाळेबाजांवर मोदी सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी.पुरावे हवे असल्यास
भाजप कार्यालयात बैलगाड्या पाठवून मिळवावेत.
“बहोत हुई महंगाई
की मार” असे म्हणत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारलाही महागाईवर फारसे नियंत्रण मिळवता
आलेले नाही.महाराष्ट्रात मागील वर्षी ऐन दिवाळीत तूरडाळीचे भाव गगनाला भिडलेले
असल्याने सामन्यांची दिवाळी कशीबशी साजरी झाली.खमके नेते म्हणून मोदींना आजही
देशभरातून पसंती मिळत असल्याचे अनेक सर्व्हेक्षणांतून समोर येत आहे.अरविंद केजरीवाल,राहून
आणि सोनिया गांधी यांच्या तुलनेत मोदींचे नेतृत्व कित्येक पतीने उजवे आहे आणि
म्हणूनच त्यांच्याकडून हिंदुस्थानच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या जास्त अपेक्षा
आहेत.मोदी सरकारचा हा २ वर्षांचा कार्यकाळ पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांनीही
गाजला.यात मोदींच्या धावत्या पाक भेटीचाही समावेश आहे.मोदींनी परदेश दौऱ्यावर जाण्यास
जनतेची हरकत नाही मात्र पाकसारख्या हिरव्या सापाला दुध पाजून समजवण्यापेक्षा मोदींनी
“५६ इंच छाती” पुढे करून ठेचून टाकावे अशी माफक अपेक्षा हिंदुस्थानी जनतेने
मोदींकडून ठेवायला काय हरकत आहे?
“मेक इन इंडिया” हा
मोदी सरकारचा आणखी एक गाजलेला कार्यक्रम.यामुळे देशातील उद्योगाला चालना मिळाली हे
खरे,मात्र मोदींनी भारतातील शेतकरी बांधवांच्या शेतमालास योग्य तो भाव मिळवून देऊन
त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित केल्यास हिंदुस्थान सुजलाम् सुफलाम् होण्यास
वेळ लागणार नाही.हिंदुस्थान हा शेतीप्रधान देश आहे.हिंदुस्थानात उद्योग आलेच
पाहिजेत यासाठी मेक इन इंडिया हा उपक्रम योग्यच आहे,मात्र त्याचप्रमाणे शेतकरी
बांधवांनाही आधार देण्यासाठी मोदींनी योजना सुरु करायला हवी.शेतकरी जगला तरच देश
जगेल.त्यामुळे मोदींनी शेतकरी जगवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी पुढाकार घ्यायलाच हवा.
सरकारच्या
कारकीर्दीचा लेखाजोखा मांडताना सत्तेचा केलेला वापर हा मुद्दाही गृहीत धरायचा असल्यास
या बाबतीत काँग्रेस आणि भाजपमध्ये फारसा फरक दिसत नाही.अनेक भाजप नेते आणि
मंत्र्यांना सत्तेचा आलेला माज गेल्या २ वर्षात अनेकदा दिसलेला आहे.आपल सरकार
आल्याच्या मस्तीत ते आहेत मात्र जोपर्यंत जनतेला सरकार आपलं वाटत नाही तोपर्यंत
सर्वकाही व्यर्थ आहे.सरकारच्या कामगिरीचा विषय निघताच आजही भाजप नेते व मंत्री
काँग्रेसने ६० वर्षात काय केलय? असा प्रतिप्रश्न करताना दिसतात.हा प्रश्न योग्य
असला तरी हे जनतेच्या प्रश्नाचं उत्तर नाही.जनतेने भाजपच्या आणि मोदींच्या हातात
मोठ्या विश्वासाने आणि प्रचंड बहुमतासह सत्ता दिली आहे.तेंव्हा त्यांना ५ वर्षांनी
जनतेच्या प्रश्नांची उतरे द्यावीच लागतील.ती न दिल्यास जनताच योग्य तो “हिशोब”
करेल.मोदी सरकारचा ५ वर्षांचा कार्यकाळ संपण्यास अजून ३ वर्षे असली तरी आत्तापासूनच
जनतेच्या प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा.
जय महाराष्ट्र..!
No comments:
Post a Comment