(माझा आजचा लेख-:)
महिला आणि मंदिरे..!
नाहक नाटके कशाला?
आजकाल देशात आणि महाराष्ट्रात महत्वाचे प्रश्न सोडून नाहक वाद निर्माण करण्यात आणि त्यातून प्रसिद्धी मिळवण्यातच अनेकजण धन्यता मानत आहेत.महाराष्ट्रात सध्या भयंकर दुष्काळ आहे.पाण्याअभावी जीव जाईल अशी स्थिती आहे.अशा परिस्थितीत सामाजिक भान राखून संकटाचा सामना कारण गरजेच आहे,मात्र काही स्वघोषित समाजसुधारक महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या मुद्द्याचे राजकारण करून तृप्त होत आहेत.राज्यात काय स्थिती आहे ते न पाहता अचानक स्त्री-पुरुष समानतेवरुन वादंग निर्माण केला जात आहे.महिलांना मंदिर प्रवेश मिळवून देऊन आपण किती थोर समाजसुधारक आहोत हे दाखवण्याचा खटाटोप सुरू आहे.यात तृप्ती देसाई यांची भूमाता ब्रिगेड संघटना आघाडीवर आहे.
हिंदू धर्मातील काही प्रथा-परंपरानुसार काही मंदिरांत स्त्रियांना प्रवेश नाही.ही गोष्ट खरंतर स्त्रियांनाही मान्य आहे.त्यामागे काही इतिहास आहे,भावना आहेत,भक्तीभाव आहे.कुणावर बंधने लादायची असा उद्देश ठेऊन या परंपरा सुरु झालेल्या नाहीत.या परंपरा का सुरु झाल्या याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.या परंपरांना महिलांचाही विरोध नाहीये.अस असताना या तृप्ती देसाई आणि त्यांच्या संघटनेला महिलांना मंदिर प्रवेशाचा हक्क मिळवून देण्याची लहर आली.ही लहर अचानकपणे येण्याचे कारण काय? इतके दिवस महिलाच नव्हत्या का? कि मंदिरे नव्हती? कि महिलांना मंदिर प्रवेश आज नाकारण्यात आला? काही विचार नाही,अभ्यास नाही,इतर सामाजिक प्रश्नांवर काही भाष्य नाही,उपाय नाहीत,एकच मुद्दा तो महिलांच्या मंदिर प्रवेशाचा उचलला आणि या बाई अंगात आलेल्या बाईप्रमाणे घुमत महाराष्ट्रभर मंदिरभ्रमण करत महिलांना मंदिरप्रवेश देण्यासाठी खटाटोप करत आहेत.अहो,आधी महिलांना संरक्षण नाही त्यावर आंदोलन करा ना.ते जास्त महत्वाच आहे.हे तुम्ही कोणत्याही सुजाण स्त्रीला अथवा कन्येला विचारू शकता.कशाला आजकाल तर एखादी चिमुरडी बालिकाही सांगेल महिला सुरक्षाच महत्वाची आहे,मंदिरप्रवेश नव्हे.
हिंदू धर्मात महिलांना मनाचे स्थान नाही हा शुद्ध गैरसमज आहे.अगदी हिंदू देव-देवतांमध्ये पाहिलं तरी अस लक्षात येईल कि धन,धान्य,विद्या,सुरक्षा या सर्वांचे स्वामित्व हे धनलक्ष्मी,अन्नपूर्णा,सरस्वती,दुर्गा या देवींकडेच आहे,मग अशा हिंदू धर्मात महिलांना स्थान नाही असे कसे म्हणता येईल? महिलांच्या मंदिर प्रवेशाबद्दलच बोलायचे झाले तर काही देवस्थानात महिलांना गाभाऱ्यात प्रवेश नाही हे मान्य,मात्र यावर आंदोलने,दंडेलशाही,कायद्याचा वापर करून बळजबरी हे उपाय नाहीत.यावर सर्वांनी एकत्र येऊन चर्चेने,अभ्यासपूर्वक आणि भावना,श्रद्धा जपून तोडगा काढणे गरजेचे आहे.शिवाय याच महाराष्ट्रात अनेक मंदिरांत महिलांनाच प्राधान्याने प्रवेश मिळतो ही बाबही जाणून घेणे गरजेचे आहे.उदाहरणार्थ सोलापुरात नवरात्रोत्सव काळात रुपाभवानी माता मंदिरात पुरुषांपेक्षा महिलांनाच देवीचे जवळून दर्शन घेता येते.महिला भक्तिभावाने देवीची ओटी भरून आशीर्वाद घेत असतात.त्यामुळे साहजिकच त्यांना प्राधान्य दिले जाते.त्याऐवजी पुरुष भक्तमंडळी महिलांपेक्षा लांबून,देवीच्या पादुकांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात.आता या सध्या सरळ गोष्टीला भेदभाव म्हणायचं काय? यावर सोलापुरातील पुरुषांनी बोंब मारली पाहिजे का? तर अजिबात नाही.त्यामध्ये काही अर्थच नाही.हिंदू धर्मातील प्रथा-परंपरा लक्षात घेऊन अनेक देवस्थानांत असा सुवर्णमध्य काढला गेलेला आहे.यावर ना महिलांची हरकत आहे ना पुरुषांची.अशा ठिकाणी आंदोलनांचा अट्टाहास कशासाठी?
तस पाहिलं तर महिलांनी शनी शिंगणापूर येथील शनी मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश मिळत नसल्याबद्दल कधीही तक्रार केली नव्हती.बहुतांश महिलांना ते मान्य होत,त्यांनी तो नियम स्वीकारला होता.तरीही तृप्ती देसाई यांनी आंदोलन करून महिलांना शनी चौथऱ्यावर प्रवेश मिळवून दिला,मात्र यावर अनेक महिलाही नाराज आहेत.त्यानंतर उत्साहाच्या भरात तृप्ती देसाईंनी विजय मिरवणूक काढून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले,मात्र येथे महिलांना प्रवेशाचा वाद नसल्याने अशा आंदोलनाची गरज नव्हती.शिवाय तृप्ती देसाई यांनी साडी परिधान करून दर्शन घ्यावे असे त्यांना सांगण्यात आले होते,मात्र त्या पंजाबी ड्रेसमध्ये गेल्या.बाहेर येताच चिडलेल्या महिलांनी त्यांना धक्काबुक्की केली,चोप दिला.त्यामुळे आता त्या रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.ज्या महिलांसाठी तृप्ती देसाई झगडत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे त्याच महिलांनी तृप्ती देसाईंना चोप दिला ना? मग महिला आणि मंदिरे हा विषय घेऊन महिला हक्काची नाटके कशाला? त्यातून काय साध्य झाले?
बर या बाई हाजी आली दर्ग्यात सुद्धा महिला प्रवेशाची लढाई लढणार होत्या म्हणे? त्याचे काय झाले? तृप्ती देसाई दर्ग्यात प्रवेश करून दाखवण्याचे धाडस करणार का? की मुस्लीम पर्सनल लॉच्या नावाखाली तो विषय सोडून देणार? आता म्हणे अंनिसवालेही अशाच प्रकारच आंदोलन करणार आहेत.अहो,तुम्हाला तर देव मान्य नाहीये ना? मग देवळात प्रवेश मिळाला काय किंवा नाही मिळाला काय तुम्हाला कसा फरक पडतोय? उगाच कोणीही उठायचं,काहीही करायचं,वरून हिंदूंना असहिष्णू ठरवायचं.तृप्ती देसाई यांनी सर्व नियम झुगारून,श्रद्धा लक्षात न घेता जे केलय ते आम्ही हिंदूंनी सहन केल ना? मग आम्ही असहिष्णू कसे? तृप्ती देसाईंनी हेच आंदोलन एखाद्या मशिदीत किंवा दर्ग्यात प्रवेशासाठी कराव.पाहूयात कोण सहन करत ते.
हिंदू धर्मात स्त्रियांना मानसन्मान आहे.त्यामुळे दुष्काळासारखे गंभीर विषय सोडून किंवा हुंडाबळी,महिला अत्याचार,महिला सुरक्षा असे महिलांचे महत्वाचे प्रश्न सोडून ही असली आंदोलने हवीतच कशाला?
जय महाराष्ट्र..!
No comments:
Post a Comment