Saturday, 21 May 2016




“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

प्रादेशिक अस्मितेची नांदी..!

“महाराष्ट्राचा सुवर्णदिन”

हिंदुस्थानातील पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला.यात केरळ,आसाम,पश्चिम बंगाल,तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांचा समावेश आहे.या निकालानुसार केरळमध्ये काँग्रेसला पराभूत करत डावे सत्तेवर आले.पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये ममता आणि जयललिता यांचा करिष्मा कायम राहिला.पुद्दुचेरीत काँग्रेस आघाडीला सत्ता मिळाली आणि आसाम मध्ये पहिल्यांदाच कमळ फुलले.या निवडणुकांच्या निकालानंतर देशातील राजकारणात घडलेल्या घडामोडी आणि यापुढे घडू शकणाऱ्या संभाव्य घडामोडींच्या शक्यता अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे.या निवडणुकांत प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना नाकी नऊ आणत मिळवलेल्या प्रचंड यशामुळे प्रादेशिक पक्षांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.याखेरीज काँग्रेसने या निवडणुकीत दोन राज्यं गमावत एक छोटे राज्य कमवल्यामुळे ही “काँग्रेसमुक्त भारत”ची नांदी आहे काय? अशा चर्चेलाही उधाण आल आहे.

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळवता आला होता.त्यानंतर मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेला काँग्रेसमुक्त भारताचा नारा प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली.त्यानंतर महाराष्ट्र,दिल्ली,बिहार,केरळ,आसाम,पश्चिम बंगाल,तामिळनाडू आणि पुद्दुचेरी अशा अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या.यातील निम्म्याहून अधिक राज्यात काँग्रेसला पराभवच पहावा लागला,मात्र याचा अर्थ ती राज्ये भाजपने जिंकली असे नव्हे.भाजपलाही काँग्रेसप्रमाणेच निम्म्याहून जास्त राज्यात पराभवच पाहावा लागलेला आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपचे एकहाती सत्तेचे स्वप्न उधळून लावल्यानंतर दिल्ली आणि बिहार निवडणुकांत भाजपचा अत्यंत दारूण पराभव झाला आहे.तेंव्हा काँग्रेसच्या पराभवामुळे भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटण्याचे कारण काय? महाराष्ट्रात उधळला गेलेला एकहाती सत्तेचा मनसुबा,दिल्लीत केजारीवालांनी चारलेली धूळ आणि बिहारमध्ये लालू-नितीशसह काँग्रेस आघाडीने दिलेल्या पराभवाच्या डागण्या भाजपवाले इतक्या लवकर विसरले की काय?

महाराष्ट्र,दिल्ली,बिहार,केरळ,आसाम,पश्चिम बंगाल,तामिळनाडू आणि पुद्दुचेरी अशा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिले असता जवळपास सर्वच ठिकाणी प्रादेशिक पक्ष भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांना वरचढ ठरले असल्याचे चित्र आहे.महाराष्ट्रात भाजपला १२३ जागांवर मिळालेले यश हे प्रचंड असले तरी ऐनवेळी कृतघ्न भाजपने गद्दारी करून युती तोडल्याने अल्पावधीत प्रचार करून स्वबळावर ६३ जागा जिंकत शिवसेनेने भाजपचे स्वबळावर महाराष्ट्र जिंकण्याचे स्वप्न उधळून लावलेले होते.भाजपला शेवटी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेलाच सोबत घ्यावे लागले.त्यानंतर दिल्लीत केजरीवाल यांच्या “आप”ने ७० पैकी ६७ जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला.बिहारमध्ये लालू-नितीश आणि काँग्रेस यांनी एकत्र येत भाजपला अस्मान दाखवले.केरल,तामिळनाडू,पश्चिम बंगाल,पुद्दुचेरी या राज्यांत भाजपला डोके वर काढण्यात अपयश मिळाले.आसाममध्ये भाजपला पहिल्यांदाच सत्ता मिळाली खरी पण तिथेही त्यांना प्रादेशिक पक्षाची मदत घेऊनच निवडणूक लढावी लागली.या सर्व निकालांचा एकच अर्थ आहे की ही काँग्रेसमुक्त भारताची नांदी नसून प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांपासून मुक्त केलेल्या राज्यांची आणि त्यांच्या प्रादेशिक अस्मितेची नांदी आले.

देशातील अनेक राज्यांत राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्ष वरचढ ठरले असल्याचे चित्र आहे.यामागील कारण शोधले असता प्रादेशिक पक्षांनी स्वीकारलेला प्रादेशिक अस्मितेचा अजेंडा हेच या यशाचे गमक असल्याचे लक्षात येईल.महाराष्ट्रात शिवसेना एकहाती सत्तेत नसल्याने महाराष्ट्रात मराठी आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो.मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या जनतेने बिहारी,बंगाली आणि तामिळी जनतेचा आदर्श घेऊन शिवसेनेला एकहाती सत्ता द्यावी.तर,तर आणि तरच महाराष्ट्राची मराठी संस्कृती आणि अस्मिता अबाधित राहिल व कोणीही महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करणार नाही.केरळ,तामिळनाडू यांसारख्या राज्यात राज्याची अस्मिता सोडाच पण लुंगी,इडली अशा प्रादेशिक संस्कृतीत महत्वाच्या असलेल्या गोष्टींचाही केलेला अपमान खपवून घेतला जात नाही.महाराष्ट्रात मराठी माणूस आणि मराठी भाषा एवढच नव्हे तर अनेकदा छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याच्या घटनाही घडतात.याचे प्रमुख कारण म्हणजे प्रादेशिक अस्मिता हा प्रमुख अजेंडा असलेला पक्ष सत्तेत नसणे होय.त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने यातून धडा घ्यावा आणि शिवसेनेला एकहाती सत्ता द्यावी.मराठी अस्मितेच्या सन्मानासाठी हे अत्यावश्यक आहे.

महाराष्ट्राचा मराठी बाणा जपायचा असेल तर मराठी जनतेला बिहारी,बंगाली आणि तामिळी जनतेचा आदर्श घ्यावाच लागेल आणि शिवसेनेच्या रूपाने मराठी राज्य आणावेच लागेल.महाराष्ट्रात मराठी अस्मिताच चालायला हवी आणि मराठींनाच प्राधान्य हवे.त्यासाठी मराठी एकजूट दाखवणे गरजेचे आहे.ती ज्यादिवशी दिसेल तो महाराष्ट्राचा सुवर्णदिन असेल.

जय महाराष्ट्र..!



No comments:

Post a Comment