Tuesday, 6 November 2018

२०१४ पूर्वी सत्ता नसताना मोदींना समर्थन, २०१४ ला सत्ता आल्यावर मोदींना विरोध नेमका कशासाठी?





लेखक : शशांक देशपांडे 

(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )

“वाघगर्जना: दिवाळी विशेष लेखमाला”

दिवस चौथा – लेख आठवा

२०१४ पूर्वी सत्ता नसताना मोदींना समर्थन, २०१४ ला सत्ता आल्यावर मोदींना विरोध नेमका कशासाठी?

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली. तत्पूर्वी मात्र तब्बल २५ वर्षे टिकलेली ही सर्वात जुनी समविचारी पक्षांची युती होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून अगदी भाजपच्या बरोबरीने शिवसेनेचा मोदींना पाठिंबा होता. मोदींना पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपला अनेक स्वपक्षीय नेत्यांची मनधरणी करावी लागली होती. त्याचबरोबर अनेक मित्रपक्षांचा पाठिंबा मिळावा म्हणून भाजपला प्रयत्न करावे लागले होते.शिवसेनेच्या बाबतीत मात्र तसं फार काही करावं लागलं नाही. एक हिंदुत्ववादी आणी विकासपुरुष असे दोन्ही चेहरे असलेल्या मोदींना शिवसेनेचा एक सक्षम पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पाठिंबा होता. तसं पाहिलं तर गुजरात दंगलीच्या वेळी भाजपचे वरिष्ठ नेतेच मोदींना मुख्यमंत्री पदावरून हटवणार होते, मात्र बाळासाहेबांनी अडवाणी यांना “नरेंद्र मोदी गया, गुजरात गया” असं सांगत मोदींना पाठिंबा दिला होता आणि मोदींची खुर्ची वाचवली होती, तेंव्हापासूनच शिवसेना मोदींच्या पाठीशी उभी होती.

शिवसेना आणि मोदींच हे मित्रत्वाच नातं बिघडायला २०१४ लोकसभेत मोदींना प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मोदींची बदललेली वर्तणूक एवढंच कारण आहे असं अनेकांना वाटत. प्रत्यक्षात तसं नाही. २०१४ पूर्वीचे मोदी “जन की बात ऐकणारे होते” आणि आत्ताचे मोदी हे “मन की बात करणारे” आहेत हे त्यामागच सर्वात मोठं कारण आहे. युती तुटल्याने बिघडलेले संबंध आणि त्यावेळी मोदी-शहा जोडीने सगळा फौजफाटा घेउन शिवसेना संपवण्यासाठी चालून येणं हे सुद्धा काही प्रमाणात शिवसेनेच्या मोदी विरोधास कारणीभूत आहे. त्याचबरोबर मोदी २०१४ च्या लोकसभा निवडणूकित ज्या आश्वासनांवर निवडणून आले ती त्यांनी पूर्ण केली नाहीत आणि म्हणून शिवसेना आज अनेक वेळा मोदींना विरोध करत आहे.

मोदींची २०१४ पूर्वी ५६ इंच असलेली छाती आज ५.६ इंच सुद्धा राहिली नाही. २०१४ पूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पाकला ठणकावणारे मोदी २०१४ ला पंतप्रधान झाल्यापासून पाकिस्तानने आपले जवान मारले तरी शांतच असतात. राममंदिर आणि कलम ३७० यासारखे मुद्दे तर इतक प्रचंड बहुमत असताना मोदी आणि भाजप सरकारने बाजूला ठेवलेले आहेत. २०१४ पूर्वी देशभर फिरणारे मोदी आता देशाबाहेर फिरताना दिसतात. “मेक ईन इंडिया” चा नारा देत मोदींनी भारतात उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न केला, मात्र याच मोदींनी सरदार पटेलांचा “मेड इन चायना” पुतळा उभारला. २०१४ पूर्वी महागाईच्या मुद्द्यावर बोलून सरकारला धारेवर धरणारे मोदी २०१४ नंतर महागाई नियंत्रणात आणू शकले नाहीत.



२०१४ पूर्वी शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्याचे वचन देऊन मतं मागणारे मोदी आता शेतकर्‍यांच्या प्रश्नावर मूग गिळून बसतात. २०१४ पूर्वी एफडीआयला कडाडून विरोध करणार्‍या मोदींनी सत्तेत येताच एफडीआयला मान्यता दिली. २०१४ पूर्वी कश्मीर प्रश्न सोडवतो म्हणणारे मोदी आणि भाजप २०१४ नंतर कश्मीर विधानसभा निवडणुकीनंतर महेबूबा मुफ्तीच्या सरकारमध्ये सामील होते. २०१४ पूर्वी पाकशी चर्चा केल्यावरून मनमोहन सिंग यांना जाब विचारणारे मोदी २०१४ ला अचानक पाक पंतप्रधनाच्या वाढदिवसाचा केक खाऊन आले. २०१४ पूर्वी विकासपुरुष असलेल्या मोदींनी सत्तेवर येताच कॉंग्रेस सरकारच्या योजनांची नावं बदलून त्या नव्या आहेत असं भासवलं. गुजरातच्या मुखमंत्रिपदी असताना “गुजरात विकास मॉडेल” चा गाजावाजा होता. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मात्र “अच्छे दिन” आणि “विकास” कुठे आहेत हे शोधण्याची गरज भासत आहे. २०१४ पूर्वी काळं धन भारतात आणून भ्रष्टाचार्‍यांना तुरुंगात डांबू म्हणणारे मोदी आज नीरव मोदी, विजय मल्ल्या सारखे भामटे देशाचे हजारो कोटी बुडवून देशाबाहेर पळून गेले तरी शांतच आहेत.

या सर्व मुद्द्यांवरुन काय लक्षात येतं? २०१४ पूर्वी सत्ता नसतानाचे मोदी आणि २०१४ ला सत्ता आल्यानंतरचे मोदी  यात जमीन आसमानाचा फरक आहे. मोदी जे बोलले ते करून दाखवू शकले नाहीत आणि सत्तेत येताच त्यांच्या अनेक भूमिकाही बदलल्या.अशी अजून अनेक उदाहरणं सापडतील. शिवसेनेचा २०१४ पूर्वी सत्ता नसताना मोदींना समर्थन, २०१४ ला सत्ता आल्यावर मोदींना विरोध यासाठीच. मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद घेऊन गप्प बसणं शिवसेनेला जमणार नाही. जे पटत नाही तिथे शिवसेना बोलणारच.जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणारच आणि चुकीच्या निर्णयांना/धोरणांना विरोध करणारच. विरोधी पक्षांपेक्षा जास्त प्रभावीपणे शिवसेनेने हे काम देशहितासाठी केलं आहे आणि यापुढेही शिवसेना ते करेल.           


लेखक : शशांक देशपांडे 

(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )



2 comments: