Saturday, 23 July 2016



"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

जनतेची एकजूट व्हायलाच हवी..!

तरच स्वराज्याचे सुराज्य होईल..!

आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची जयंती.याच लोकमान्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सार्वजनिक उत्सव केले.केसरी व मराठा वृत्तपत्रे काढून स्वराज्य मिळवण्यासाठी रान पेटवले.“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी गर्जना करत टिळकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले आणि हिंदुस्थानातून हाकलून दिले.सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून देशासाठी लढणाऱ्या आणि बलिदान देण्यासाठी तयार असलेल्या देशभक्त तरुणांची फौज उभी करत स्वराज्यनिर्मितीत सिंहाचा वाटा उचलला.टिळक हे जहाल मताचे नेते होते.त्यांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्रांतून जळजळीत लेख लिहित झोपलेल्या जनतेला जागे केले.इंग्रजाच्या विरोधात लढण्यासाठी प्रवृत्त केले.त्यामुळेच इतिहास घडला.आज या सर्वच गोष्टींचे स्वरूप पाहता टिळकांना काय वाटेल याची कल्पनाही न केलेलीच बरी.

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा टिळकांनीच सुरु केली.आज हाच सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि मोठा उत्सव म्हणून ओळखला जातो.या उत्सवाचे स्वरूप दिवसेंदिवस विस्तारत जात असून आज महाराष्ट्रातील प्रत्येक गल्लीबोळात हा उत्सव साजरा केला जातो.स्वराज्यनिर्मितीत महत्वाचे योगदान देणाऱ्या या उत्सवाचे आजचे स्वरूप मात्र वेगळेच आहे.आजही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सामाजिक कार्याचा महायज्ञ करतात.विविध सामाजिक उपक्रम राबवतात.तस पाहिलं तर आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी टिळकांनाही अभिमान वाटावा असा आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे.असे असले तरी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नावाखाली अनेक ठिकाणी अक्षरशः धांगडधिंगा केला जातो हेही तितकेच सत्य आहे.शिवजयंतीची स्थितीही फारशी वेगळी नाही.स्वराज्यानिर्मात्या शिवरायांच्या जन्मादिनाचा वाद मिटलेला नाही.त्याउलट तो वाढतच चालला आहे.आज राज्यात ३ वेळा शिवजयंती साजरी केली जाते.

सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करण्यामागे टिळकांचा असलेला हेतू लक्षात घेण फार महत्वाच आहे.विविध कारणांमुळे एरवी घराबाहेर न पडणारे विविध क्षेत्रांतील लोक या उत्सवांच्या निमित्ताने एकत्र यावेत,लोकांमध्ये एकजूट निर्माण व्हावी,त्यातून विचारांची देवाणघेवाण व्हावी,संस्कृती वाढीस लागावी,अन्यायाला वाचा फुटावी आणि त्या अन्यायावर सर्वांनी एकजुटीने वार करावा या उद्देशांनी टिळकांनी हे उत्सव सुरु केले.आज या उत्सवांच्या नावाखाली काय चालू आहे? ज्या उत्सवामुळे देशभक्त जनता इंग्रजांच्या विरोधास लढा देण्यास एकत्र आली तोच उत्सव साजरा करणारी दोन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आज हे आमचे - ते तुमचे अस वागत भांडतात.एकमेकांचा तिरस्कार करतात.एकमेकांवर कुरघोड्या करून आपण किती श्रेष्ठ हे दाखवण्याचा प्रयत्न करता.हे पाहता आज सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीचा मुळ उद्देश बाजूला सारला गेल्याच दुर्दैवी चित्र उभं राहत असल्याच लक्षात येईल.

लोकमान्य टिळकांनी या उत्सवांचा योग्य उद्देश साधत इंग्रजांच्या विरोधात लढा दिला.इंग्रजांना हिंदुस्थानातून घालवले.आज हिंदुस्थानात इंग्रज नाहीत पण “इसिस” सारख्या दहशतवादी संघटना थैमान घालत आहेत.देशातील मुस्लीम तरुणांची माथी भडकावून “जिहाद” च्या नावाखाली अशा विषारी संघटना देशातील मुस्लीम तरुणांचा वापर करून हिंदुस्थानवर वार करत आहेत.या संघटना धर्माच्या नावाखाली हे सगळ करू शकतात तर मग सार्वजनिक गणेशोत्सवात आपण एकत्र येऊन देशासाठी एकजुटीने लढण्याची शपथ का नाही घेऊ शकत? ज्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्य उभारले त्यांच्या जयंती उत्सवात आपण देव,देश आणि धर्मावर वार करणाऱ्यांच्या विरोधात लढण्याची शपथ का नाही घेतली जाऊ शकत? तसे घडल्यास कोणत्याही अतिरेक्यांची हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही. त्यासाठी जनतेची एकजूट व्हायलाच हवी.

लोकमान्यांनी केसरी आणि मराठा या दोन वृत्तपत्रातुन आपला जहाल लेखणीने स्वराज्य मिळवण्याचा लढा उभा केला,देशासाठी लढणाऱ्या लोकांची एकजूट केली त्याच वृत्तपत्र किंवा पत्रकारिता क्षेत्रात आज नेमके काय चालू आहे? आजची पत्रकारिता ही दोन नेत्यांत आग लाऊन मजा पाहण्यात धन्यता मानते.पत्रकारिता क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची वाळवी लागलेली आहे.पैसे घेऊन बातम्या छापणे,नको त्या गोष्टीला अनावश्यक प्रसिद्धी देणे,नेत्यांची वक्तव्ये काटछाट करून त्यांच्या वक्तव्याचा अर्थच बदलेल अशी खबरदारी घेऊन ते प्रसिद्ध करणे ही कसली पत्रकारिता? खरतर पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो.आजची पत्रकारिता पाहता हे खरे वाटत नाही.अनेकदा तर आजच्या पत्रकारितेचा आणि त्यातील असत्याचा वीट येतो.हे पाहून लोकमान्यांना काय वाटत असेल? पत्रकारांनी जर विवेकबुद्धीने आणि सत्याची कास धरून पत्रकारिता केली तर आजही मोठी क्रांती होऊ शकेल.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव,शिवजयंती आणि केसरी व मराठा ही वृत्तपतत्रे माध्यम म्हणून वापरत स्वराज्य स्थापनेसाठी लढा दिला.आज त्याच स्वराज्यात टिळकांच्या या उद्देशाला हरताळ फासला जातोय.जनतेची एकजूट करायची सोडून जनतेत फुट पडण्याचे कार्य आज जोमाने सुरु आहे.हे सगळ वेळीच थांबवण्याची गरज आहे.लोकमान्यांचा आदर्श घेऊन त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून चालण्याची गरज आहे.जनतेची एकजूट व्हायला हवी.तरच स्वराज्याचे सुराज्य होईल..!

जय महाराष्ट्र..!



No comments:

Post a Comment