Sunday, 17 January 2016



“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

माय मराठीचे दुर्दैव..!

वादाविना साहित्य संमेलन व्हावे..!

सध्या पिंपरी-चिंचवड येथे ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे.माय मराठीच्या वैभवाचा हा सोहळा आता शतकाकडे वाटचाल करत आहे.माय मराठीची व्याप्ती मांडणारा हा “साहित्य उत्सव” म्हणजे मराठीप्रेमी जनतेसाठी पर्वणीच असतो.आजकाल मात्र या साहित्य उत्सवास नेहमीच वादाचे गालबोट लागण्याचा प्रकार पाहायला मिळत आहे.या ना त्या कारणाने झालेल्या वादांमुळे साहित्य संमेलनापेक्षा इतर गोष्टींनाच जास्त महत्व प्राप्त होत आहे.अनेकजण आपल्या स्वार्थापोटी अथवा प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एखादी वादग्रस्त आणि असंबद्ध भूमिका मांडून प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे साहित्य संमेलनाचा खेळखंडोबा होतो.नाहक होणाऱ्या वादांमुळे अनेकजण साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवतात.साहित्य संमेलन शतकाकडे वाटचाल करत असताना वाढत जाणाऱ्या वादाच्या प्रकारांमुळे साहित्य संमेलनाची शान धोक्यात आली आहे.

यंदाच्या साहित्य संमेलनाच्या या उत्सवास चक्क साहित्य संमेलन अध्यक्ष म्हणून निवडल्या गेलेल्या श्रीपाल सबनीस यांनीच वादाचे गालबोट लावले.हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाक दौऱ्याबद्दल बोलताना सबनिसांनी अनेकदा पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केला.एका कार्यक्रमातील आपल्या भाषणात सबनिसांनी “दहशतवाद नष्ट करण्यासाठी गांधी-बुद्धाच नाव घेत मोदी सगळीकडे बोंबलत फिरतोय,पाकिस्तानात नवाझ शरीफांना भेटायला जाण हे तर मरायचच लक्षण होत,तिकडे हाफिज सईद आहे,दाउद आहे,दहशतवाद्यांचे अड्डे आहेत,कुणाची गोळी लागली असती,बॉम्बगोळा पडला असता,तर नरेंद्र मोडी एका दिवसात संपला असता आणि मंगेश पाडगावकरांच्या आधी मोदींचीच शोकसभा घ्यायला लागली असती” अस वादग्रस्त वक्तव्य करत मुक्ताफळ उधळली.पंतप्रधान मोदींच्या समर्पण वृत्तीच कौतुक करताना कल्पनाविलासाचा तोल सांभाळता न आल्यामुळे सबनीस मोदींबद्दल नको ते बोलून बसले अन त्यामुळे वादाला तोंड फुटले.सबनीस हे अध्यक्षपदाच्या निवडीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतानाच त्यांच्या या वक्तव्यामुळे साहित्य संमेलन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बदलण्याच्या मागणीनेही जोर धरला.

सबनिसांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका झाली.भाजपा कार्यकर्त्यांसह अनेकांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला.रामदास आठवलेंनी तर सबनिसांनी माफी न मागितल्यास थेट संमेलनच उधळून लावण्याचा इशारा दिला.भाजप कार्यकर्त्यांनीही असेच इशारे दिले,मात्र सबनिसांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले.लातूर येथे “मसाप”च्या सत्कार सोहळ्यात बोलताना सबनिसांनी पंतप्रधान मोदी यांचा एकेरी उल्लेख हा आदरभावातूनच केलेला आहे.हे माझे राष्ट्रीय प्रेमच असून मी माझ्या विधानावर ठाम आहे. त्यामुळे कदापि माफी मागणार नाही. जर कुणाला मी चूक केली आहे असे वाटत असेल तर मला शासनाने मंत्रालयात फाशी द्यावी अशी भूमिका घेत आपल्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन केले.आपल्याविरोधातील जनमत आणि वाढता रोष पाहून अखेर सबनिसांनी यु-टर्न घेत लेखी पत्राद्वारे मोदींची माफी मागितली.आधी उद्दामपणा करणाऱ्या सबनिसांनी अखेर आपले शब्द मागे घेत सपशेल शरणागती पत्करली.

सबनिसांच्या लेखी माफीनाम्यामुळे वाद शमला आणि साहित्य संमेलनास सुरुवात झाली.साहित्य संमेलन सुरळीत पार पडेलही मात्र या प्रकारामुळे मराठी साहित्य संमेलनाची झालेली नाचक्की कशी भरून निघणार? सबनीस यांची साहित्य संमेलन अध्यक्षपदी झालेली निवड हाच वादाचा विषय आहे.आजवर मराठी साहित्य संमेलनास इतका वैचारिक दिवाळखोर अध्यक्ष मिळाला नव्हता आणि यापुढेही मिळू नये.सबनीसांचे एकंदरीत वागणे-बोलणे पाहता त्यांचा आणि अकलेचा आजवर कधीच संबंध आला नसावा असे वाटते.असा वादग्रस्त माणूस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालाच कसा हाही संशोधनाचा विषय आहे. अमृताशीही पैजा जिंकणारी भाषा म्हणून लौकिक असलेल्या मराठी भाषेच्या इतक्या मोठ्या साहित्य उत्सवाच्या अध्यक्षपदी सबनीसांची निवड झाली हेच मुळात माय मराठीचे दुर्दैव आहे.

सबनीसांचे प्रकरण नवे असले तरी साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण मात्र जुनेच आहे.मराठीची महती सांगणाऱ्या साहित्य संमेलनाची प्रतिष्ठा जर कायम ठेवायची असेल तर वादाविना साहित्य संमेलन व्हावे.त्यासाठी सर्व साहित्यिकांसह माय मराठीच्या सर्वच लेकरांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.अन्यथा जगाला हेवा वाटावा अशा या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची प्रतिष्ठा आपल्या डोळ्यांदेखत धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही.

जय महाराष्ट्र..!

No comments:

Post a Comment