(माझा आजचा लेख:)
याला लोकशाही म्हणावं का?
कन्नडिगांची मस्ती जिरवू..!
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये बेळगाव,निपाणी अशा सीमेवरील गावांवरून वाद आहे.भाषावार प्रांतरचनेचा निकषानुसार हि राज्ये खरतर महाराष्ट्रात समाविष्ट असायला हवीत,मात्र ती सध्या कर्नाटकात आहेत.सीमावासीयांचे महाराष्ट्रात समाविष्ट होण्यावर एकमत आहे.त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने लढाही चालू आहे.१ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्य स्थापना दिन महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच तमाम सीमावासियांच्यावतीने “काळा दिवस” म्हणून पाळला जातो.सीमावासीयांचे हे आंदोलन चिरडण्यासाठी कर्नाटक सरकार आणि कन्नड रक्षण वेदिका यांसारख्या संघटना नेहमी कार्यरत असतात.कर्नाटक सरकार पोलिसी खाक्याला हाताशी धरून मराठी भाषिकांवर लाठ्याकाठ्या चालवून,आंदोलकांना कारागृहात डांबून आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत असते.हा प्रकार प्रतिवर्षी होत असला तरीही महाराष्ट्र एकीकरण समिती आणि तमाम मराठी भाषिक लोक आपल्या निर्णयावर ठाम असून गेली ६० वर्षे माजलेल्या हत्तीशी झुंज देत आहेत.या सर्व लढ्यात शिवसेना पहिल्यापासूनच मराठी बांधवांच्या बाजूने आहे.सीमा आंदोलनाच्या वेळी शिवसैनिकांनी केवळ रक्तच सांडलेल नसून आपल्या प्राणाची आहुतीही दिलेली आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्य स्थापना दिवस सीमावासीयांनी “काळा दिवस” पाळला.लोकशाही मार्गाने कर्नाटक सरकारविरुद्ध निदर्शने करण्यात आली.“रहेंगे तो महाराष्ट्र में,नहीं तो जेल मे”,“बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे”,तसेच “बेळगाव, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” अशा घोषणा देत सीमावासीयांनी सायकल फेरी काढली. सीमालढ्यातील चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगावमध्ये दैनंदिन व्यवहार बंद ठेवत काळी वस्त्रे परिधान करून, निषेधाचे काळे झेंडे दाखवत, हाताला आणि तोंडालाही काळ्या फिती बांधून लाखोंच्या संख्येने आबालवृद्ध सायकल फेरीमध्ये सहभागी झाले होते. कीकडे ही मूक निषेध फेरी शांततेच्या मार्गाने निघत असतानाही कानडी पोलिसांचा फौजफाटा तैनात करून कर्नाटक सरकारने जाणीवपूर्वक दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. मराठीद्वेशी काही कन्नडिगांनी शहापुरातील काकेरू चौकात दगडफेक करीत मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, पण त्या पळपुट्या कन्नडिगांना शोधून ठोकण्याऐवजी कन्नड पोलिसांनी मराठी बांधवांवरच सौम्य लाठीमार केला.त्यामुळे तमाम सीमावासीयांसोबतच महाराष्ट्रातही संतापाची लाट उसळली.
या प्रकारानंतर कर्नाटक पोलिसांनी मध्याधुंद अवस्थेत हैदोस घालत दगडफेक करणाऱ्या कन्नडीगांना सोडून मराठी भाषिक आंदोलकांवर सूडबुद्धीने कारवाई केली.हे आंदोलन मोडीत काढण्याच्या हेतूने कानडी पोलिसांनी मराठी युवकांना अमानुष मारहाण केली.कर्नाटक पोलिसांनी रात्रीअपरात्री कडाक्याच्या थंडीत मराठी तरुणांना घरांत घुसून लाठ्यांनी बडवत, गुरासारखे फरफटत नेऊन पोलीस ठाण्यातही अमानुष मारहाण करण्याचा माणुसकीला काळिमा फासणारा संतापजनक प्रकार घडला. पकडण्यासाठी खास तयार केलेल्या यादीतील एखादा मराठी तरुण सापडला नाही तर अंगात राक्षसच संचारलेल्या या कानडी पोलिसांनी त्याच्या आईवडिलांनाही बेदम मारहाण करण्यास मागेपुढे पाहिले नाही. बेन्नाळी येथील एका घराच्या देव्हार्याडतील देवदेवतांच्या मूर्ती व फोटो फेकून देण्याचे महापापही या पोलिसांनी केले.याला लोकशाही म्हणावं का?
महाराष्ट्रात शिवसेना मराठीचा पुरस्कार करत असताना,मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृती व परंपरा जपत असताना अनेकजण शिवसेनेला “मराठी-मराठी का करता?” अस विचारत सर्वसमावेशक भूमिका शिकवतात.शिवसेना मराठी अस्मितेचा अभिमान बाळगते व ती टिकवण्यासाठी लढाही देते.हे करत असताना शिवसेनेने इतर प्रांतातील लोकांवर किंवा इतर भाषिकांवर कधीच अत्याचार केला नाही.कर्नाटकात मात्र दरवर्षी मराठी भाषिकांवर भ्याड कारवाई करत सीमावासीयांचे आंदोलन दडपण्याचा मस्तवालपणा केला जातो.हिंदुस्थानात प्रांतरचना होत असताना भाषा हा प्रमुख आधार मानला गेला.भाषा हा आधार असेल तर बेळगाव,बीदर,भालकी,निपाणी हा मराठी मुलुख महाराष्ट्रात असला पाहिजे.तमाम सीमावासीयांची हीच मागणी आहे.सध्या यावर न्यायालयात खटला सुरु असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.असे असले तरी जर कर्नाटक सरकार आणि कन्नडिगांनी मराठी माणसावर अन्याय व अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यास आणि सीमावासीयांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केल्यास ठोशास ठोसा देण्याची भूमिका शिवसेना घेईल.मराठी माणसावर अन्याय होत असेल तर आम्ही तो सहन करणार नाही.त्याला जशास तसे उत्तर देऊ आणि कन्नडिगांची मस्ती जिरवू..!
जय महाराष्ट्र..!
No comments:
Post a Comment