Friday, 11 November 2016



"वाघगर्जना”

(माझा आजचा लेख:)

बंद नोटांची दुसरी बाजू..!

पहिले पाढे पंचावन्न..!

मागील आठवड्यात हिंदुस्थानचे पंतप्रधान मोदींनी हिंदुस्थानी चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाद झाल्याच सांगितलं.हे अविश्वसनीय वाटणारं वृत्त जसजस पसरत गेल तसतश्या या निर्णयावर प्रतिक्रीया उमटायला सुरुवात झाली.मोदींच्या आवहानासुसार ५०० व १००० च्या नोटा ३० डिसेंबर पर्यंत बदलून घ्यायच्या आहेत.असं असलं तरी सध्या त्या नोटा चलन म्हणून स्वीकारल्या जात नाहीयेत.त्यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय हे अगदी सत्य आहे.मोदींचा हा निर्णय प्रथमदर्शनी शंभर टक्के योग्य आणि भ्रष्टाचारी लोकांचा कर्दनकाळ वाटत असला तरी वास्तवाचे भान ठेवून विचार केला असता या निर्णयात तितका दम नसल्याचही समोर येतय.मोदींचा निर्णय ऐकून आनंदाच्या भरात मोरासारखा नाच करणाऱ्यांनी व कार्तिकी एकादशीला विठ्ठल सोडून मोदिनामाचा जप करणाऱ्यांनी बंद नोटांची दुसरी बाजूही स्वीकारायलाच हवी.

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून तत्काळ बाद करण्यामागे मोदींचा हेतू अगदी स्पष्ट होता.काळा पैसा जमवणाऱ्या आणि मिळकत कर चुकवणाऱ्या चोरांना उघड पाडून कारवाई करणे आणि काळा पैसा सरकारजमा करणे हे या निर्णयामागच प्रमुख कारण होत.सुरुवातीला हा निर्णय ऐकून सर्वसामान्यांनी आनंद व्यक्त केला.मोदींच्या निर्णयाचे स्वागत करत देशासाठी काही दिवस त्रास सहन करण्याची तयारी दाखवली.मोदींचा हा निर्णय ऐकून आम्हालाही आनंद झाला, पण म्हणून पूर्ण विचार न करता एककलमी मोदींचे गोडवे गाण्याचा कार्यक्रम आम्ही करणार नाही.पाचशे व हजार या मोठ्या रकमेच्या नोटा चलनातून अचानक बाद केल्यामुळे काळा पैसा बाहेर पडेल अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.सर्वसामान्य माणूस तर यामुळे जाम खुश झाला होता.“गरिबांना लुबाडून जमा केलेला पैसा शेवटी नेत्यांना बुडवणार” या भावनेने सामान्य मानून पार आनंदून गेला.मोठ्या नोटा बंद केल्याने यापुढे भ्रष्टाचार कसा होणार नाही हे सांगत जो तो मोदिनामाचा गजर करू लागला.मोदींनी काळा पैसा साठवणाऱ्या लोकांची कशी जिरवली हे सांगत जो तो मोदींचे कौतुक करू लागला.आम्हाला मोदींचे कौतुक झाल्याची पोटदुखी नाही हो.मोदींच कौतुक खुशाल करा.आम्ही काही म्हणणार नाही.हव तर “अखंड हरीनाम सप्ताहा”च्या धर्तीवर अखंड मोदिनाम सप्ताह आयोजित करा,पण जरा वस्तूस्थितीही लक्षात घ्या.

मोदींचा निर्णय ऐकताच मोठ्या नोटा कायमच्या बाद झाल्या अशी सर्वांची समजूत झालेली होती.त्यानुसार १०० रुपयांची नोट व्यवहारातील सर्वात मोठे चलन राहील असे सर्वांना वाटले होते.१०० रुपयांच्या नोटा साठवणे किंवा त्याची टेबलाखालून देवाण-घेवाण करणे हे ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या तुलनेत जवळपास अशक्य आहे आणि त्यामुळे आता भ्रष्टाचाराला खीळ बसेल असे सर्वांना वाटले होते.मोदींनी ५०० व २००० च्या नव्या नोटा चलनात येणार असल्याचे जाहीर केल्याने ही आशा खोटीच ठरली.त्यानंतर २००० रुपयांच्या नव्या नोटेच्या स्वरूपाचे कौतुक केले गेले.या नोटेत जीपीएस तंत्रज्ञान,मायक्रोचीप अशी अत्याधुनिक यंत्रणा असून ही नोट जमिनीखाली १२० मीटर गाडली तरी ती शोधता येईल.त्यामुळे या नोटांचा वापर काळा पैसा म्हणून केला जाऊ शकणार नाही अशा वावड्या उठल्या.अगदी वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रात सुद्धा याबद्दल बातम्या झळकल्या.नंतर हे वृत्तच खोट असल्याच सरकारने स्पष्ट केली.पुन्हा एकदा सर्वसामान्यांचा विरस झाला.या नव्या नोटांमध्ये गांधीजींची मान सोडली तर काडीचा बदल नाहीये हे सत्य आहे.

महत्वाच म्हणजे या निर्णयामुळे मोठमोठे नेते कायद्याच्या कचाट्यात सापडतील,सर्वसामान्यांना लुबाडून काळा पैसा जमा करणाऱ्यांना आता त्यांच्या कर्माचे फळ भोगावे लागेल असा सर्वसामान्य जनतेचा गोड गैरसमज झाला होता.मोठे नेते जमिनी,कारखाने,सोने या स्वरुपात काळ्या पैसा गुंतवून ठेवतात.या निर्णयाचा त्यांच्यावर काडीमात्र फरक पडणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.हे सत्य न स्वीकारता मोदी मोदी असा गजर करणाऱ्यांनी डोळ्याला झापड लावलेली आहे असच म्हणायला हवं.मोदींच्या निर्णयाचा सामान्य माणसाला त्रासच झाला.अनेकांना ते अन्न-पाणी मिळाले नाही.अनेकांची अतिमहत्त्वाची कामे रखडली.सण-समारंभ,कार्यक्रमांवर गदा आली.देशहितासाठी लाडक्या पंतप्रधानांना दाद म्हणून आणि सहकार्य म्हणून सर्वसामान्यांनी हे सगळ हसतमुखाने सहन केलं.काळा पैसा जमवणारे सापडत असतील तर आपण हे सगळ सहन करू अस त्याचं मत होत.

मोदींच्या या निर्णयाचे म्हणावे तितके दूरगामी परिणाम होणार नाहीत.काही बाबतीत या निर्णयाला तोड नसली तरी त्याचा प्रमुख हेतू सफल होताना दिसत नाही.हे सत्य स्वीकारायला हवं.मोदी म्हणतील ती पूर्वदिशा अस लोकशाही राष्ट्रात कसं चालेल? त्यांना कोणी काही प्रश्न विचारले तरी अंगावर धावणाऱ्या आंधळ्यांनी आगामी काळात काय काय घडत ते पहावं.या निर्णयाचा जनतेला मनस्ताप झालाय हे सत्य आहे.५०० आणि १००० च्या नोटा फक्त रुग्णालय,सरकारी कार्यालय,पेट्रोलपंप अशाच ठिकाणी चालतात.हॉटेल,किराणा दुकान,भाजी मार्केट अशा दैनंदिन जीवनात सर्वसामान्य माणसाला अत्यावश्यक असलेल्या ठिकाणी त्या नोटा चालत नाही.नोटा बदलायला बँकेत रांगाच रांगा आहेत.अशा परिस्थितीत सामान्य जनतेने काय करायचं? नोटा चलनात राहिल्या नसतील पण म्हणून त्या खाता येत नाहीत ना? म्हणजे पैसा असून उपासमार.
मोदींनी पाकवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे शिवसेनेने कौतुकच केले होते.शिवसेना पक्षप्रमुखांनी मोदींचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले होते आणि त्याचबरोबर एका सर्जिकल स्ट्राईकवर थांबू नका,पाकला कायमचा धडा शिकवा अशी मागणीही त्यांनी केली होती.सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाक हिंदुस्थानवर हल्ले करेल.पाकची ही वळवळ थांबवायला हवी हा इशारा त्यांनी मोदींना दिला होता.आज काय स्थिती आहे? ऐन दिवाळीत पाकड्यांनी हल्ला केला आणि आपले जवान त्यात शहीद झाले.पुन्हा पहिले पाढे पंचावन्न..!या नोटाबंदीच्या निर्णयाच पुढे तेच होणार आहे.काळा पैसा बाहेर काढायला यापेक्षा वेगळे उपाय योजावेत.ज्यांच्याकडे काळा पैसा नाही त्यांना आज त्रास होतोय आणि काळ्या पैशाने मोठे झालेले आज निवांत आहेतयासारखी दुर्दैवी बाब नाही.


जय महाराष्ट्र..!

No comments:

Post a Comment