Saturday, 3 September 2016



"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

देवाच्या दरबारात सगळे सारखेच..!

आता घुबडालाही प्रतिष्ठा मिळेल..!

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि जगप्रसिद्ध उत्सवांपैकी एक असलेया गणेशोत्सवाला आता केवळ एक दिवस बाकी आहे.सर्वत्र गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी चालू आहे.मुंबईतील जगप्रसिद्ध आणि भव्य गणेशमूर्ती मंडपात आणल्या जात आहेत.नुकताच नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या गणरायाच्या मूर्तीच गणेशभक्तांना पहील दर्शन मिळाल.प्रतिवर्षी मूर्तीच्या मूळ रुपात फारसे बदल न करता थोडी विविधता साधत या गणरायाची मूर्ती तयार केली जाते.याही वर्षी अशीच देखण्या आणि प्रसन्न रूपातील गणराज भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी अवतरले आहेत.लालबागच्या राजाच्या यंदाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गणराय जरी नेहमीच्याच रुपात असले तरी त्याच्या सिंहासनाची प्रभावळ हि घुबडाच्या रुपात तयार केलेली आहे.

घुबड हा पक्षी देव-धर्माच्या बाबतीत नेहमीच वाईट मानला गेलेला आहे.घुबडाला कोणतेही शास्त्रीय कारण नसताना अपशकुनी ठरवण्यात आले आहे.वास्तविक पाहता घुबडाबद्दल हिंदू धर्मात कोणताही वाईट असा उल्लेख नाही किंवा घुबडामुळे अपशकून झाल्याची उदाहरणेही नाहीत.पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीवच नव्हे तर हे विश्वच देवाने निर्माण केल आहे अस आपण मानतो.पृथ्वीतलावरील सर्व प्राणी,पक्षी आदी जीवांची निर्मिती देवानेच केली आहे.तरीही मानवाने काही कारण नसताना घुबड,टिटवी अशा पक्षांना आणि मांजरीसारख्या प्राण्यांना अपशकुनी ठरवल आहे.अनेक घरात तर घुबड आणि टिटवी हे शब्दही उच्चारणे अपवित्र मानले जाते.त्याचप्रमाणे वटवाघुळाचेही आहे.या जीवांचे नुसते दिसणेही माणसाला नको असते.मांजर आडवं गेल्याने म्हणे काम होत नाहीत.एखाद्याच काम पूर्ण होण अथवा व्यवस्थित होण हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.त्यात मांजरीचा काय दोष? तुम्हाला अपशकून होईल म्हणून मांजरींनी फिरणं सोडावं काय? आणि तसे झाल्यास त्यांना अन्न कसे मिळणार? अन्नाच्या शोधात एखादा प्राणी हिंडत असताना तो तुम्हाला आडवा गेला,आणि म्हणून तुमचं काम झाल नाही हे कसलं संशोधन?

टिटवी हा पक्षी ओरडल्यावर म्हणे वाईट घटना घडते अथवा वाईट बातमी मिळते.आता हा माणसाच्या मनाचा कारभार त्या टिटवीला कसा कळणार? आणि कळलंच तर टिटवीने आजन्म तोंड बंद ठेवावं का? देवाने प्रत्येकाला वेगळा आवाज दिला आहे.त्याचा वापर करून सगळे जीव संवाद साधत असतात.त्यामुळे टिटवी ओरडल्याने अपशकून होतो अस कस म्हणता येईल? न ओरडता टिटवीच्या पिलांनी आईकडे अन्न कस मागायचं? काहीही आधार नसताना प्राण्यांना किंवा पक्षांना अपशकुनी कस ठरवता येऊ शकत? आजच्या युगात खरतर पशु-पक्षी नाही तर माणसच माणसांना अपशकून ठरत आहेत.अस असताना आपल्या कर्माचा दोष पशु-पक्षांना कसा देता येईल? अंधश्रद्धा निर्मूलन करत असताना अशाही गोष्टी विचारात घ्यायला हव्यात.त्यामुळे समाजातील गैरसमज दूर होतील आणि हिंदू धर्म अधिक बळकट होईल.धर्मातील प्रथा-परंपरांना आधार असेल तर त्या प्रथा आणि परंपरा नसून अंधश्रद्धा असतात.

देवाच्या दरबारात सगळे सारखेच अस म्हटल जात.राजाच्या दरबारी सगळ्यांना न्याय मिळतो असही म्हणतात.लालबागच्या राजाने हेच करून दाखवलं.लालबागच्या राजाच्या सिंहासनाची प्रभावळ घुबडाच्या आकारात साकारत मंडळाने एक नवा आदर्श घालून दिलेला आहे.आता घुबडालाही प्रतिष्ठा मिळेल.एकीकडे पशु-पक्षांवर दया दाखवा,त्यांना चारा पाणी ठेवा अस सांगायचं आणि एखाद्या मुक्या जीवाला अपशकुनी ठरवायचं हे योग्य नाही.अशा अंधश्रद्धा वेळीच नष्ट करायला हव्यात.त्यासाठी सर्वांना गणराया बुद्धी देईल आणि हिंदू धर्मातील काही आधार नसलेल्या सर्व अनिष्ट प्रथा-परंपरा नष्ट होतील व हिंदू धर्म अधिकाधिक बळकट होत राहील एवढीच प्रार्थना.

जय महाराष्ट्र..!






No comments:

Post a Comment