“वाघगर्जना”
(माझा आजचा लेख-:)
मोदींच्या पाक दौऱ्याचे “रिटर्न गिफ्ट”..!
पाकला धडा शिकवायलाचं हवा..!
हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ डिसेंबर रोजी अचानक पाकिस्तानात गेले होते.आपला अफगाणिस्तानचा दौरा आटोपून मायदेशी निघालेले पंतप्रधान मोदी अचानक पाकिस्तानात पोहोचले.त्यांचे विमान नवी दिल्लीआधी लाहोर विमानतळावर लॅण्ड झाले.नंतर पंतप्रधान मोदी आणि शरीफ दोघेही एका हेलिकॉप्टरमधून थेट शरीफमियाँच्या ‘रायविंड’ या राजेशाही निवासस्थानी गेले.तेथे पंतप्रधान मोदींनी शरीफमियाँना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच शरीफमियाँच्या नातीचा विवाह सोहळा असल्याने तिलाही पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या.अचानक घडलेल्या या घडामोडींमुळे हिंदुस्थानातच नव्हे तर जगभरात खळबळ एकच उडाली.
अफगाणिस्तानचा दौरा संपवून काबूलहून निघतानाच पंतप्रधान मोदी यांनी विमानातूनच ‘ट्विट’ करून पाकिस्तानभेटीची अनपेक्षितपणे घोषणा केली.‘आज पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा वाढदिवस आहे. त्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांच्याशी बोलल्याप्रमाणे दिल्लीला येण्याआधी लाहोरला उतरणार आहे’असे मोदी यांनी जाहीर केले.त्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे हिंदुस्थानी हवाई दलातील बोइंग ७३७ हे विमान संध्याकाळी ४ वाजून २० मिनिटांनी लाहोरच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॅण्ड झाले.त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे आधीपासूनच विमानतळावर हजर होते.मोदी यांनी पाकिस्तानच्या भूमीवर पाय ठेवल्यानंतर शरीफमियांनी गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले.मोदी यांच्या या भेटीवेळी लाहोर विमानतळ ‘नो फ्लाइंग झोन’ बनला होता.देशांतर्गत विमानांचे मार्ग बदलण्यात आले होते.तसेच विमानतळावर आणि सभोवतालच्या परिसरात पोलिसांसोबत पाकिस्तानी सैन्यही तैनात करण्यात आले होते.पंतप्रधान मोदींच्या या अचानक ठरलेल्या पाक दौऱ्यात नेमकी काय चर्चा झाली,कोणत्या विषयांवर खलबत झडली याचा नेमका तपशील अजून समजलेला नसला तरीही या भेटीने पाक सुधारेल अशी शक्यता कमी असूनही तशी भाबडी आशा मात्र काही अंशी निर्माण झाली होती.
पंतप्रधान मोदींच्या या पाक भेटीस ८-१० दिवस होतात न होतात आणि नवीन वर्षाचे आगमन होऊन दोन दिवस होतात न होतात तोच पाकड्या अतिरेक्यांनी हिंदुस्थानवर हल्ला करत हिंदुस्थानी पंतप्रधान मोदींच्या पाक दौऱ्याचे “रिटर्न गिफ्ट” दिले.नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी पाकड्या अतिरेक्यांनी हिंदुस्थानवर केलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात ६ अतिरेक्यांना कंठस्नान घालताना ३ जवानांना बलिदान द्यावे लागले.काल पहाटे साडेतीनच्या सुमारास पंजाबातील पठाणकोटच्या हवाई तळावर ‘जैश-ए-मोहमद’चे खतरनाक दहशतवादी घुसले.पाकिस्तान सीमेपासून अवघ्या ३५ किमीवर असलेल्या पठाणकोटला हिंदुस्थानी एअरफोर्स बेसवर त्यांनी हल्ला केला.हवाई दलाची महत्त्वपूर्ण मिग-२१ विमाने, लढाऊ हेलिकॉप्टर्स, चॉपर्स आणि शस्त्रसाठा हवाई तळावर असूनही आणि परिसरात २४ तास कडेकोट सुरक्षा असतानाही जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी मध्यरात्री ३.३० च्या सुमारास घुसले.आरडीएक्स, स्वयंचलित रायफल्स, ग्रेनाइड बॉम्बचा प्रचंड साठा घेऊन दहशतवादी आले होते.त्यांनी अंदाधुंद हल्ले सुरू केले.आपल्या एनएसजी कमांडोज आणि जवानांनी अतिरेक्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.त्यामुळे दहशतवाद्यांना लंगरच्या ठिकाणापर्यंतच जाता आले.अतिरेक्यांचा हवाई दलाची विमाने आणि धावपट्टीपर्यंत जाऊन हल्ले करण्याचा कट जवानांनी हाणून पाडला.या चकमकीत तीन जवान शहीद झाले. चार दहशतवाद्यांना सकाळी दहापर्यंत यमसदनी पाठविले.काही काळ चकमक थांबली असे वाटत असतानाच पुन्हा हल्ले सुरू झाले.सायंकाळी आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.त्यानंतर रात्री उशिरा उरलेल्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला.
आजही या हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांना शोधण्याचे कार्य चालू करत आहे.सध्यापर्यंत आलेल्या वृत्तानुसार पठाणकोटमध्ये आयईडी स्फोटकाचा बॉम्ब निकामी करत असताना लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार शहीद झाले आहेत.काल झालेल्या हल्ल्यानंतर अजूनही शोध मोहीम सुरु आहे. आणखी दोन अतिरेकी एअरफोर्स स्टेशनमध्ये असण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळालेली आहे.एअरफोर्स स्टेशनमध्ये आजही आईडीचे 2 स्फोट झाले आहेत.त्यात तीन जवान जखमी झाले आहेत.एनएसजी आणि पोलीसांचं पथक एअरफोर्स स्टेशनच्या आत सर्च ऑपरेशन करतं आहे.या हल्ल्यासारखाच हल्ला जुलै २०१५ मध्ये गुरुदासपूर येथे दिनानगर पोलीस ठाण्यावर हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्याचा ‘मास्टर माइंड’ म्हणून ‘जैश-ए-मोहमद’ या संघटनेचा संस्थापक मौलाद मसूद अजहर याचे नाव समोर आले आहे.पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे मिळाले आहेत,अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.या हल्ल्याची पूर्वकल्पना हिंदुस्थानच्या यंत्रणांना होती.त्यामुळेच दहशतवाद्यांचा खातमा करून तो दहशतवादी हल्ला मोडून काढण्यात यश आले असे सांगून ते म्हणाले की, गुप्तचर यंत्रणा उत्तम काम करत असल्याचे त्यावरून स्पष्ट होते.यावर पुढे बोलताना मात्र केंद्रीय गृहमंत्र्यांनी नेहमीचाच कित्त गिरवला.ते म्हणाले की आम्हाला पाकिस्तानसहित शेजारच्या सर्वच राष्ट्रांशी शांतता आणि सलोखा राखायचा आहे;पण हिंदुस्थानवर कोणी दहशतवादी हल्ले करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल.
हिंदुस्थानवर नापाक हल्ले करणाऱ्या पाकला आता सर्वप्रकारे समजावून झाले आहे.दहशतवाद्यांना पाक सरकार पाठीशी घालत असल्याचेही सिद्ध झाले आहे.आता तर मोदींनी पाक पंतप्रधानांची भेटही घेतली आहे,मात्र तरीही पाकचे हिंदुस्थानशी असलेले संबंध वाईटच आहेत हे पठाणकोट हल्ल्याने सिद्ध केले आहे.पाकला प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर “जशास तसे” उत्तर देईल अशा भाषेत हिंदुस्थानी पंतप्रधान आणि गृहमंत्री सुनावत असतात,मात्र प्रत्यक्षात कृती होत नाही.पाकड्या दहशतवाद्यांच्या मनात प्रचंड हिंदुस्थानद्वेष भरलेला आहे.त्यामुळे ते कधीच सुधारणार नाहीत.तसेच पाक सरकारही त्यांना पाठीशी घालत असल्याने पाकच्या हिंदुस्थानविरोधी कारवाया थांबवायच्या असतील तर हिंदुस्थानने पाकला आता धडा शिकवणे गरजेचे आहे.मागील महिन्यात संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या वाढदिवशी “मारण्यापेक्षा मारा” अशा आशयाची भूमिका घेतलेली होती,त्या भूमिकेची त्यांनी अंमलबजावणी करावी.
पाकशी चर्चा,समझोता,क्रिकेट डिप्लोमसी,मिठाईवाटप आता खूप झालं.आता पाकला धडा शिकवायलाचं हवा.आपले हिंदुस्थानी शूरवीर जवान त्यासाठी सज्ज आहेत,पंतप्रधान मोदींनी त्यांना आदेश द्यावेत आणि एकदाच पाकला अशा भाषेत समजावून सांगाव की ज्यामुळे पाक हिंदुस्थानवर कधीच हल्ला करणार नाही किंबहुना तसा विचारही करणार नाही.अन्यथा आजवर जवानांनी दिलेली प्राणांची आहुती व्यर्थ ठरेल.
जय महाराष्ट्र..!
No comments:
Post a Comment