“वाघगर्जना”
(माझा आजचा लेख-:)
शिवशाहीची झलक..!
परिवहनचे परिवर्तन..!
मागच्या शनिवारी हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन होता.त्याचे औचित्य साधून महाराष्ट्राचे परिवहन मंत्री,एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी बाळासाहेबांच्या नावाने तब्बल सात योजनांची घोषणा केली.या सर्व योजनांचे लोकार्पण २३ जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.आजवर असुविधांमुळे सतत टीकेचे लक्ष बनत महामंडळाला आलेल्या एसटी महामंडळाला या नव्या ७ योजनांमुळे जणू संजीवनीच मिळाली.एसटी कर्मचारी आणि प्रवाशांना सुखद धक्का देणाऱ्या या योजनांमुळे महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या शिवशाहीची झलक पाहायला मिळाली.
“लाल डबा” अशी ओळख बनलेल्या एसटीचे रुपडे आणि सेवेचा दर्जा बदलून एसटी बसेसना अत्याधुनिक करण्यासाठी त्याचप्रमाणे खासगी वाहतुकीला शह देण्यासाठी तसेच सर्वसामान्य प्रवाशाला वातानुकूलित बससेवा परवडावी हे लक्षात घेऊन “शिवशाही” ही वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसमध्ये वायफाय, चार्जर्स, स्लीपर कोच तसेच बेडशीट, हॅण्ड टॉवेल, उशी, ब्लँकेट अशा सुविधा असतील.या बसेस एप्रिल २०१६पासून रस्त्यावर धावतील.या योजनेप्रमाणेच “बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना” ही सुरु करण्यात आली आहे. एसटी कर्मचार्याच्या मुलीच्या लग्नासाठी बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत १ लाख रुपयांचा निधी मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर देण्यात येणार आहे. १ एप्रिल २०१६पासून पुढे जन्मास येणार्या कन्यांच्या नावाने १७ हजार ५०० रुपये एसटी बँकेत ठेवण्यात येतील.
एसटी कर्मचार्यांना औषधोपचार देता यावेत यासाठी पुणे येथे बाळासाहेब ठाकरे अतिविशेषोपचार रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) उभारण्याची योजनाही यावेळी जाहीर झाली.दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीला बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेंतर्गत ऑटोरिक्षा परमिट देण्यात येणार असून ऑटोरिक्षा घेण्याकरिता १०० टक्के कर्जपुरवठा देखील करण्यात येणार आहे.नवीन रिक्षा परवान्यासाठी ऑनलाइन लॉटरीत महिलांना ५ टक्के आरक्षण देण्यात येणार असून महिलांकरिता रिक्षांना अबोली रंग देण्यात येणार आहे.तसेच नवी मुंबई येथे २४० विद्यार्थी क्षमता असलेले बाळासाहेब ठाकरे ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग महाविद्यालय देखील उभारण्यात येणार असून त्यात एसटी कर्मचार्यांच्या मुलांना प्रवेश देण्याची योजनाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या जयंतीदिनी जाहीर केली गेली.
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून एसटी कर्मचार्यांचे एक दिवसाचे उत्पन्न ६ कोटी २३ लाख ३१ हजार ४८९ इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत असल्याची घोषणाही परिवहनमंत्री रावते यांनी यावेळी केली.एसटी अपघातग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणाऱ्या रकमेतही वाढ करण्याची योजनाही यावेळी जाहीर केली गेली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजने अंतर्गत एसटी अपघातात प्रवासी मृत झाल्यास त्याच्या वारसांना १० लाख रुपयांचा विमा देण्यात येणार आहे.कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीस ५ लाख,अंशत: अपंगत्व आल्यास २ लाख ५० हजार तर तात्पुरते अपंगत्व आलेल्या व्यक्तीस १ लाख रुपये देण्यात येणार आहेत,मात्र या योजनेसाठी लागणारा निधी उभारण्यासाठी सरसकट तिकिटावर १ रुपयाचा अधिभार देखील लावण्यात येणार आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलेल्या या ७ योजनांमुळे “परिवहनचे परिवर्तन” होणे सुनिश्चित आहे.शिवाय दिवाकर रावते यांनी महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप सरकारमधील इतर खात्यांच्या मंत्र्यांपेक्षा एक पाउल पुढे जात एसटी महामंडळाचा कायापालट करण्याची सुरवात केल आहे.शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर भाजपने शिवसेनेला बोगस आणि निरुपयोगी खाती दिली असल्याची टीका झाली होती,मात्र शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी आपल्या कामाद्वारे परिवहन खात्यास प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.ज्या खात्यास पैसा खाण्याच्या दृष्टीने निरुपयोगी समजले जाते तेच खाते किती लोकोपयोगी ठरू शकते हेही त्यांनी दाखवू दिले आहे.त्यामुळे तमाम शिवसैनिकांना या कार्याचा सार्थ अभिमान आहे.
जय महाराष्ट्र..!
No comments:
Post a Comment