(माझा आजचा लेख-:)
रडरागिणी..!
आता सांगा असहिष्णू कोण?
शनिमंदिर,त्र्यंबकेश्वर आणि कोल्हापूर अंबाबाई मंदिर गाभाऱ्यात प्रवेशबंदी आंदोलनाची स्टंटबाजी करून झाल्यानंतर भूमाता महिला ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात असलेल्या महिलांच्या प्रवेशबंदी विरोधात आंदोलन करण्याचा आणि हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला.तृप्ती देसाई यांचा आंदोलनाचा निर्णय जाहीर होतो न होतो तोच इस्लामी नेते,मौलवी आणि संघटनांनी या आंदोलनावर सडकून टीका केली.तसेच हे आंदोलन यशस्वी होऊ देणार नाही,तृप्ती देसाई यांना हाजी अली दर्ग्यात पाउल टाकू देणार नाही असे जाहीर केले.
तृप्ती देसाई यांनी आंदोलनाची भूमिका जाहीर करताच अराफत शेख यांनी तृप्ती देसाई यांनी दर्ग्यात प्रवेश करावा मात्र मजारजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देऊ अशी जाहीर धमकी दिली.त्यानंतर समाजवादी पक्षाच्या अबू आझमींनी तृप्ती देसाई यांनी दर्ग्यात प्रवेशाचा प्रयत्न केल्यास त्यांना धक्के मारून बाहेर काढू असा इशारा दिला.त्यापाठोपाठ एमआयएमच्या राफत हुसैन यांनी तृप्ती देसाई यांनी मजार प्रवेशासाठी जबरदस्ती केल्यास त्यांना काळ फासू असा इशारा दिला.या सगळ्या धमक्या काय लोकशाहीला धरून होत्या काय? की महिला हक्कांचे संरक्षण करणाऱ्या होत्या? कोणत्याही धमकीला बळी न पडण्याची चिवचिव करणाऱ्यांना या इशाऱ्यांनी गुदगुल्या झाल्या की काय? हिंदू मंदिरातील गाभाऱ्यात सर्व प्रथा,परंपरा,श्रद्धा मोडून,विरोध झुगारून प्रवेश करण्याची अरेरावी करण्याऱ्या तृप्ती देसाई यांनी दर्ग्यात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर करताच त्यांना मुस्लीम नेते आणि मौलवींनी धमक्या दिल्या,मारहाणीची भाषा केली आणि अहो,आश्चर्यम् ! तृप्ती बाईंनी आपली भूमिकाच बदलली,मागे घेतली.हे परिवर्तन कशामुळे? या धमक्यांना भिक न घालण्याचे धाडस तृप्ती देसाई यांना का दाखवता आले नाही?
तृप्ती देसाई या आंदोलनासाठी हाजी अली येथे दाखल झाल्या तेंव्हा त्यांना प्रचंड विरोध झाला.त्यांच्या स्वागतासाठी अबू आझमी,अराफत शेख हे मुस्लीम नेते आपल्या समर्थकांसह हजर होते.अनेक मुस्लीम संघटना,एमआयएम,समाजवादी पार्टी,अवामी विकास पार्टी अशा पक्षांनी साम,दाम,दंड,भेद वापरून कोणत्याही परिस्थितीत तृप्ती देसाई यांना रोखण्याचा निर्णय घेतला होता.तृप्ती देसाई वाहनातून उतरताच उपस्थित जमाव आक्रमक झाला.यात महिलांची संख्याही लक्षणीय होती.त्यामुळे काही वेळासाठी तृप्ती देसाई यांनी तेथून काढता पाय घेतला.तेंव्हाही त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरूच होती.काही वेळाने त्या पुन्हा दर्गा परिसरात परतल्या.जोरदार घोषणाबाजीमुळे पोलिसांनी देसाई यांना रोखले.त्याच वेळी हाजी अली दर्ग्याचे दार बंद केले गेले.त्यामुळे तृप्ती देसाई यांना दर्ग्यात प्रवेश करता आला नाही.त्यामुळे संतापलेल्या तृप्तीबाईंनी विनाकारण मुख्यमंत्री निवासाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला,मात्र पोलिसांनी त्यांना रोखून आझाद मैदानाकडे वळवले.अशाप्रकारे तृप्ती देसाई यांच्या हाजी अली दर्गा प्रवेशाच्या आंदोलनाचा फज्जा उडाला.
हिंदू देवळांत आंदोलन करताना रणरागिणी असल्याचा आव आणणाऱ्या तृप्ती देसाई दर्गा प्रवेशाच्या वेळी मात्र रडरागिणी झाल्या.हिंदूंना असहिष्णू म्हणणाऱ्यांनी आता आपले तोंड उचकटून आपले मतप्रदर्शन करावे.मुस्लीम नेते आणि मौलवींनी जे केले ते असहिष्णुता दर्शवणारे नव्हते काय? त्यांच्या धर्मातील प्रथांच्या आड येणारी बाब त्यांनी एकजुटीने फोल ठरवली.तत्पूर्वी मंदिर प्रवेश आंदोलनावेळी हिंदू संघटनांनी विरोध केला,मात्र तृप्ती देसाई यांनी आडमुठी भूमिका घेत,अरेरावी करत मंदिरात प्रवेश केला.हे तेथील प्रथा,परंपरा आणि धार्मिक श्रद्धांना हरताळ फासणारे होते.तरीही हिंदू शांतच राहिले.ही हिंदूंची विशाल मनाची भूमिकाच हिंदू धर्माची महती स्पष्ट करते.हिंदू धर्म अतिशय विशाल असून धर्मातील सर्वच प्रथा,परंपरा या विज्ञानाला धरून आहेत.काही अनिष्ट प्रथा या धर्मात नसून गैरसमज आणि अंधश्रद्धेतून सुरु झालेल्या आहेत.त्या बदलल्या गेल्याच पाहिजेत हीच सर्व हिंदूंची भूमिका आहे.अशी विशाल भूमिका घ्यायला फक्त हिंदू धर्मच समर्थ आहे आणि राहील.आता सांगा असहिष्णू कोण?
महिलांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशासाठी तृप्ती देसाई यांनी आंदोलन छेडले आहे त्याऐवजी त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी,महिलांच्या हक्कांसाठी,महिलांच्या अत्याचार विरोधात मोठे जनआंदोलन उभारावे.यासारखे मोठे आणि महत्वाचे प्रश्न सोडून मंदिर प्रवेशाचा वाद उगाळत बसण्याला काय अर्थ आहे? हिंदुस्थानातील महिलांसमोर काय तेवढा एकच प्रश्न उरला आहे का? तृप्ती देसाई यांना महिलांसाठी जर खरचं काहीतरी करायची इच्छा असेल तर त्यांनी महिलांच्या मुख्य समस्यांवर आंदोलन करावे.आपोआपच त्या महिलांचा आवाज बनतील,मात्र अशी आंदोलने करत राहिल्या तर त्यांना स्टंट म्हणूनच पाहिले जाईल.
जय महाराष्ट्र..!