Saturday, 19 November 2016


"वाघगर्जना

(माझा आजचा लेख:)

स्वप्न आणि सत्य

नोटाबंदी निर्णयातील त्रुटी

आजकाल नोटाबंदीबद्दल जरा काही प्रश्न विचारले,शंका विचारल्या किंवा नोटाबंदीविरुद्ध मत मांडले तर अनेक मंडळी अंगावर धावून येतात.मोदींनी केलेली प्रत्येक गोष्ट उत्तम आणि योग्यच असते,त्यात कोणत्याही त्रुटी नसतात,त्यात काही बदलांची व सुधारणांची गरज नसते असे या मंडळींचे म्हणणे असते.असे असले तरी या मंडळींच्या म्हणण्यानुसार देश चालत नाही.नोटाबंदीच्या निर्णयाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.यातील फायदे आम्हाला मान्य आहेत तसे तोटे मान्य करताना तुमची बुद्धी काय जुन्या नोटांप्रमाणे बाद होते काय? प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात हे आम्हाला मान्य आहे,पण नोटाबंदीच्या या निर्णयाचे फायदे आणि तोटे नेमके काय आहेत? त्याचे प्रमाण किती आहे याचाही विचार करायला हवा.नोटाबंदीच्या या निर्णयाचे फायद्यापेक्षा तोटे जास्त होऊ नयेत म्हणजे झालं.

मुळात नोटाबंदीचा ज्या सामान्य वर्गाला आनंद झाला होता व त्या आनंदात ज्या वर्गाने काळा पैसा बाहेर निघेल,भ्रष्टाचार थांबेल,गैरव्यवहार थांबतील आणि रामराज्य येईल अशा आशेने मोदींना पाठींबाच नव्हे तर शाबासकी दिलेली होती आणि नोटाबंदीमुळे होणारा त्रास सहन करायची तयारी दाखवली होती ते घडताना दिसत नाही.सामान्य लोकांना नोटाबंदी केल्याने खास करून राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा काळा पैसा बाहेर पडेल अशी अपेक्षा होती.ही अपेक्षा फोल ठरली.तसेच नोटाबंदी केल्याने भ्रष्टाचार थांबेल,लाचखोरीला आळा बसेल अशी सामान्य वर्गाची धारणा होती.प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही.उलट नव्याच नोटा हव्यात असा आग्रह करत लाचखोरी सुरु आहे.तशी प्रकरणे उघडकीसही आली आहेत.सामान्य लोकांना घरखर्च भागवायला पुरेल इतपत पैसा बँकांमधून उपलब्ध होत नसताना लाच द्यायला एवढ्या नव्या नोटा आल्या कुठून याचे उत्तर पोलिसांनाही सापडत नाहीये.नोटाबंदीबद्दल सामान्य माणसाचे स्वप्न आणि सत्य यातला हाच फरक आहे.

नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर निघणार असेल आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार असेल तर आम्ही त्रास सोसायला तयार आहोत.हल्ली त्रास सोसल्यावर देशभक्तीचं सर्टिफिकेटही मिळत.त्यामुळे त्रास सोसायला आमची हरकत नाही,पण आधीच संपूर्ण प्लानिंग करून हा त्रास टाळता आला नसता का? किंवा त्रासाची तीव्रता कमी करता आली नसती का? आकार बदलल्यास नव्या नोटा जुन्या एटीएम मधून येणार नाहीत हे साध गणित नव्या नोटांचा आकार ठरवताना विचारात का घेतल नाही? बर,नवी दोन हजारची नोट जी आज बँकांमधून सामान्य माणसाच्या हातात पडते तिचा उपयोग काय? पाचशेच्या नोटा बंद असल्याने दोन हजारच्या नोटेला बाजारात वावच नाही.दोन हजार रुपयांचे सुट्टे पैसे कोणीच देत नाही.त्यामुळे सध्या दोन हजारची नोट फक्त शोभेची वस्तू ठरत आहे.बँकेतून नोटा बदलून घ्यायला रोज नवी अट टाकली जाते त्याच काय? कधी ४००० रुपये मिळतात,कधी २००० रुपये मिळतात,कधी बोटाला  शाई लावण्याचे फर्मान निघते,कधी फक्त खातेधारकांना आणि जेष्ठ नागरिकांनाच पैसे दिले जातात.या अटींच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पूर्वनियोजित व्यवस्था हवी होती.निर्णय जाहीर होताच जुन्या नोटा बदलायला एकच झुंबड उडेल आणि सगळीकडे गोंधळ माजेल एवढी साधी गोष्ट सदर निर्णय घेणाऱ्यांना लक्षात आली नसेल अस नाही.मग त्यावर प्रभावी उपाय का शोधले गेले नसावेत हे कोडं सामान्य माणसाला सुटत नाही.याच नोटाबंदी निर्णयाच्या त्रुटी आहेत.

देशहितासाठी बँकांच्या रांगेत थांबायचं असेल आणि देशासाठी थोडा त्रास सहन करायचा असेल तर आम्ही एका पायावर तयार आहोत.देशहितासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे हीच आमची भावना आहे,पण हा त्रास ज्याच्यासाठी सहन करतोय ते घडताना दिसत नसल्याने आमच्या मनात प्रश्नचिन्ह आहे.नोटाबंदीने अनेक जन मृत्युमुखी पडले.कोणी बँक कर्मचारी होते,कोणी रांगेतील सामान्य नागरिक तर कोणी रुग्ण होते.त्यांचे नाहक बळी गेले.त्यांच्या जीवाची कोणालाच पर्वा नाही काय? कि जुन्या नोटांसोबत त्यांच्या आयुष्याचं मोलही शून्य झालय? नोटाबंदीचा प्रभाव सध्या तरी फक्त आणि फक्त सामान्य लोकांवर पडतोय.त्याची तीव्रता निष्पापांचे बळी घेण्याएवढी तीव्र आहे.हे सत्य कसं लपवता येईल? कोंबड झाकलं म्हणून सूर्य उगवणार नाही हे कुठल डोकं?

मोदींच्या नोटाबंदी निर्णयाला आज दहापेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत.जसजसा काळ पुढे जात आहे तसतश्या या निर्णयातील त्रुटी समोर येत आहेत.या त्रुटी सुधारण्यासाठी सरकारचे उपाय म्हणजे वरातीमागून घोडेच म्हणावे लागतील.देव मोदींना आणि मोदिभक्तांना या त्रुटींचा यशस्वीरीत्या सामना करण्याची ताकद देवो हीच प्रार्थना..!


जय महाराष्ट्र..!                    

No comments:

Post a Comment