Sunday, 31 January 2016


“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

मुंबई आपलीच पण..

चला,उठा..भगव्यासाठी लढा..!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीस अद्याप १ वर्षाचा कालावधी बाकी असला तरी काही उतावळ्या नवऱ्यांनी आत्तापासूनच बाशिंग बांधून वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे,मात्र तोंडाच्या वाफा दवडून वातावरण तापवता येत नाही याचा त्यांना विसर पडलेला असल्याचे चित्र आहे.काँग्रेस उपाध्यक्ष राहून गांधी यांचा मुंबई दौराही मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेससाठी महत्वाचा मानला गेला.यावेळी राहुल यांनी मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आणण्याबाबत कार्यकर्त्यांना आवाहन केले.त्यानंतर जागतिक दर्जाचा सर्वात मोठा पक्ष (जरी दिल्ली,बिहार आणि कल्याण-डोबिंवलीत तोंडावर आपटला असला तरी) असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवेंची फेरनिवड झाली.त्यांनीही मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याची गर्जना (पोकळ का असेना) केली.

या सर्व गोष्टींवरून काय समजते? तर फेब्रुवारी २०१७ मधील आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधक आत्तापासूनच तयारीला लागलेत.यात काँग्रेस-राष्ट्रवादी या परक्यांचा,मनसेवाल्या घरच्यांचा आणि मित्रवर्य (स्वार्थी का असेनात) म्हणवल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा प्रामुख्याने समावेश असेल.स्वबळावर महाराष्ट्र जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर केवळ शिवसेनेच्या पाठींब्यावर सत्तेत असलेले,कल्याण-डोंबिवलीत वाघाचे दात मोजण्याच्या नादात वाघाच्या पंज्यात सापडलेले आणि मुंबई,ठाणे यांसारख्या महानगरपालिकांमध्ये आजवर केवळ शिवसेनेच्या कृपेने उपमहापौर पदापर्यंत मजल मारू शकलेले भारतीय जनता पक्षवाले आज स्वबळावर मुंबई जिंकण्याची भाषा करत आहे.याचा अर्थ असाच आहे की मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ येताच भाजप पुन्हा दगाबाजी करणार आणि नसलेल्या स्वबळाची ताकद आजमावण्याच्या नादात तोंडावर आपटणार.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसोबत ठाणे,पुणे,नाशिक,नागपूर,सोलापूर या महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकाही आहेत.यांतील मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांवर गेल्या अनेक वर्षांपासून भगवा फडकत आहे,तसाच तो यंदाही फडकणार यात काहीही शंका नाही.नाशिक मनपावरही यापूर्वी शिवसेनेचीच सत्ता होती.मागील निवडणुकीत शिवसेनेची संधी हुकली असली तरी आता जनतेने आत्ताच्या सत्ताधाऱ्यांचे ढोंग ओळखलेले आहे.त्यामुळे नाशिक मनपावरही भगवाच फडकणार आहे.पुण्यात सर्व आठ आमदार भाजपचे असले तरी शिवसेनेचे कार्य जोमात सुरु आहे.त्यामुळे यंदा पुणे महापालिका निवडणुकीत भगवा फडकवण्याची संधी आहे.पुणे हे शिवसेनाप्रमुखांचे जन्मस्थान आहे,त्यावर भगवाच फडकायला हवा.आता राहिला प्रश्न तो नागपूर आणि सोलापूरचा.नागपूर हा संघ आणि भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरचेच आहेत.केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही नागपूरचेच आहेत.त्यामुळे भाजप ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवणार.सोलापूर मनपातही शिवसेनेला सत्ता काबीज करून परिवर्तन करण्याची संधी आहे.या संधीचे सोने करण्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच जीवाचे रान करायला हवे.

२०१७ च्या या महापालिका निवडणुकांनंतर ऑक्टोबर २०१९ चाब विधानसभा निवडणुकीस केवळ अडीच वर्षांचा कालावधी उरतो.त्यामुळे २०१९ साली जर शिवसेनेचे १५० पेक्षा जास्त आमदार महाराष्टातून निवडणून आणून महाराष्ट्रावर शिवसेनेची एकहाती सत्ता आणायची असेल तर या सर्वच्या सर्व महापालिका जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान करायला हवे.मुंबई-ठाणे निवडणुकीत सत्ता राखत असताना पुणे,नाशिक,नागपूर,सोलापूर या महानगरपालिका निवडणुकांकडे शिवसेनेचे दुर्लक्ष होता कामा नये.सर्व शक्ती पणाला लावून मुंबई महापालिकेत उतरायचे.शिवसेनेला चहूबाजूंनी घेरायचे.शिवसेनेला मुंबईत अडकवून ठेवायचे आणि बाकी शहरांच्या निवडणुका सोप्या करायच्या असा डाव भाजपवाले खेळू शकतात.यासाठीच त्यांनी आत्तापासूनच मुंबई मनपा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून आरोप-प्रत्यारोप सुरु केले आहेत.शिवसैनिकांनी त्याकडे दुर्लक्ष करून शिवसेनेनी केलीली कामे मुंबईकरांपर्यंत पोहोचवावीत. मुंबईकर त्याची पोचपावती नक्कीच देतील.मुंबईत शिवसेनेचा पराभव करणारा अजून जन्माला यायचा आहे.

मुंबई आपलीच आहे पण ती राखण्याच्या नादात बाकीच्या महापालिकांच्या निवडणुकांकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही.भाजपचा डाव जर उधळायचा आणि उलटवायचा असेल तर शिवसेनेन नागपूर महापालिका निवडून प्रतिष्ठेची करायला हवी.जिद्दीने नागपूर महापालिकेत भाजपला घेरायला हवे आणि तिथेच रोखायला हवे.शत्रूच्या बलस्थानावर हल्ला करून विजय मिळवल्यास शत्रू आपोआपच लुळा-पांगळा होईल आणि सर्वच महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकेल.हे घडण अवघड असेल पण अशक्य अजिबात नाही.आपण शिवसैनिकांनी एकजुटीने,जिद्दीने ताकद लावली तर नागपूर महापालिकेवरही भगवा फडकू शकतो.तेवढी ताकद नक्कीच बाळासाहेबांनी आपल्याला उभारून दिली आहे.हे प्रत्यक्षात आल्यास २०१९ साली शिवसेनेचे १५० पेक्षा जास्त आमदार निवडणून आणणे जड जाणार नाही.२०१९ साली लोकसभेत सर्व ४८ आणि विधानसभेत दीडशेच नव्हे तर सर्व २८८ जागा जिंकण्याचे ध्येय शिवसैनिकांनी ठेवायला हवे आणि पेटून उठायला हवे.आत्तापर्यंत झाल तेवढ खूप झाले,इथून पुढे महाराष्ट्रावर फक्त भगवा आणि भगवाच फडकायला हवा,इतर कोणतही फडक फडकता कामा नये.हे प्रत्यक्षात आणायचं असेल तर रक्ताचं पाणी करावं लागेल आणि त्याची सुरुवात याच क्षणापासून करायला हवी.तेव्हा चला,उठा..भगव्यासाठी लढा..!

जय महाराष्ट्र..!


Saturday, 30 January 2016







“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

शिवशाहीची झलक..!

परिवहनचे परिवर्तन..!

मागच्या शनिवारी हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन होता.त्याचे औचित्य साधून महाराष्ट्राचे परिवहन मंत्री,एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी बाळासाहेबांच्या नावाने तब्बल सात योजनांची घोषणा केली.या सर्व योजनांचे लोकार्पण २३ जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.आजवर असुविधांमुळे सतत टीकेचे लक्ष बनत महामंडळाला आलेल्या एसटी महामंडळाला या नव्या ७ योजनांमुळे जणू संजीवनीच मिळाली.एसटी कर्मचारी आणि प्रवाशांना सुखद धक्का देणाऱ्या या योजनांमुळे महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या शिवशाहीची झलक पाहायला मिळाली.

“लाल डबा” अशी ओळख बनलेल्या एसटीचे रुपडे आणि सेवेचा दर्जा बदलून एसटी बसेसना अत्याधुनिक करण्यासाठी त्याचप्रमाणे खासगी वाहतुकीला शह देण्यासाठी तसेच सर्वसामान्य प्रवाशाला वातानुकूलित बससेवा परवडावी हे लक्षात घेऊन “शिवशाही” ही वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसमध्ये वायफाय, चार्जर्स, स्लीपर कोच तसेच बेडशीट, हॅण्ड टॉवेल, उशी, ब्लँकेट अशा सुविधा असतील.या बसेस एप्रिल २०१६पासून रस्त्यावर धावतील.या योजनेप्रमाणेच “बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना” ही सुरु करण्यात आली आहे. एसटी कर्मचार्‍याच्या मुलीच्या लग्नासाठी बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत १ लाख रुपयांचा निधी मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर देण्यात येणार आहे. १ एप्रिल २०१६पासून पुढे जन्मास येणार्‍या कन्यांच्या नावाने १७ हजार ५०० रुपये एसटी बँकेत ठेवण्यात येतील.

एसटी कर्मचार्‍यांना औषधोपचार देता यावेत यासाठी पुणे येथे बाळासाहेब ठाकरे अतिविशेषोपचार रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) उभारण्याची योजनाही यावेळी जाहीर झाली.दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीला बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेंतर्गत ऑटोरिक्षा परमिट देण्यात येणार असून ऑटोरिक्षा घेण्याकरिता १०० टक्के कर्जपुरवठा देखील करण्यात येणार आहे.नवीन रिक्षा परवान्यासाठी ऑनलाइन लॉटरीत महिलांना ५ टक्के आरक्षण देण्यात येणार असून महिलांकरिता रिक्षांना अबोली रंग देण्यात येणार आहे.तसेच नवी मुंबई येथे २४० विद्यार्थी क्षमता असलेले बाळासाहेब ठाकरे ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग महाविद्यालय देखील उभारण्यात येणार असून त्यात एसटी कर्मचार्‍यांच्या मुलांना प्रवेश देण्याची योजनाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या जयंतीदिनी जाहीर केली गेली.

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून एसटी कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे उत्पन्न ६ कोटी २३ लाख ३१ हजार ४८९ इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत असल्याची घोषणाही परिवहनमंत्री रावते यांनी यावेळी केली.एसटी अपघातग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणाऱ्या रकमेतही वाढ करण्याची योजनाही यावेळी जाहीर केली गेली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजने अंतर्गत एसटी अपघातात प्रवासी मृत झाल्यास त्याच्या वारसांना १० लाख रुपयांचा विमा देण्यात येणार आहे.कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीस ५ लाख,अंशत: अपंगत्व आल्यास २ लाख ५० हजार तर तात्पुरते अपंगत्व आलेल्या व्यक्तीस १ लाख रुपये देण्यात येणार आहेत,मात्र या योजनेसाठी लागणारा निधी उभारण्यासाठी सरसकट तिकिटावर १ रुपयाचा अधिभार देखील लावण्यात येणार आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलेल्या या ७ योजनांमुळे “परिवहनचे परिवर्तन” होणे सुनिश्चित आहे.शिवाय दिवाकर रावते यांनी महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप सरकारमधील इतर खात्यांच्या मंत्र्यांपेक्षा एक पाउल पुढे जात एसटी महामंडळाचा कायापालट करण्याची सुरवात केल आहे.शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर भाजपने शिवसेनेला बोगस आणि निरुपयोगी खाती दिली असल्याची टीका झाली होती,मात्र शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी आपल्या कामाद्वारे परिवहन खात्यास प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.ज्या खात्यास पैसा खाण्याच्या दृष्टीने निरुपयोगी समजले जाते तेच खाते किती लोकोपयोगी ठरू शकते हेही त्यांनी दाखवू दिले आहे.त्यामुळे तमाम शिवसैनिकांना या कार्याचा सार्थ अभिमान आहे.

जय महाराष्ट्र..!

Sunday, 17 January 2016



“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

माय मराठीचे दुर्दैव..!

वादाविना साहित्य संमेलन व्हावे..!

सध्या पिंपरी-चिंचवड येथे ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे.माय मराठीच्या वैभवाचा हा सोहळा आता शतकाकडे वाटचाल करत आहे.माय मराठीची व्याप्ती मांडणारा हा “साहित्य उत्सव” म्हणजे मराठीप्रेमी जनतेसाठी पर्वणीच असतो.आजकाल मात्र या साहित्य उत्सवास नेहमीच वादाचे गालबोट लागण्याचा प्रकार पाहायला मिळत आहे.या ना त्या कारणाने झालेल्या वादांमुळे साहित्य संमेलनापेक्षा इतर गोष्टींनाच जास्त महत्व प्राप्त होत आहे.अनेकजण आपल्या स्वार्थापोटी अथवा प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एखादी वादग्रस्त आणि असंबद्ध भूमिका मांडून प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे साहित्य संमेलनाचा खेळखंडोबा होतो.नाहक होणाऱ्या वादांमुळे अनेकजण साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवतात.साहित्य संमेलन शतकाकडे वाटचाल करत असताना वाढत जाणाऱ्या वादाच्या प्रकारांमुळे साहित्य संमेलनाची शान धोक्यात आली आहे.

यंदाच्या साहित्य संमेलनाच्या या उत्सवास चक्क साहित्य संमेलन अध्यक्ष म्हणून निवडल्या गेलेल्या श्रीपाल सबनीस यांनीच वादाचे गालबोट लावले.हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाक दौऱ्याबद्दल बोलताना सबनिसांनी अनेकदा पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केला.एका कार्यक्रमातील आपल्या भाषणात सबनिसांनी “दहशतवाद नष्ट करण्यासाठी गांधी-बुद्धाच नाव घेत मोदी सगळीकडे बोंबलत फिरतोय,पाकिस्तानात नवाझ शरीफांना भेटायला जाण हे तर मरायचच लक्षण होत,तिकडे हाफिज सईद आहे,दाउद आहे,दहशतवाद्यांचे अड्डे आहेत,कुणाची गोळी लागली असती,बॉम्बगोळा पडला असता,तर नरेंद्र मोडी एका दिवसात संपला असता आणि मंगेश पाडगावकरांच्या आधी मोदींचीच शोकसभा घ्यायला लागली असती” अस वादग्रस्त वक्तव्य करत मुक्ताफळ उधळली.पंतप्रधान मोदींच्या समर्पण वृत्तीच कौतुक करताना कल्पनाविलासाचा तोल सांभाळता न आल्यामुळे सबनीस मोदींबद्दल नको ते बोलून बसले अन त्यामुळे वादाला तोंड फुटले.सबनीस हे अध्यक्षपदाच्या निवडीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतानाच त्यांच्या या वक्तव्यामुळे साहित्य संमेलन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बदलण्याच्या मागणीनेही जोर धरला.

सबनिसांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका झाली.भाजपा कार्यकर्त्यांसह अनेकांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला.रामदास आठवलेंनी तर सबनिसांनी माफी न मागितल्यास थेट संमेलनच उधळून लावण्याचा इशारा दिला.भाजप कार्यकर्त्यांनीही असेच इशारे दिले,मात्र सबनिसांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले.लातूर येथे “मसाप”च्या सत्कार सोहळ्यात बोलताना सबनिसांनी पंतप्रधान मोदी यांचा एकेरी उल्लेख हा आदरभावातूनच केलेला आहे.हे माझे राष्ट्रीय प्रेमच असून मी माझ्या विधानावर ठाम आहे. त्यामुळे कदापि माफी मागणार नाही. जर कुणाला मी चूक केली आहे असे वाटत असेल तर मला शासनाने मंत्रालयात फाशी द्यावी अशी भूमिका घेत आपल्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन केले.आपल्याविरोधातील जनमत आणि वाढता रोष पाहून अखेर सबनिसांनी यु-टर्न घेत लेखी पत्राद्वारे मोदींची माफी मागितली.आधी उद्दामपणा करणाऱ्या सबनिसांनी अखेर आपले शब्द मागे घेत सपशेल शरणागती पत्करली.

सबनिसांच्या लेखी माफीनाम्यामुळे वाद शमला आणि साहित्य संमेलनास सुरुवात झाली.साहित्य संमेलन सुरळीत पार पडेलही मात्र या प्रकारामुळे मराठी साहित्य संमेलनाची झालेली नाचक्की कशी भरून निघणार? सबनीस यांची साहित्य संमेलन अध्यक्षपदी झालेली निवड हाच वादाचा विषय आहे.आजवर मराठी साहित्य संमेलनास इतका वैचारिक दिवाळखोर अध्यक्ष मिळाला नव्हता आणि यापुढेही मिळू नये.सबनीसांचे एकंदरीत वागणे-बोलणे पाहता त्यांचा आणि अकलेचा आजवर कधीच संबंध आला नसावा असे वाटते.असा वादग्रस्त माणूस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालाच कसा हाही संशोधनाचा विषय आहे. अमृताशीही पैजा जिंकणारी भाषा म्हणून लौकिक असलेल्या मराठी भाषेच्या इतक्या मोठ्या साहित्य उत्सवाच्या अध्यक्षपदी सबनीसांची निवड झाली हेच मुळात माय मराठीचे दुर्दैव आहे.

सबनीसांचे प्रकरण नवे असले तरी साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण मात्र जुनेच आहे.मराठीची महती सांगणाऱ्या साहित्य संमेलनाची प्रतिष्ठा जर कायम ठेवायची असेल तर वादाविना साहित्य संमेलन व्हावे.त्यासाठी सर्व साहित्यिकांसह माय मराठीच्या सर्वच लेकरांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.अन्यथा जगाला हेवा वाटावा अशा या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची प्रतिष्ठा आपल्या डोळ्यांदेखत धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही.

जय महाराष्ट्र..!

Sunday, 10 January 2016

“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

जीवघेणे खुळ..!

शिवसैनिकाचे शौर्य..!

हल्लीच्या युगातील तरुणाईस फोटोचे अत्यंत वेड लागलेले आहे.त्यातच “सेल्फी” या नव्या छायाचित्र टिपण्याच्या प्रकाराने तर आजच्या तरुणाईला अक्षरशः अजगराचा विळखाचं घातलेला आहे.कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो हे वाक्य आता सेल्फीवेड्यांच्या बाबतीतही खरं ठरताना दिसत आहे.रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकदा सेल्फी टिपून ती सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड करणे हा अनेकांच्या जीवनातील नित्य दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनलेला आहे.आजच्या तरुणाईकडे सेल्फी काढण्यासाठी काही विशेष कारण असणे गरजेचे आहे असे नाही.तसेच सेल्फी काढताना वेळ,काळ,प्रसंग यापैकी कोणतीच गोष्ट लक्षात घेतली जात नाही.अनेकदा पर्यटनासाठी गेल्यानंतर पर्यटनस्थळी सेल्फी काढत असताना पोहोचण्यास कठीण अथवा धोकादायक अशा जागांची निवड केली जाते.त्यावेळी संभाव्य धोक्याची जाणीव असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.अशा सेल्फी काढून त्यावर लाईक आणि कमेंट्स मिळवणे यास आजकालचे सोशल मिडियावीर शौर्य आणि पराक्रम समजतात.

आजकाल तरुणीच्या डोक्यात एखादे खुळ गेले की त्यासाठी आजची तरुणाई वेडी होते.तसेच हे सेल्फीचे खुळ डोक्यात गेल्यापासून तरुणाई वेडी झाली आहे.मागे एखाद्याच्या अंत्ययात्रेत गेल्यानंतर काढून अपलोड केल्या गेलेल्या सेल्फीवर टीकेचा भडीमार झाला होता.महानायक अमिताभ बच्चन यांनीही या असंवेदनशील प्रकारावर टीका केली होती.सेल्फी काढण्यासाठी धोकादायक ठिकाणांची निवड केली जात असल्याने आणि सेल्फी काढताना भान हरवून जात असल्याने आजच्या तरुणाईसाठी सेल्फी हे “जीवघेणे खुळ” बनले आहे.सेल्फी काढताना धरणाच्या पाण्यात पडल्याने बुडून काही युवकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.बेभान वर्तणूक हे यामागील प्रमुख कारण आहे.

काल मुंबईतील बॅण्डस्टँड समुद्रकिनारी गेलेल्या तीन तरुणीही सेल्फी काढत असताना पाण्यात पडल्या.काल सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.बॅण्डस्टँड समुद्रकिनारी तीन तरुणी बुडत असल्याचे दिसताच शिवसेना गटप्रमुख रमेश वळंजू यांनी जीवाची पर्वा न करता भरतीच्या प्रचंड लाटांशी झुंज देऊन दोन तरुणींना वाचवले.यानंतर तिसर्याच तरुणीलाही वाचवण्याचा प्रयत्न केला,पण दुर्दैवाने एका जोरदार लाटेने वळंजू यांना समुद्रात खेचले.अद्याप त्यांचा शोध लागला नाही.एका जिगरबाज शिवसैनिकाच्या अतुलनीय शौर्याचे सगळीकडे कौतुक होत आहे.बॅण्डस्टँडजवळील जाफर बुवा कॉलनीत राहणारे रमेश वळंजू हे सीमा अपार्टमेंटमध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत असून काल सकाळी नेहमीप्रमाणे ते कामावर जात होते,मात्र समुद्रात तरुणी बुडत असल्यामुळे सुरू असलेला आरडाओरडा त्यांच्या कानी पडला.त्यामुळे त्यांनी समुद्रकिनारी धाव घेतली.गर्दीतील प्रत्येकजण केवळ आरडाओरडा करीत होता;मात्र बुडणार्याह तरुणींना वाचवण्यासाठी कोणीच पुढे जात नव्हते.यावेळी वळंजू यांनी थेट समुद्रात उडी टाकून दोन तरुणींना वाचवले,मात्र तिसर्याक तरुणीला वाचवताना ते स्वत:ही बुडाले.सेल्फीवेड्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना जिगरबाज शिवसैनिक रमेश वळंजू बेपत्ता झाले.स्वतःच्या जीवाची परवा न करता रमेश वळंजू यांनी बॅण्डस्टँड समुद्रकिनारी बुडणाऱ्या तरुणींना वाचवायचे सोडून बघ्याची भूमिका घेतलेल्या गर्दीला शिवसैनिकाचे शौर्य दाखवून दिले.

जम्मू येथे किल्ल्याच्या उंच भागी जाऊन सेल्फी काढताना तोल जाऊन पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे उदाहरणही ताजे आहे.याशिवाय ४ नोव्हेंबर रोजी एका शाळकरी मुलाने लोकलच्या टपावर चढून सेल्फी काढण्याच्या नादात आपला जीव गमावलेला होता.त्यापूर्वी २० जुलै २०१५ रोजी नाशिकमध्ये दोन तरुणांचा सेल्फी काढताना धबधब्यात बुडून मृत्यू झाला होता.तसेच एप्रिलमध्ये मुंबईत चार तरुण सेल्फी काढण्याच्या नादात धरणात बुडाले होते,तर मार्च महिन्यात नागपूरजवळ एका तलावात सेल्फी काढताना नाव उलटून तब्बल ७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.मागील वर्षात अशा अनेक घटना घडलेल्या असून त्यात कित्येकांनी नाहक आपले प्राण गमावले आहेत.सेल्फीचे वेड जसजसे वाढत जात आहे तसतसे त्यामुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूंचे प्रमाणही वाढतच चालले आहे.

सेल्फी काढत असताना तरुणांनी भान ठेवायला हवे.तसेच सेल्फी काढताना सेल्फी काढायची जागा सुरक्षित असेल तरच त्या जागी जाऊन सेल्फी काढावी.तसेच सेल्फी काढताना वेळ,काळ आणि प्रसंगाचेही भान ठेवायला हवे.सेल्फी काढताना काहीतरी “एक्स्ट्रा” करण्याच्या नादात आपला जीव गमावण्यात कोणते शहाणपण आहे?

जय महाराष्ट्र..!

Sunday, 3 January 2016

“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)


मोदींच्या पाक दौऱ्याचे “रिटर्न गिफ्ट”..!

पाकला धडा शिकवायलाचं हवा..!

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ डिसेंबर रोजी अचानक पाकिस्तानात गेले होते.आपला अफगाणिस्तानचा दौरा आटोपून मायदेशी निघालेले पंतप्रधान मोदी अचानक पाकिस्तानात पोहोचले.त्यांचे विमान नवी दिल्लीआधी लाहोर विमानतळावर लॅण्ड झाले.नंतर पंतप्रधान मोदी आणि शरीफ दोघेही एका हेलिकॉप्टरमधून थेट शरीफमियाँच्या ‘रायविंड’ या राजेशाही निवासस्थानी गेले.तेथे पंतप्रधान मोदींनी शरीफमियाँना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच शरीफमियाँच्या नातीचा विवाह सोहळा असल्याने तिलाही पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या.अचानक घडलेल्या या घडामोडींमुळे हिंदुस्थानातच नव्हे तर जगभरात खळबळ एकच उडाली.

अफगाणिस्तानचा दौरा संपवून काबूलहून निघतानाच पंतप्रधान मोदी यांनी विमानातूनच ‘ट्विट’ करून पाकिस्तानभेटीची अनपेक्षितपणे घोषणा केली.‘आज पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा वाढदिवस आहे. त्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांच्याशी बोलल्याप्रमाणे दिल्लीला येण्याआधी लाहोरला उतरणार आहे’असे मोदी यांनी जाहीर केले.त्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे हिंदुस्थानी हवाई दलातील बोइंग ७३७ हे विमान संध्याकाळी ४ वाजून २० मिनिटांनी लाहोरच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॅण्ड झाले.त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे आधीपासूनच विमानतळावर हजर होते.मोदी यांनी पाकिस्तानच्या भूमीवर पाय ठेवल्यानंतर शरीफमियांनी गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले.मोदी यांच्या या भेटीवेळी लाहोर विमानतळ ‘नो फ्लाइंग झोन’ बनला होता.देशांतर्गत विमानांचे मार्ग बदलण्यात आले होते.तसेच विमानतळावर आणि सभोवतालच्या परिसरात पोलिसांसोबत पाकिस्तानी सैन्यही तैनात करण्यात आले होते.पंतप्रधान मोदींच्या या अचानक ठरलेल्या पाक दौऱ्यात नेमकी काय चर्चा झाली,कोणत्या विषयांवर खलबत झडली याचा नेमका तपशील अजून समजलेला नसला तरीही या भेटीने पाक सुधारेल अशी शक्यता कमी असूनही तशी भाबडी आशा मात्र काही अंशी निर्माण झाली होती.

पंतप्रधान मोदींच्या या पाक भेटीस ८-१० दिवस होतात न होतात आणि नवीन वर्षाचे आगमन होऊन दोन दिवस होतात न होतात तोच पाकड्या अतिरेक्यांनी हिंदुस्थानवर हल्ला करत हिंदुस्थानी पंतप्रधान मोदींच्या पाक दौऱ्याचे “रिटर्न गिफ्ट” दिले.नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी पाकड्या अतिरेक्यांनी हिंदुस्थानवर केलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात ६ अतिरेक्यांना कंठस्नान घालताना ३ जवानांना बलिदान द्यावे लागले.काल पहाटे साडेतीनच्या सुमारास पंजाबातील पठाणकोटच्या हवाई तळावर ‘जैश-ए-मोहमद’चे खतरनाक दहशतवादी घुसले.पाकिस्तान सीमेपासून अवघ्या ३५ किमीवर असलेल्या पठाणकोटला हिंदुस्थानी एअरफोर्स बेसवर त्यांनी हल्ला केला.हवाई दलाची महत्त्वपूर्ण मिग-२१ विमाने, लढाऊ हेलिकॉप्टर्स, चॉपर्स आणि शस्त्रसाठा हवाई तळावर असूनही आणि परिसरात २४ तास कडेकोट सुरक्षा असतानाही जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी मध्यरात्री ३.३० च्या सुमारास घुसले.आरडीएक्स, स्वयंचलित रायफल्स, ग्रेनाइड बॉम्बचा प्रचंड साठा घेऊन दहशतवादी आले होते.त्यांनी अंदाधुंद हल्ले सुरू केले.आपल्या एनएसजी कमांडोज आणि जवानांनी अतिरेक्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.त्यामुळे दहशतवाद्यांना लंगरच्या ठिकाणापर्यंतच जाता आले.अतिरेक्यांचा हवाई दलाची विमाने आणि धावपट्टीपर्यंत जाऊन हल्ले करण्याचा कट जवानांनी हाणून पाडला.या चकमकीत तीन जवान शहीद झाले. चार दहशतवाद्यांना सकाळी दहापर्यंत यमसदनी पाठविले.काही काळ चकमक थांबली असे वाटत असतानाच पुन्हा हल्ले सुरू झाले.सायंकाळी आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.त्यानंतर रात्री उशिरा उरलेल्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला.

आजही या हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांना शोधण्याचे कार्य चालू करत आहे.सध्यापर्यंत आलेल्या वृत्तानुसार पठाणकोटमध्ये आयईडी स्फोटकाचा बॉम्ब निकामी करत असताना लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार शहीद झाले आहेत.काल झालेल्या हल्ल्यानंतर अजूनही शोध मोहीम सुरु आहे. आणखी दोन अतिरेकी एअरफोर्स स्टेशनमध्ये असण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळालेली आहे.एअरफोर्स स्टेशनमध्ये आजही आईडीचे 2 स्फोट झाले आहेत.त्यात तीन जवान जखमी झाले आहेत.एनएसजी आणि पोलीसांचं पथक एअरफोर्स स्टेशनच्या आत सर्च ऑपरेशन करतं आहे.या हल्ल्यासारखाच हल्ला जुलै २०१५ मध्ये गुरुदासपूर येथे दिनानगर पोलीस ठाण्यावर हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्याचा ‘मास्टर माइंड’ म्हणून ‘जैश-ए-मोहमद’ या संघटनेचा संस्थापक मौलाद मसूद अजहर याचे नाव समोर आले आहे.पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे मिळाले आहेत,अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.या हल्ल्याची पूर्वकल्पना हिंदुस्थानच्या यंत्रणांना होती.त्यामुळेच दहशतवाद्यांचा खातमा करून तो दहशतवादी हल्ला मोडून काढण्यात यश आले असे सांगून ते म्हणाले की, गुप्तचर यंत्रणा उत्तम काम करत असल्याचे त्यावरून स्पष्ट होते.यावर पुढे बोलताना मात्र केंद्रीय गृहमंत्र्यांनी नेहमीचाच कित्त गिरवला.ते म्हणाले की आम्हाला पाकिस्तानसहित शेजारच्या सर्वच राष्ट्रांशी शांतता आणि सलोखा राखायचा आहे;पण हिंदुस्थानवर कोणी दहशतवादी हल्ले करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल.
हिंदुस्थानवर नापाक हल्ले करणाऱ्या पाकला आता सर्वप्रकारे समजावून झाले आहे.दहशतवाद्यांना पाक सरकार पाठीशी घालत असल्याचेही सिद्ध झाले आहे.आता तर मोदींनी पाक पंतप्रधानांची भेटही घेतली आहे,मात्र तरीही पाकचे हिंदुस्थानशी असलेले संबंध वाईटच आहेत हे पठाणकोट हल्ल्याने सिद्ध केले आहे.पाकला प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर “जशास तसे” उत्तर देईल अशा भाषेत हिंदुस्थानी पंतप्रधान आणि गृहमंत्री सुनावत असतात,मात्र प्रत्यक्षात कृती होत नाही.पाकड्या दहशतवाद्यांच्या मनात प्रचंड हिंदुस्थानद्वेष भरलेला आहे.त्यामुळे ते कधीच सुधारणार नाहीत.तसेच पाक सरकारही त्यांना पाठीशी घालत असल्याने पाकच्या हिंदुस्थानविरोधी कारवाया थांबवायच्या असतील तर हिंदुस्थानने पाकला आता धडा शिकवणे गरजेचे आहे.मागील महिन्यात संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या वाढदिवशी “मारण्यापेक्षा मारा” अशा आशयाची भूमिका घेतलेली होती,त्या भूमिकेची त्यांनी अंमलबजावणी करावी.

पाकशी चर्चा,समझोता,क्रिकेट डिप्लोमसी,मिठाईवाटप आता खूप झालं.आता पाकला धडा शिकवायलाचं हवा.आपले हिंदुस्थानी शूरवीर जवान त्यासाठी सज्ज आहेत,पंतप्रधान मोदींनी त्यांना आदेश द्यावेत आणि एकदाच पाकला अशा भाषेत समजावून सांगाव की ज्यामुळे पाक हिंदुस्थानवर कधीच हल्ला करणार नाही किंबहुना तसा विचारही करणार नाही.अन्यथा आजवर जवानांनी दिलेली प्राणांची आहुती व्यर्थ ठरेल.

जय महाराष्ट्र..!