(माझा आजचा लेख:)
भविष्यकाळ शिवसेनेचाच..!
राजकारणातून समाजकारण..!
मागील आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा झाला.त्यापूर्वी ३ दिवस “सामना” मध्ये प्रकाशित झालेल्या दणदणीत आणि खणखणीत मुलाखतीतून शिवसेना पक्षप्रमुखांनी हिंदुस्थान आणि महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर भाष्य करत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.या मुलाखतीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुखांनी “उद्या शिवसेनेची एकहाती सत्ता येणारच आहे.भविष्यकाळ शिवसेनेचाच आहे.” असा ठाम विश्वास व्यक्त केला.मागील महिन्यात शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी ५० व्या वर्धापनदिन सोहळ्यात मार्गदर्शन करतानाही शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला होता.शिवसेनेची ५० वर्षात एकदाही एकहाती सत्ता का आली नाही? असा प्रश्न विचारणाऱ्या लोकांना उत्तर देताना उद्धवसाहेबांनी “शिवसेनेची एकहाती सत्ता आली नसेल,पण आणून दाखवतो” असा ठाम निर्धार व्यक्त केला होता.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची जनमानसात सुसंस्कृत,सृजनशील,संयमी,मितभाषी अशी प्रतिमा आहे.तसेच ते जे बोलतात ते करून दाखवतात.त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र विधानसभेवर शिवसेनेचा भगवा अभिमानान,स्वाभिमानान,डौलान आणि जबरदस्त तेजान फडकल्याशिवाय राहणार नाही.महाराष्ट्रात आगामी काळात शिवसेनेची एकहाती सत्ता येणार म्हणजे येणारच.शिवसेना गेली ५० वर्षे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अविरत झटत आहे.गेली ५० वर्षे समाजकारणाचा मंत्र घेऊन शिवसेनेने महायज्ञ उभारला आहे.शिवसेना ही सत्तेसाठी कार्यरत नसून ती जनहितासाठी झटणारी संघटना आहे.शिवसेनेला मंत्रिपद महत्वाची नाहीत तर जनतेचे हित महत्वाचे आहे.
शिवसेनेने दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून उभारलेल्या मदतयागाची फारशी वाच्यता केलेली नाही.तसेच सत्तेत असूनही जनतेचे प्रश्न मांडत असताना शिवसेना एक पाऊलही मागे हटली नाही.शिवसेनेची महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता येण्यासाठी शिवसेनेने केलेले समाजकार्य आणि विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे.अनेकदा फसव्या जाहिराती देऊन अथवा खोटा प्रचार करून निवडणूक अनेक पक्षांचे अनेक नेते निवडणूक जिंकताना दिसतात.लोक खोट बोलून जर मते मिळवत असतील आणि आणि निवडणुका जिंकत असतील तर आपण खर बोलून निवडणुका का नाही जिंकू शकणार? शिवसेनेचं समाजकार्य मदारांपर्यंत पोहोचवण आणि केलेलं कार्य अभिमानानं सांगून मतं मागण यात गैर ते काय आहे? यावरही शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांच्या मुलाखतीत सुयोग्य भाष्य केलेले आहे.
मुलाखतीदरम्यान बोलताना उद्धवसाहेब म्हणाले “शिवसेना,शिवसैनिक जेवढी समाजोपयोगी कामं करतात तेवढी इतर कोणताही पक्ष करत नसेल.परंतु आमचा शिवसैनिक भोळाभाबडा आहे.तो काम करतो आणि कर्तव्य मानून तो पुढे निघतो.तो त्या कामाचा कधीही नगारा पिटत नाही.मी नेहमी त्यांना सांगतो,काम केल्यानंतर अओन केलेलं काम जनतेला सांगण हेसुद्धा एक कामच आहे.आपण काय करतोय याच्यावर्ती आपली एक प्रतिमा बनत असते”.शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुखांचा हा विचार अंमलात आणणे ही काळाची गरज आहे.शिवसेनेची स्थापनाच मुळात समाजकार्यासाठी झालेली आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी शिवसेनेला ८०% समाजकारण आणि २०% राजकारणाचा मंत्र दिलेला होता, मात्र समाजकारण करायचे असेल तर सत्ता हातात असायला हवी असे शिवसेनाप्रमुखांच्या लक्षात आले.त्यानंतर शिवसेना राजकीय आखाड्यात उतरली.
शिवसेनेसाठी सत्ता महत्वाची नाही.शिवसेनेसाठी समाजकारण महत्वाचे आहे.असे असले तरी मुळात प्रभावीपणे समाजकारण करता यावे म्हणूनच शिवसेना राजकारणात उतरली.या सर्व गोष्टींचा विचार करूनच युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरेंनी १००% राजकारण आणि १००% समाजकारण असा नवा मंत्र शिवसेनेला दिला.यामागील मुख्य हेतू लक्षात घेऊन शिवसैनिकांनी कार्य करणे गरजेचे आहे.शिवसेनेने निवडणूक नसताना १००% समाजकारणावर लक्ष केंद्रित करावे आणि निवडणुकांच्या वेळी ती कामे जनतेसमोर निःसंकोचपणे मांडून निवडणूक जिंकून एकहाती सत्ता घेण्यासाठी १००% प्रयत्न करावेत.तसे केल्यास शिवसेनेची एकहाती सत्ता येण सहज शक्य आहे आणि आलेल्या एकहाती सत्तेचा वापर करून १००% समाजकारण करणे शक्य आहे.सत्ता हातात असताना जितक्या प्रभावीपणे समाजकारण करता येते तितके सत्ता नसताना करता येईलच असे नाही.
महाराष्ट्रात शिवसेनेची एकहाती सत्ता येण सहज शक्य आहे.तितका जनाधारही शिवसेनेकडे आहे.शिवसनेचे कार्यही तितके मोठे आहे.गरज आहे ती फक्त केलेलं कार्य सर्वत्र पोहोचवण्याची. राजकारणातून समाजकारण हा भविष्यातील मंत्र आहे.सत्तेचे धनुष्य हाती आले कि मग प्रगतीचा बाण सुसाट वेगाने भविष्याचा वेध घेईल.
जय महाराष्ट्र..!