(माझा आजचा लेख:)
उरी बसलेला घाव..!
बदला घ्या..!
हिंदुस्थानात सध्या पाकड्यांनी "उरी" येथे केलेल्या हल्ल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.पाकड्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात हिंदुस्थानचे तब्ब्ल १८ जावं धारातीर्थी पडले.देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या या शूरांना या भ्याड हल्ल्यात वीरमरण आले.पाकड्या दहशतवाद्यांचा हा भ्याड हल्ला हिंदुस्थांच्या उरी बसलेला घाव आहे.या हल्ल्यानंतर हिंदुस्थानात पाकचा तीव्र निषेध करण्यात आला.वेगवेगळ्या मार्गांनी पाकविरुद्धचा संताप व्यक्त केला गेला.कुठे घोषणाबाजी केली गेली तर कुठे पाकचे झेंडे जाळून निषेध केला गेला.देशभरातील प्रत्येक मनात एकच भावना पसरली.ती म्हणजे बदला घ्या..! "लातों के भूत बातों से नहीं मानते" या म्हणीप्रमाणे पाकचे वर्तन आहे.तेंव्हा वाट कसली पाहायची? लाथा घाला.१८ जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका.त्यांना अभिमान वाटेल अशी श्रद्धांजली वाहा.
पाकचे हे नापाक हल्ले आता काही नवीन नाहीत.त्यानंतर बेशर्मपणे हात झटकणं किंवा हल्ल्याचं खापर हिंदुस्थानवरच फोडण हेही नवीन नाही.तसेच "हिंदुस्थान हाच खरा दहशतवादी देश आहे" असं पाकड्या पंतप्रधानांनी जगभर बोंबलत फिरणंही नवीन नाही.इतके दिवस पाकला इशारे दिले.समज दिली.क्रिकेट डिप्लोमसी केली.सगळं केलं.तरी परिणाम शून्य.एकवेळ पालथ्या घड्यात पाणी भरेल आणि कुत्र्याचं शेपूटही सरळ होईल,पण पाक काही दहशतवादाला खतपाणी घालणं सोडणार नाही.सुधारण्याची इच्छा असेल तर वाल्याचा वाल्मिकीही होऊ शकतो,पण पाकला कधीच आपल्या नापाक कृत्यांचा खेड नाही,खंत नाही,पश्चाताप नाही.ढीगभर पुरावे दिले तरीही कारवाईचं सोंग करायचं आणि पुन्हा दहशतवादी हल्ला घडवायचा.पुन्हा आपले जवान नाहक मारले जाणार.पुन्हा आपण इशारा देणार.पुन्हा मेणबत्या लावणार.श्रद्धांजली वाहणार.हे असं किती दिवस चालवून घ्यायचं? हिंदुस्थानचा अपमान का आणि किती दिवस सहन करत राहायचा?
उरी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.कोणी म्हणाल पाकसोबत आता चर्चा नको,कृती करा.कोणी म्हणाल पाकला देण्यात येणार पाणी अडवा.प्रत्येकांनी संताप व्यक्त केला.आता प्रत्येकजण कारवाईची वाट पाहतो आहे.हिंदुस्थानचे "५६ इंच छाती फेम" पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिंदुस्थानी जनतेला प्रचंड अपेक्षा आहेत.मागील लोकसभा निवडणुकीत मोदींनी दहशतवादाच्या मुद्यावरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती."दहशतवादाचा मुकाबला करायला ५६ इंच छाती लागते" अशा आशयाचं वक्तव्य करत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता आणि जनतेच्या टाळ्या घेतल्या होत्या.एवढाच नव्हे तर लोकांची मने जिंकत मतंही मिळवली.त्याच बळावर त्यांचे सरकार प्रचंड बहुमतासह सत्तेत आहे.मोदींच्या त्या आवेशपूर्ण भाषणामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला होता.मोदी पंतप्रधान झाल्यास पाकशी युद्ध करतील अशी आशा नसली तरी पाकला धडा शिकवतील,जशास तसे उत्तर देतील अशी अपेक्षा होती,आजही आहे. या गोष्टीचा विचार मोदी कधी करणार आहेत? अजूनही वेळ गेलेली नाही.मोदी सरकारचा अजून निम्मा कार्यकाळ शिल्लक आहे.त्यांनी याचा विचार जरूर करावा आणि कृतीही करावी.यात मोदी असमर्थ ठरल्यास निदान पाकड्या दहशतवादाच्या बाबतीत तरी त्यांच्यात आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये अजिबात फरक राहणार नाही.हे म्हणजे जनतेची फसवणूक करणे होय.जनतेचा विश्वासघात करण्याचे पाप निदान मोदींनी तरी करू नये.
शिवसेनेच्या भूमिकेबद्दल विचार करायचा झाल्यास पाकला जशास तसे,सडेतोड उत्तर देऊन पाकच्या भ्याड हल्ल्याचा बदल मोदींनी घ्यावा हीच शिवसेनेची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे.त्याचबरोबर पाकड्या कलाकारांना,खेळाडूंना आम्ही महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात पाय ठेऊ देणार नाही हि आमची भूमिका कायम आहे.आता म्हणे झी समूहाच्या कोणत्या तरी एका वाहिनीने पाक कलाकारांचे शो,सीरिअल्स बंद करण्याचा निर्णय घेतला.हे ऐकून मीडियातील काहींना आनंद झाला.आनंद व्हायला हरकत नाही,पण हीच भूमिका शिवसेनेने मांडली होती तेंव्हा "शिवसेनेची गुंडागर्दी" या मथळ्याखाली वार्तांकन करण्यात आणि चर्चांची गुऱ्हाळं करण्यात याच झी समूहाचे चॅनेल्स आघाडीवर होते ना? त्यांनीच तेंव्हा पाक कलाकारांच्या किंवा पाकड्यांच्या बाजूने अश्रू ढाळले ना? हि कसली पत्रकारिता? जो देश आपल्या देशाच्या मुळावर उठला आहे त्या देशाच्या कलाकारांना आम्ही आपल्या भूमीत कला सादर करून देणार नाही म्हणजे नाहीच.इथे कोणत्याही पाकड्यांना थारा नाही.खेळाडूंना नाही,कलाकारांना नाही आणि लेखकांनाही नाही.अजिबात खपवून घेतलं जाणार नाही.हीच शिवसेनेची भूमिका होती आहे आणि असेल.तुम्हाला आज शहाणपण सुचलं असल तरी ते टिकणार असेल तर स्वागतच आहे.सर्वांनीच पाकड्यांवर बहिष्कार टाकावा.शिवसेना त्याच स्वागतच करेल.त्यांनी आपल्या जवानांवर पाठीमागून भ्याड हल्ले करायचे,आपल्या जवानांनी ते झेलायचे आणि देशासाठी बलिदान द्यायचं आणि तुम्ही इकडे पाकड्या कलाकारांसाठी आणि खेळाडूंसाठी टाळ्या वाजवायच्या हा शहिदांचा अपमान आहे.शहिदांना श्रद्धांजली वाहायचीच असेल तर बदला घ्या,बदला घ्या,बदला घ्या..!
मोदींचे समर्थक आजकाल आम्हाला समजावतात "इथे बसून बोलणं सोपं आहे,मोदींना विरोध करणं सोपं आहे,पंतप्रधान झाल्यावर कळतं नेमकं काय असत ते" वगैरे.अहो,हे आम्हाला काय सांगता? तुम्ही अडीच वर्षांपूर्वी काय करत होतात? विरोधच ना? बरं,पाकवर हल्ला करा असं म्हणण हा मोदीविरोध कसा? उलट आमचा अजून तरी मोदींवर विश्वास आहे म्हणून सांगतोय.आता कोणतंही कारण सांगू मका.जनतेने मोठ्या विश्वासानं तुम्हाला प्रचंड बहुमतासह सत्ता दिली आहे.पाकला धडा शिकवाच..!
जय महाराष्ट्र..!