Thursday, 7 April 2016



“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

गोंधळात गोंधळ..!

लोकशाही नावाचा बाजार..!

गेले अनेक दिवस हिंदुस्थान आणि महाराष्ट्रात काय चालू आहे हे ब्रह्मदेवालाही समजत नसेल.जेएनयु काय,तो कन्हैय्या काय,तो ओवेसी काय,वंदेमातरम् आणि भारत माता की जय वरून वाद काय? छे,छे..गेल्या ६८ वर्षात देशाची एवढी बेअब्रू कधीच झालेली नव्हती.देशासमोर प्रमुख समस्या काय आहेत?देशाचा विकास कोणत्या गतीने व्हायला हवा आणि तो कोणत्या गतीने व्हायला हवा? प्रचंड बहुमताने निवडून आलेले आणि “पार्टी विथ डिफरन्स”ची पाटी मिरवणाऱ्या पक्षाचे सरकार देशात निवडणून आलेले असताना देशात देशद्रोही किडे कसे काय डोके वर काढू पाहत आहेत? या सगळ्याचा नेमका अर्थ काय? मुळात देशात सरकार आही की नाही? नियम-कायदे आहेत की नाही? असतील तर कोणीही उठून काहीही बोलतो,दहशतवाद्याला शहीद ठरवतो,कोणी उठतो आणि भारत माता की जय बोलणार नाही अशी देशद्रोही भाषा वापरतो.जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र अशी ओळख असलेल्या हिंदुस्थानात सध्या लोकशाही नावाचा बाजार भरलेला आहे.

जेएनयु विद्यापीठात काही विद्यार्थी उठतात.“हमें चाहिए आजादी”च्या घोषणा देतात.कसली आजादी? कसलं स्वातंत्र्य? विरोध केला की अभिव्यक्ती स्वातंत्र्य,लोकशाही अशी कारणे द्यायची.अरे कसली आलीय लोकशाही आणि कसले आलेत कायदे? जी लोकशाही आणि जे कायदे देशाचा मान न राखणाऱ्यांना काहीच करू शकत नाहीत तर त्यांचा उपयोग काय? तो ओवेसी आणि त्याच्या हिरव्या अळ्याही विनाकारण डोके वर काढत आहेत.त्याचं काय तर म्हणे वंदेमातरम् आणि भारत माता की जय बोलणार नाही,मग जा ना पाकिस्तानात.कोणी अडवलंय? जो हिंदुस्थानात राहतो आणि वंदेमातरम्,भारत मत की जय बोलणार नाही असेल म्हणतो त्यांना या हिंदुस्थानात जागा नाही,अजिबात नाही.हे कमी म्हणून यावर कळस लोकशाहीच्या बाजाराचा.विरोध करायचा म्हटल तर म्हणे संविधानात कुठे लिहिलंय ते दाखवा.ज्या देशात राहतो त्या देशाचा जयजयकार करावा हे घटनेत लिहायची काय गरज आहे? घटनेत तस करू नका असं तरी कुठे लिहिलंय? उगाच घटनेचा आधार घ्यायचा.लोकशाहीच्या बाजारात देशद्रोह खपवायचा.आता याचा बाजार उठवायलाच हवा.यांना बाराच्या भावात पाठवा.सरकारला जमणार नसेल तर त्यांनी खुर्च्या सोडाव्यात.बास झाल आता.किती सहन करायचं आणि काय काय सहन करायचं?

विशेष म्हणजे गेल्या ६८ वर्षात जे घडल नव्हत ते आत्ताच का घडायला लागलं काही कळायला मार्ग नाही.या सगळ्याच्या मागे कोण आहे काही कळत नाही.गेली ६८ वर्षे सगळ सुरळीत होत ना? मग आत्ताच “भारत माता की जय बोलणार नाही”च्या उचक्या कशा काय लागल्या? हे सगळ आपोआप घडतंय, योगायोग आहे की घडवलं जातंय काहीच समजत नाही.या सगळ्या घडामोडी हिंदुस्थानला कलंक लावणाऱ्या आहेत.या सगळ्यावर कारवाई करायला कायदे नसतील किंवा सरकारमध्ये हिंमत नसेल तर सरळ खुर्च्यांना लाथ मारा.अरे पण अस कस होईल? खुर्च्याच तर महत्वाच्या नाहीत का त्यांना देशापेक्षा? विसरलोच की,पण एक लक्षात ठेवा,तुम्हाला जमत नसेल तर देशप्रेमी जनतेला कायदे हातात घ्यावे लागतील.त्याला पर्याय नाही.आमच्या हिंदुस्थानचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही.आता लगेच कायदे सक्षम होतील.देशद्रोही लोकांचा विरोध करणाऱ्या देशप्रेमी लोकांना कायद्याचा बडगा दाखवला जाईल.त्यांना पोलीस मारहाण करतील.तुरुंगात डांबले जाईल.आता तुम्ही म्हणाल असे कसे? अहो हाच तर लोकशाही नावाचा बाजार आहे..!

हे झाल हिंदुस्थानच.महाराष्ट्रात जे चालू आहे ते काय “शिवरायांचा महाराष्ट्र” या बिरुदावलीला शोभणारं आहे? कोणीही
उठतो आणि ओरडतो वेगळा विदर्भ.अजून कोणी उठतो वेगळा मराठवाडा.आता ते प्रकाश आंबेडकर.त्यांनी म्हणे वेगळा कोकण अशी कल्पना मांडली.मग कोणी वेगळा पश्चिम महाराष्ट्र मागेल.मुंबईवर तर पूर्वीपासूनच अनेकांचा डोळा आहे.हे वेगळ करा ते वेगळ करा. अहो..थांबा,थांबा. महाराष्ट्राच्या इतक्या फोडी करून महाराष्ट्राचे काय लोणचे घालायचे आहे का? की तुम्हाला वाटले म्हणून तुमच्या तोंडाची गटारे वाहतील? सगळा गोंधळात गोंधळ.या सगळ्याचा फायदा काय? खोट बोलून,खोट आश्वासन देऊन मते मिळवायची.भाजपने काय केल? त्यांना माहिती आहे,वेगळा विदर्भ सात जन्मात शक्य नाही.अहो पण आश्वासन देऊन मत मिळवायला काय जातय? मत मिळाली की सत्ता मिळते.सत्ता म्हणजे खुर्च्या.झाल की हो.सगळ फिरून फिरून कुठे आलं? सत्तेच्या खुर्चीकडेच ना.तिथेच येणार.देश आणि राज्य नाही फक्त सत्तेच्या खुर्च्या महत्वाच्या आहेत सगळ्यांना.आपणच वेडे आहोत.देशप्रेम आणि महाराष्ट्रप्रेम आपल्यालाच सुचत.कारण ते वेड आपल्या रक्तात आहे.आपल्यावर महाराष्ट्रातल्या मराठी मातीचे संस्कार आहेत आणि हिंदुस्थानाच्या हिंदवी बाण्याचे आपण पाईक आहोत.जे हेच विसरलेत त्यांच काय घेऊन बसलात? अपेक्षा तरी कोणाकडून आणि का ठेवायच्या?

चला.किती आणि काय लिहिणार.सगळाच गोंधळात गोंधळ आहे.ज्या मोदी सरकारला प्रचंड अपेक्षा ठेऊन प्रचंड बहुमताने निवडून दिल त्यांच्याच काळात हे सगळ व्हावं? वाटल नव्हत अस होईल म्हणून असो.अजून ३ वर्ष बाकी आहेत त्यांची.पाहूयात.अपेक्षा नाही,पण आशा ठेउयात.आशा वेडी असते अस म्हणतात.इथे उरलेली ३ वर्षे फुकट गेली तर आशा नाही आपण वेडे आहोत असही वाटेल कदाचित.आपण जर चूक केलीच असेल तर आता शिक्षाही मिळेलच.काय माहिती काय होणार आहे आणि काय नाही? सध्या सगळेच बाकीचे विषय पेटलेले आहेत,आणि दुष्काळासारखा महत्वाचा विषय बाजूला पडलेला आहे.जनतेच्या प्रश्नांचं कोणाला काय पडलंय?



जय महाराष्ट्र..!

No comments:

Post a Comment