Sunday, 10 January 2016

“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

जीवघेणे खुळ..!

शिवसैनिकाचे शौर्य..!

हल्लीच्या युगातील तरुणाईस फोटोचे अत्यंत वेड लागलेले आहे.त्यातच “सेल्फी” या नव्या छायाचित्र टिपण्याच्या प्रकाराने तर आजच्या तरुणाईला अक्षरशः अजगराचा विळखाचं घातलेला आहे.कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो हे वाक्य आता सेल्फीवेड्यांच्या बाबतीतही खरं ठरताना दिसत आहे.रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकदा सेल्फी टिपून ती सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड करणे हा अनेकांच्या जीवनातील नित्य दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनलेला आहे.आजच्या तरुणाईकडे सेल्फी काढण्यासाठी काही विशेष कारण असणे गरजेचे आहे असे नाही.तसेच सेल्फी काढताना वेळ,काळ,प्रसंग यापैकी कोणतीच गोष्ट लक्षात घेतली जात नाही.अनेकदा पर्यटनासाठी गेल्यानंतर पर्यटनस्थळी सेल्फी काढत असताना पोहोचण्यास कठीण अथवा धोकादायक अशा जागांची निवड केली जाते.त्यावेळी संभाव्य धोक्याची जाणीव असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.अशा सेल्फी काढून त्यावर लाईक आणि कमेंट्स मिळवणे यास आजकालचे सोशल मिडियावीर शौर्य आणि पराक्रम समजतात.

आजकाल तरुणीच्या डोक्यात एखादे खुळ गेले की त्यासाठी आजची तरुणाई वेडी होते.तसेच हे सेल्फीचे खुळ डोक्यात गेल्यापासून तरुणाई वेडी झाली आहे.मागे एखाद्याच्या अंत्ययात्रेत गेल्यानंतर काढून अपलोड केल्या गेलेल्या सेल्फीवर टीकेचा भडीमार झाला होता.महानायक अमिताभ बच्चन यांनीही या असंवेदनशील प्रकारावर टीका केली होती.सेल्फी काढण्यासाठी धोकादायक ठिकाणांची निवड केली जात असल्याने आणि सेल्फी काढताना भान हरवून जात असल्याने आजच्या तरुणाईसाठी सेल्फी हे “जीवघेणे खुळ” बनले आहे.सेल्फी काढताना धरणाच्या पाण्यात पडल्याने बुडून काही युवकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.बेभान वर्तणूक हे यामागील प्रमुख कारण आहे.

काल मुंबईतील बॅण्डस्टँड समुद्रकिनारी गेलेल्या तीन तरुणीही सेल्फी काढत असताना पाण्यात पडल्या.काल सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.बॅण्डस्टँड समुद्रकिनारी तीन तरुणी बुडत असल्याचे दिसताच शिवसेना गटप्रमुख रमेश वळंजू यांनी जीवाची पर्वा न करता भरतीच्या प्रचंड लाटांशी झुंज देऊन दोन तरुणींना वाचवले.यानंतर तिसर्याच तरुणीलाही वाचवण्याचा प्रयत्न केला,पण दुर्दैवाने एका जोरदार लाटेने वळंजू यांना समुद्रात खेचले.अद्याप त्यांचा शोध लागला नाही.एका जिगरबाज शिवसैनिकाच्या अतुलनीय शौर्याचे सगळीकडे कौतुक होत आहे.बॅण्डस्टँडजवळील जाफर बुवा कॉलनीत राहणारे रमेश वळंजू हे सीमा अपार्टमेंटमध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत असून काल सकाळी नेहमीप्रमाणे ते कामावर जात होते,मात्र समुद्रात तरुणी बुडत असल्यामुळे सुरू असलेला आरडाओरडा त्यांच्या कानी पडला.त्यामुळे त्यांनी समुद्रकिनारी धाव घेतली.गर्दीतील प्रत्येकजण केवळ आरडाओरडा करीत होता;मात्र बुडणार्याह तरुणींना वाचवण्यासाठी कोणीच पुढे जात नव्हते.यावेळी वळंजू यांनी थेट समुद्रात उडी टाकून दोन तरुणींना वाचवले,मात्र तिसर्याक तरुणीला वाचवताना ते स्वत:ही बुडाले.सेल्फीवेड्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना जिगरबाज शिवसैनिक रमेश वळंजू बेपत्ता झाले.स्वतःच्या जीवाची परवा न करता रमेश वळंजू यांनी बॅण्डस्टँड समुद्रकिनारी बुडणाऱ्या तरुणींना वाचवायचे सोडून बघ्याची भूमिका घेतलेल्या गर्दीला शिवसैनिकाचे शौर्य दाखवून दिले.

जम्मू येथे किल्ल्याच्या उंच भागी जाऊन सेल्फी काढताना तोल जाऊन पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे उदाहरणही ताजे आहे.याशिवाय ४ नोव्हेंबर रोजी एका शाळकरी मुलाने लोकलच्या टपावर चढून सेल्फी काढण्याच्या नादात आपला जीव गमावलेला होता.त्यापूर्वी २० जुलै २०१५ रोजी नाशिकमध्ये दोन तरुणांचा सेल्फी काढताना धबधब्यात बुडून मृत्यू झाला होता.तसेच एप्रिलमध्ये मुंबईत चार तरुण सेल्फी काढण्याच्या नादात धरणात बुडाले होते,तर मार्च महिन्यात नागपूरजवळ एका तलावात सेल्फी काढताना नाव उलटून तब्बल ७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.मागील वर्षात अशा अनेक घटना घडलेल्या असून त्यात कित्येकांनी नाहक आपले प्राण गमावले आहेत.सेल्फीचे वेड जसजसे वाढत जात आहे तसतसे त्यामुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूंचे प्रमाणही वाढतच चालले आहे.

सेल्फी काढत असताना तरुणांनी भान ठेवायला हवे.तसेच सेल्फी काढताना सेल्फी काढायची जागा सुरक्षित असेल तरच त्या जागी जाऊन सेल्फी काढावी.तसेच सेल्फी काढताना वेळ,काळ आणि प्रसंगाचेही भान ठेवायला हवे.सेल्फी काढताना काहीतरी “एक्स्ट्रा” करण्याच्या नादात आपला जीव गमावण्यात कोणते शहाणपण आहे?

जय महाराष्ट्र..!

No comments:

Post a Comment