(माझा आजचा लेख:)
"आज बाळासाहेब असते तर.."
भीक मागण्याचा धंदा
सध्या हिंदुस्थानात नोटबंदीचा मुद्दा सर्वाधिक आहे.नोटबंदीमुळे जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल पंतप्रधान मोदींना भेटायला शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ गेलेलं होत.त्यावेळी मोदींनी शिवसेना खासदारांची कानउघाडणी केली अशा बातम्या प्रकाशित झाल्या.पंतप्रधान मोदींनी "स्वर्गात गेल्यावर मी बाळासाहेबांना सांगेन कि मी चांगलं काम करून आलोय पण तुम्ही काय सांगणार ते माहिती नाही ?" असं शिवसेना खासदारांना खडसावल्याचे वृत्त ऐकताच नमोभक्तांनी एकच जल्लोष केला.नोटबंदीला शिवसेनेने केलेला विरोध मोदींनी कसा लावला यावर खमंग चर्चा करत शिवसेनेवर टीकाही केली.सध्या सर्वत्र अफवांचे विषारी पीक वाढत चालले असून शिवसेनेला नाहक बदनाम करण्याचे कपटकारस्थान सुरु आहे.असं तरी शिवसेना मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे.प्रचंड टीकेची झोड उठत असतानाही आणि शिवसेनेची बदनामी केली जात असतानाही शिवसेना आपली भूमिका ठामपणे आणि स्पष्ट मांडत आहे.
शिवसेना नोटबंदीच्या विरोधात का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय.शिवसेनेने नोटबंदीला कधीच विरोध केलेला नाही.शिवसेनेचा नोटबंदीला विरोध आहे ही आंधळ्या मोदीभक्तांच्या,शिवसेना विरोधकांच्या आणि शिवसेना द्वेष्ट्यांच्या सडक्या मेंदूतून बाहेर आलेली एक अफवा आहे.शिवसेनेला बदनाम करून नामोहरम करायचं असा त्यामागचा डाव आहे. शिवसेनेने नोटबंदीला विरोध केलेला नसून त्या निर्णयामुळे निरपराध सामान्य जनतेला होत असलेल्या त्रासावर उपाय करण्याची मागणी केलेली आहे.शिवसेनेची बदनामी करणाऱ्यांना आणि शिवसेना नेतृत्वावर टीकेची झोड उठवणाऱ्यांना हि गोष्ट कळत नाही अशातला भाग नाही.त्यांना सगळं मान्य आहे.अनेकांनी त्रासही सोसला आहे.फरक एवढाच कि त्यांचं देशप्रेम (त्यांच्यासाठी मोदी म्हणजेच देश) उफाळून आलं आहे.त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यसेनानी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसैनिकांच्या तुकडीत सामील व्हायचा निर्णय घेतलेला आहे.मोदी म्हणतील ती पूर्वदिशा एवढंच या अंधभक्तांचं वैचारिक वलय आहे.असो.शिवसेना मात्र मोदी म्हणतील ती पूर्वदिशा हि भूमिका कदापि स्वीकारणार नाही.हा प्रश्न मोदींचा किंवा भाजपचा नसून देशाचा आहे.त्यामुळे देशातील एकूण परिस्थिती विचारात घेऊनच निर्णयाची अंमलबजावणी करताना उपाय योजले जायला हवे होते.नोटबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा जमावणाऱ्यांना नव्हे तर सामान्य जनतेला सर्वाधिक त्रास होत आहे.त्यावर बोलण्याचे धाडस मोदी किंवा मोदीभक्त करतील काय? देशासाठी सहन करा हे या प्रश्नच उत्तर असूच शकत नाही.तुमच्या निर्णयामुळे होणाऱ्या गैरसोयींबद्दल न बोलणं किंवा त्यातल्या त्रुटी न दाखवणं म्हणजे देशप्रेम नव्हे.
आता प्रश्न राहतो तो मोदींनी आणि मोदीभक्तांनी नोटबंदीसाठी वापरात आणलेल्या बाळासाहेबांच्या नावाचा.आज बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींची पाठ थोपटली असती वगैरे चर्चा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचं नावं आत्ताच का आठवलं ते सांगावं.स्वतःच्या चुका झाकण्यासाठी भाजपने बाळासाहेबांचं नावं वापरायला सुरुवात केली आहे.मुंबईत बाळासाहेब मोदींना आशीर्वाद देत असतानाचे पोस्टर्स झळकावून मूळ मुद्द्याला बगल देत जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम जोमात सुरु आहे.सत्तेच्या नशेत बेधुंद झालेल्या भाजपचं हे अत्यंत घाणेरडं आणि खालच्या पातळीवरच राजकारण आहे.महाराष्ट्रात शिवसेनेची मतं फोडण्यासाठी भाजपने "शिवछत्रपती का आशिर्वाद, चलो चले मोदी के साथ" अशी घोषणा असलेलं पोस्टर्स झळकवले होते.विधानसभेनंतर मोदींनी किती वेळा शिवरायांचं नाव घेतलं? किती वेळा शिवजयंती केली? द्या उत्तर. गेल्या आठवड्यातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा महानिर्वाण दिन होता.त्या दिवशी मोदींना बाळासाहेबांचे स्मरण झाले नाही काय? शिवछत्रपती आणि शिवसेनाप्रमुख यांच्या आशीर्वादच राजकारण करून भाजपने मतांची भीक मागण्याचा आणि सहानुभूती मिळवण्याचा धंदा चालवला आहे.
"आज बाळासाहेब असते तर.." असं म्हणत त्यापुढे मनाला येईल ते जोडून त्यावर मतांची पोळी भाजणं हा बाळासाहेबांचा अपमान आहे.मोदींना गोध्रा घटनेच्या वेळी तत्कालीन भाजप नेतृत्व खड्यासारखं बाजूला करणार होते.तेंव्हा बाळासाहेबांनीच मोदींना वाचवलं होते.याचा मोदींना अजून तरी विसर पडलेला नाही, पण म्हणून आधी मनाला येईल ते करायचं आणि मग बाळासाहेबांचं नावं घेऊन त्यावर पांघरून घालायचं हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे.या कर्माची फळे भाजपला येत्या काळात भोगावी लागणार आहेत.भाजपचा हा गरजेनुसार महापुरुषांचा वापर करून मतांची भीक मागण्याचा धंदा त्यांना चांगलाच महागात पडेल.
जय महाराष्ट्र..!