लेखक : शशांक देशपांडे
(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )
“वाघगर्जना: दिवाळी विशेष
लेखमाला”
दिवस सहावा – लेख अकरावा
शिवसेनेकडे विकासाचं व्हिजन आहे?
शिवसेना म्हटलं की डोळ्यासमोर येतो
तो भगवा. शिवसेना म्हटलं की डोळ्यासमोर येतात छत्रपती शिवाजी महाराज, मराठी अस्मिता आणि ज्वलंत हिंदुत्व. शिवसेनेने स्थापनेपासूनच महाराष्ट्राची
अस्मिता जपण्याची भूमिका घेतली असल्याचं दिसून येतं. शिवसेनेने नेहमीच बेळगाव व ईतर
सीमाभागासह अखंड महाराष्ट्र करण्याची भूमिका घेतली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा
डाव केवळ शिवसेनेमुळे सतत अयशस्वी होत आला आहे. शिवसेनेचा वेगळ्या विदर्भाला विरोध
आहे. “बॉम्बे”चं “मुंबई” शिवसेनेनेच केलं. त्याचबरोबर औरंगाबादला
संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशीव इत्यादि नामंतरासाठी शिवसेना
नेहमीच आग्रही राहिली आहे. मराठीसोबतच हिंदुत्वाचा मुद्दाही शिवसेना मतांच्या राजकारणाचा
विचार न करता उचलत असते. हिंदू सण-उत्सव-प्रथा-परंपरा इत्यादींवर घाला येत असेल तर त्याला शिवसेना सक्रिय विरोध करते. शिवसेनेने
महाराष्ट्राचा इतिहास जपण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे. शिवसेना आता राममंदिर निर्माणासाठी
पुढे आली आहे. या सर्व मुद्द्यांमुळे “शिवसेना नेहमीच भावनिक राजकारण करते” अशी टीका
होते. तसेच शिवसेनेला महाराष्ट्राची सत्ता मिळाल्यास शिवसेना
काय करणार? शिवसेनेकडे विकासाचं व्हिजन आहे? असे प्रश्न शिवसेनेला हमखास विचारले जातात.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना
असाच एक प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं
की “शिवसेना हिंदुत्ववादी आहे म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर तो हातात भगवा
घेऊन रानोमाळी भटकत नाही बसणार, तो विकासाचीच कामं करेल.” शिवसेनेचा मुख्यमंत्री
असताना महाराष्ट्रात झालेली विकासकामं पाहिली तर शिवसेनेचं विकासाचं व्हिजन आणि दूरदृष्टी
स्पष्टपणे दिसून येईल. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर
ठेवले होते. गरीबांना उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून केवळ एक रुपयात झुणका-भाकर
मिळणारी योजना आणली होती. मुंबई-पुणे शहरांदरम्यान भविष्यात वाढणारी
वाहतूक आणि दळणवळण लक्षात घेऊन बाळासाहेबांनी “मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे” बनवण्याची
संकल्पना मांडली आणि ती युती सरकारने प्रत्यक्षात आणून दाखवली. वांद्रे-वरळी सी लिंक
ही कल्पना सुद्धा शिवसेनाप्रमुखांची आणि युती सरकारनेच सी लिंक बांधला. जर १९९५ च्या
काळात आलेलं शिवसेनेच सरकारने अशी विकासकामं करुन दाखवली असतील तर आगामी काळात स्वबळावर
आलेलं शिवसेनेचं सरकार विकासकामांचा धडाका लावेल यात तीळमात्र शंका नाही.
शिवसेनेचं विकासाचं व्हिजन पहायच
असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या विकासकामांचा आढावा घेतला पाहिजे. मुंबईतील वाढती लोकसंख्या
आणि त्यामुळे वाढणारी पाण्याची गरज लक्षात घेऊन स्वतःच धरण बांधणारी आणि “लेक टॅपिंग”
सारखे प्रयोग यशस्वी करणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे.
शिवसेनेनं महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधलेल
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय हे जगातील सर्वात वेगाने बांधलेला
९ वा प्रकल्प आहे. मुंबईत पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो आणि समुद्राला भरती आली की सगळं
पाणी मुंबईत शिरतं. त्यामुळे मुंबई पाण्याखाली जाते. हे लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने
ठिकठिकाणी पंपिंग स्टेशन्स उभारली आहेत. याद्वारे प्रत्येक मिनिटाला लाखो लीटर पाणी
बाहेर फेकलं जातं. मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले
आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णायलयात अद्ययावत उपचारसुविधा आहेत. शिवसेना आता
नरीमन पॉइंट ते दहिसर कोस्टल रोडची कल्पना महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्यक्षात
आणत आहे. त्यामुळे हे अंतर केवळ २० मिनिटात कापता येईल आणि मुंबईतील ट्रॅफिक आणखी वेगवान
होईल. मुंबई महानगरपालिकेची कागदपत्रे व व्यवहार ऑनलाइन करता येतात. मुंबई महापालिकेने
खेळाची सुसज्ज मैदाने आणि क्रीडासाहित्य उपलब्ध करून दिले आहे. आशिया खंडातील सर्वात
मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने उभारला आहे. ही सर्व कामे शिवसेनेच्या
कार्यकाळात मुंबईत झाली आहेत.
शिवसेनचं महाराष्ट्राच्या विकासाच
व्हिजन जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्या २०१४ विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या
“व्हिजन डॉक्युमेंट” मधील प्रमुख योजनांचा आढावा घ्यायला हवा. या “व्हिजन डॉक्युमेंट”
मधील “इंद्रधंनुष्य” या योजनेत ग्रामविकासासाठी प्रमुख आणि अत्यावश्यक अशा ७ क्षेत्रात
शिवसेना अत्याधुनिक यंत्रणा वापरुन काय करणार हे मांडलेलं आहे. यानुसार प्रत्येक गावात
एक इंद्रधनुष्य केंद्र असेल आणि ते सॅटेलाइटच्या माध्यमातून गावांना मोठ्या शहरांशी
जोडेल. यात कृषि, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, महिला सबलीकरण, माहिती
केंद्र आणि मनोरंजन व प्रबोधन हे ७ घटक असतील. शिक्षण क्षेत्रात शिवसेना विद्यार्थ्यांच्या
दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना “टॅब” द्वारे शिक्षण
देईल. तसेच शाळांतून विविध विषयांतील तज्ञ लोकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना “व्हर्च्युअल
क्लासरुम” द्वारे होईल. खेडोपाडी असलेल्या आरोग्य सेवांची कमतरता व त्यातील त्रुटि
लक्षात घेऊन शिवसेनेने “टेलीमेडिसीन” संकल्पना मांडली असून मुंबईत ती यशस्वीरित्या
राबवली आहे. रोजगारविषयक कामं शिवसेना सध्या “बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा” राबवून
करत आहेच. कृषि क्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प
शिवसेना सरकार मांडेल. कृषिपंपांना किमान १२ तास सलग वीजपुरवठा, प्रादेशिक उपलब्धतेनुसार पाणीपुरवठा आणि कृषीविषयक विशेष योजना शिवसेना सरकार
राबवेल. संपूर्ण महाराष्ट्राची सिंचनक्षमता वाढवून दुष्काळावर मत करण्याचा संकल्प शिवसेनेने
केला आहे.
शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना झालेली
विकासकामे आणि मुंबई महानगरपालिकेतील विकासकामे शिवसेनेच्या विकासाच्या “व्हिजन”चं
दृश्य रूप आहे. शिवसेनेच्या “व्हिजन डॉक्युमेंट” मधून शिवसेना आगामी काळात सत्ता आल्यास
महाराष्ट्रात काय विकासकामं करेलं याचं नियोजन दिसून येतं. शिवसेनेकडे विकसाचं व्हिजन
आहे. आगामी काळात शिवसेना सत्तेवर येताच ते प्रत्यक्षात येईल हेच यातून स्पष्ट होतं.
लेखक : शशांक देशपांडे
(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )
No comments:
Post a Comment