"वाघगर्जना"
(माझा आजचा लेख:)
भाजपचे मस्तवाल..!
हा माज बरा नव्हे..!
२०१४ साली झालेल्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे तेवढ प्रचंड यश मिळाल्याने भाजप नेते आणि कार्यकर्ते अतिउत्साहात आहेत.दिल्ली आणि बिहार सारख्या राज्यांत भाजपला दारूण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर तरी हे उडते बुडबुडे खाली येतील अशी अपेक्षा होती.प्रत्यक्षात मात्र तसे घडताना दिसत नाही.सरकारच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने जनतेच्या बाजूने काही भूमिका मांडली किंवा सरकारी निर्णयात बदल सुचवले तरी आजकाल भाजपवाल्यांना मिरच्या झोंबतात.या मिरच्या झोंबल्या की त्यांच्या नाकातोंडातून शिवसेनाद्वेषाचे फुत्कार बाहेर पडतात.त्यांच्या शरीराची लाहीलाही होऊ लागते आणि ते शिवसेनेवर नाहक टीका करतात.महाराष्ट्रात तर शिवसेनेवर टीका केली की आपला नाकर्तेपणा झाकला जातो असे समजून फार मोठे शौर्य आणि कर्तृत्व गाजवल्याच्या आविर्भावात भाजप नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेवर टीकेचा भडीमार करत असतात.
सध्या मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ येत असल्याने ती स्वबळावर जिंकण्याचे दिवास्वप्न रंगवत शिवसेनवर हल्लाबोल करण्याचा निष्फळ प्रयत्न करतात.शिवसेनेने एखादी भूमिका मांडताच भाजपचे हे टीकाकार त्या भूमिकेवर तुटून पडतात.अर्थात वाघाच्या डरकाळीनंतर बाकीच्या जनावरांचा थरथराट होऊन त्यांनी कोलाहल माजवणे हे ही साहजिकच आहे म्हणा.अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ देशांचा दौरा करून परतले.त्यातील त्यांचे अमेरिकेतील भाषण जगभर गाजले.त्या भाषणाचे शिवसेनेला कौतुक आहेच आणि अभिमानही आहे.मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून जगभ्रमण करण्याचा जो धडाका लावलेला आहे तसाच धडाका त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी भागाची पाहणी करून तेथील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि त्यांना आधार देऊन त्यांचे अश्रू पुसण्यासाठी लावायला काय हरकत होती? इतकेच आमचे म्हणणे आहे.लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोदींनी हिरीरीने सहभाग घेऊन महाराष्ट्रभर सभा घेतल्या होत्या तेवढ्याच हिरीरीने महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा दौरा केला असता तर आज महाराष्ट्राला बसलेले दुष्काळाची झळ थोडी तरी कमी झाली असती.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरेंनी शिवसेना सत्तेत असूनही सरकारी मदतीसाठी वाट न पाहता दुष्काळी भागाचा दौरा करून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला.दुष्काळी भागातील ५०० हून अधिक मुलींचे कन्यादान केले.आत्महत्याग्रस्तांच्या नातलगांचे अश्रू पुसले.शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख हे सत्ता मिळण्यापूर्वी जसे होते तसेच राहिले.त्यांनी सत्तेऐवजी जनतेला प्राधान्य दिले.शिवसेनाप्रमुखांनी दिलेला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा मंत्र शिवसेनेने आणि शिवसेना पक्षप्रमुखांनी जपला आणि अंमलातही आणून दाखवला.शिवसेना पक्षप्रमुख जे बोलतात ते करून दाखवतात आणि जे करून दाखवतात ते अभिमानाने सांगतात आणि म्हणून जनतेच्या नजरेशी नजर मिळवू शकतात.त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.मोदींनी मते मागताना केलेल्या “ब्याज समेत लौटा दुंगा” च्या घोषणांचे नेमके काय झाले? त्या हवेत विरल्या का? की त्या सुशीलमिया शिंदे फेम निवडणुकीच्या वेळी द्यायच्या घोषणा होत्या? या प्रश्नांची उत्तरे आंधळ्या मोदिभक्त भाजप नेत्यांकडे किंवा त्यांच्या चेल्यांकडे आहेत काय? हे प्रश्न केवळ शिवसेनेचे नसून महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आहेत.आत्ता या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तरी ती २०१९ मध्ये मतांचा जोगवा मागताना द्यावी लागतील आणि ती देता आली नाहीत तर जनता नरेंद्र मोदी आणि भाजपला कायमच घरी बसवून हिशेब चुकता करेल.
जनतेच्या प्रश्नांविषयी जर शिवसेना पक्षप्रमुख बोलले तर भाजपचे मस्तवाल जीवाच्या आकांताने “नमो बचाओ” मोहीम हाती घेतात.भाजपच्या विकासकामांचा कांगावा करतात.शिवसेना पक्षप्रमुखांवर वाटेल तशी टीका करतात.हेच मोदिभक्त लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या छायेखाली आडोसा घ्यायचे,आता हेच आम्हाला मोदींची महती सांगत आहेत.अहो मोदींचा महिमा तुमच्याकडेच ठेवा.त्याची टिमकी शिवसेनेसमोर वाजवू नका.मोदींचा त्यांच्या अंधभक्तांपेक्षा जास्त प्रचार शिवसैनिकांनी केलेला आहे.त्यामुळे मोदींना जाब विचारण्याचा अधिकार शिवसेनेला आणि शिवसैनिकांना आहे.शिवसेनेने जनतेची बाजू घेत सरकारी निर्णयाला विरोध केला किंवा त्यात बदल सुचवला तर थयथयाट करून शिवसेना पक्षप्रमुखांची नाहक बदनामी करून स्वतःच अपयश लपवू पाहाल तर यापुढे याद राखा.आमची बांधिलकी सरकारशी नसून जनतेशी आहे अस आम्ही लाख वेळा सांगितल आहे.जनतेचे कल्याण करणार नसाल तर तुमच्या प्रचंड बहुमताच्या सरकारचा आणि पृथ्वीतलावरील सर्वात मोठ्या पक्षाचा उपयोग काय?
सध्याचा भाजपचा मस्तवालपणा वाढत चालला असून जणू काही यापुढे कधीच हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रात निवडणुका होणार नाहीत आणि झाल्या तरी भाजपचा त्यात पराभव होणार नाही अशा आविर्भावात जवळपास सगळेच भाजप नेते आणि आंधळे नमोभक्त आहेत.त्यांना जनतेशी देणघेण आहे की नाही असा प्रश्न आता सर्वांनाच पडतोय.हा माज बरा नव्हे..! ज्या जनतेने तुम्हाला सत्तेवर बसवलं आहे तीच जनता तुम्हाला सत्तेवरून खाली खेचू शकते हे कायमच लक्षात ठेवा,आणि यापुढे शिवसेनेच्या वाटेत याल तर तुमच सरकार पाडून,नव्हे आपटवून आणि तुम्हाला जमीनदोस्त करून शिवसेनेचा भगवा डौलान फडकवू आणि भाजपमुक्त महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करू.
जय महाराष्ट्र..!
No comments:
Post a Comment