“वाघगर्जना”
(माझा आजचा लेख-:)
समाजकार्याचे दुसरे नाव शिवसेना..!
मतांचे सोडा,जनतेचे आशीर्वाद नक्कीच मिळतील..!
गेल्या शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शिवसेनेतर्फे राबवल्या जात असलेल्या हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेंतर्गत संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या २४४ कन्यांचा विवाह थाटामाटात व धुमधडाक्यात लाऊन देण्यात आला.या दिमाखदार सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम के.विद्यासागर राव,शिवसेनाप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे,युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे तसेच इतर शिवसेना नेते आणि शिवसैनिक उपस्थित होते.सामाजिक संकटाची जाणीव ठेऊन आयोजित केल्या गेलेल्या या भव्य विवाहसोहळ्यात जवळपास ५० हजार वऱ्हाडींच्या भोजनाची जंगी व्यवस्था केली गेलेली होती.सोहळ्यासाठी १ लाख तर भोजनासाठी ९० हजार स्क्वेअर फुटांच्या मंडपाची उभारणी केली होती.या सोहळा अविस्मरणीय होण्यासाठी ५००० शिवसैनिकांनी जीवाचे रान केले.
महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ पडलेला आहे.मराठवाड्याचे चित्र हे एखाद्या वाळवंटाप्रमाणे झालेले असून पाण्यासाठी जनतेला हाल-हाल सोसावे लागत आहेत.प्यायला पाणी नाही,शेती तर कधीच जळून गेली,बागा नष्ट झाल्या.ज्यावर पोट अवलंबून होते ते सगळेच दुष्काळाने गिळून टाकले.रोजच्या खर्चाला पैसे नाहीत.अशा परिस्थितीत लेकीचे लग्न कसे करायचे? त्यासाठी लागणारा पैसा कुठून उभा करायचा? अशा एक ना अनेक प्रश्नावर उत्तरच नव्हे तर उपाय घेऊन शिवसेना सध्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावत आहे.दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या कन्यांच्या विवाहाची जबाबदारीच शिवसेनेने आपल्या खांद्यावर घेतली आहे.याचा पहिला टप्पा परभणीत ३३३ जोडप्यांच्या दिमाखदार विवाह सोहळ्याच्या रूपाने पार पडला.नुकत्याच पार पडलेल्या संभाजीनगर येथील दिमाखदार विवाह सोहळ्यात हिंदू,मुस्लीम,बौद्ध अशा विविध धर्माच्या २४४ जोडप्यांचा विवाह त्या-त्या धर्माच्या रिती-रिवाजाप्रमाणे पार पडला.त्यामुळे शिवसेनेतर्फे लावल्या गेलेल्या विवाहांची संख्या ५७७ वर जाऊन पोहोचली आहे.आगामी काळात शिवसेना असे अनेक सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करेल आणि हि संख्या १००० च्या पुढे जाईल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केला आहे.
या विवाह सोहळ्यात सहभागी वधूंना मणी,मंगळसूत्र,जोडावे,पैंजण आणि नथ असा सौभाग्य अलंकारांचा आहेर “मातोश्री”तून दिला जातोय.त्याचप्रमाणे वधूस एक पैठणी,एक हळदीची साडी दिली जात असून वरास एक सफारी सूटही देण्यात येतोय.त्याचप्रमाणे कपात,पलंग,गाडी,घड्याळ,पंखा,कुकर अशा तब्बल ७३ संसारोपयोगी वस्तूंही नवविवाहितांना देण्यात येत आहे.या सोहळ्यातील भोजन व्यवस्था उत्तम असून एकूण सोहळाच शिस्तबद्ध आणि आखीव,रेखीव,योजनाबध्द असा असल्याने हा सोहळा म्हणजे व्यवस्थापन कौशल्याचे उत्तम उदाहरण ठरत आहे.या सोहळ्यास दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.दुष्काळ पडला-दुष्काळ पडला अशी ओरड करत काय करायचे,कसे करायचे,हे कसे होणार,ते कसे होणार अशी चर्चा करत बसणाऱ्या लोकांसमोर शिवसेनेच्या या विवाह सोहळ्याने उत्तम उदाहरण ठेवले आहे.हा सोहळा म्हणजे शिवसेना गेल्या ५० वर्षांपासून करत असलेल्या समाजकार्याचे पुढचे पाउल आहे.
शिवसेनेची स्थापनाच मुळी सामान्य माणसाच्या न्याय,हक्क व सेवेसाठी झालेली आहे.पुढे जनसेवेसाठीच राजकारणात उतरलेल्या शिवसेनेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला ८०% समाजकारण आणि २०% राजकारण हा मंत्र आजही कायम आहे.शिवसेनेतर्फे यंदाच नव्हे तर गेली अनेक वर्षे दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे कार्य अविरत सुरु आहे.दुष्काळग्रस्तांना धान्य,पाणी,आर्थिक मदत तसेच चार छावण्या अशा अनेक स्वरुपात मदत करून शिवसेना दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे आणि त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचे काम करत आहे.अनेकदा राजकीय पक्ष विरोधी पक्ष म्हणून काम करत असताना अशी कामे करताना पहालायला मिळतात.तेच राजकीय पक्ष सत्ता मिळताच जनतेला विसरून जातात.शिवसेना मात्र याला अपवाद ठरली आहे.
दुष्काळग्रस्त बांधवांसाठी अनेक योजना राबवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी बाळासाहेबांचा समाजकार्याचा वारसा जपलेला आहे.शिवसेनेच्या हा निस्वार्थ समाजसेवेच्या व्रताकडे पाहून समाजकार्याचे दुसरे नाव शिवसेना असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.शिवसेना फक्त मतांसाठी समाजकार्याचा दिखावा करून सत्ता मिळवण्यासाठी कार्य करत नाही तर सत्तेत असतानाही जनतेसोबत साहून जनतेच्या व्यथा मांडण्याचे आणि त्यावर शक्य तितक्या उपाययोजना करण्याचे काम शिवसेना करते.मतांचे सोडा,या समाजकार्यामुळे,आणि निस्वार्थ समाजसेवेमुळे शिवसेनेला जनतेचे आशीर्वाद नक्कीच मिळतील आणि जनतेचा आशीर्वाद ज्यांना लाभला आहे त्यांची सत्ता यायला असा कितीसा वेळ लागणार आहे?
जय महाराष्ट्र..!
No comments:
Post a Comment