Sunday, 26 June 2016





"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

भाजपचे गोंधळी..!


पराभवाची जाणीव..!


सध्या भाजपच्या विविध स्तरांतील नेत्यांमध्ये शिवसेनेवर टीका करण्याची स्पर्धाच सुरू आहे.स्वतःची काम जनतेसमोर मांडायची सोडून भाजप सरकारमधील मंत्री,नेते,पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते शिवसेनेवर टीका करण्यात मग्न आहेत.शिवसेनेने सरकारच्या कोणत्याही निर्णयावर प्रतिक्रिया दिली की ती टीका समजून भाजपवाले शिवसेनेच्या त्या प्रतिक्रियेवर आणि प्रतिक्रिया देणाऱ्यावर अधाशासारखं तुटून पडतात.घशाला कोरड पडेपर्यंत बोंब मारून भारतीय जनता पक्ष कसा योग्य आहे आणि शिवसेना कशी चुकीची आहे हे पटवून देण्यासाठी ते जीवाचे रान करतात.शिवसेनेवर टीका करण,शिवसेनेची बदनामी करण असा एककलमी कार्यक्रम हाती घेतलेली भाजपमधील नेतेमंडळी आणि नमोभक्त कार्यकर्ते या प्रकारात अग्रेसर आहेत.

जनतेची दिशाभूल करू पाहणाऱ्या भाजपवाल्यांच्या या कोल्हेकुईला मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ येत चालल्याने वेग आला आहे.मुंबईतील मराठी जनतेची दिशाभूल करून,त्यांना शिवसेनेविरुद्ध वळवून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला स्वबळावर विजयी करण्याच दिवास्वप्न मनात बाळगून असलेले आंधळे नमोभक्त कोल्हे शिवसेनेवर तुटून पडत आहेत.अलीकडेच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईतील रस्ते प्रकरणावर बोलताना “करून दाखवलं” वाल्यांवरही कारवाई होईल अस वक्तव्य करत शिवसेनेवर निशाणा साधण्याचा बालिश प्रयत्न केला.हे करत असताना त्यांना मागील मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा विसर पडल्याच दिसत.मागील मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ येताच हेच आशिष शेलार आणि भाजपवाले विरोधकांच्या टीकेला घाबरून बिळात लपून बसलेले होते.तेंव्हा शिवसेना “करून दाखवलं” अस म्हणत केलेली काम घेऊन अभिमानाने आणि ताठ मानेने जनतेला सामोरी गेली आणि जनतेचा विश्वास संपादित करून शिवसेनेने मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकून दाखवली.

त्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी “मनोगत” मधून बरळले.त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका करत शिवसेनेला भाजपसोबत तलाक घेण्याची म्हणजेच काडीमोड घेऊन सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला देत आपल्या नसलेल्या अकलेचे प्रदर्शन मांडले.शिवसेनेने सरकारच्या काही निर्णयांवर मांडलेली मते ही टीका समजून उद्विग्न झालेल्या भंडारी यांनी आजवर आमदारकी न मिळाल्याचा रोष शिवसेनेवर काढला.शिवसेनेला सरकारवर टीका करायची असेल तर शिवसेनेन सरकारमधून बाहेर पडाव अस भंडारी याचं म्हणण आहे.भाजपला जर शिवसेनेन केलेली टीका किंवा मांडलेली मते पटत नसतील,सहन होत नसतील तर भाजपवाले शिवसेनेच्या पाठींब्यावर सत्तेत का बसलेले आहेत तेही त्यांनी स्पष्ट करावे.अनेकदा भाजप नेते मस्तवालपणे म्हणतात की शिवसेनेने सरकारचा पाठींबा काढून घ्यावा आमच्याकडे दुसरे पर्याय आहेत.याचा नेमका अर्थ काय? शिवसेनेन सरकारचा पाठींबा काढून घेतल्यास भाजपवाले पवार,भुजबळ आणि तटकरेंच्या भ्रष्ट्वादीसोबत सत्तेत बसण्याच्या तयारीत आहेत का? की अशोक चव्हाणांच्या काँग्रेस सोबत सरकार चालवणार आहेत? भाजपवाल्यांना शिवसेना सोबत नको आहे आणि हे भ्रष्टाचारी बोके सोबत हवे आहेत काय?

शिवसेनेच्या पाठींब्यावर सत्तेत बसायचं आणि हे सरकार फक्त भाजपच आहे अशी टिमकी वाजवायची. सत्तेत बसून मनमानी करायची.विरोधी पक्षात असताना सरकारच्या ज्या निर्णयांना विरोध करून मते मिळवलेली आहेत आणि सत्ता मिळवलेली आहे तेच निर्णय सत्तेचा वापर करून जनतेवर लादायचे हे सध्या भाजपच धोरण आहे,हे पाप शिवसेना करणार नाही.ते भाजपवाल्यांनी करायचा प्रयत्न केल्यास शिवसेना ते करू देणार नाही.शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी अजिबात नसून ती केवळ जनतेशी आहे.जनतेला टोप्या घालण्याच काम शिवसेना कदापि करणार नाही.मुळात भाजपवाल्यांच दुखण हेच आहे.त्यांना खरतर शिवसेनेचा पाठींबा घेऊन सत्तेत बसण्याशिवाय अजिबात पर्याय नाही.शिवसेना भाजपच्या मनमानीला विरोध करून जनतेसोबत राहते हे भाजपला सहन होत नाही.त्यामुळे गोंधळलेले भाजपचे गोंधळी आज शिवसेनेच्या विरोधात कोल्हेकुई करत आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर विजय मिळवण्याच दिवास्वप्न मनात बाळगणारे भाजपवाले हे खरतर मनातून हरलेले आहेत.मुंबई मनपा निवडणूकत पराभव समोर दिसत असल्याने खचलेले नमोभक्त उसन अवसान आणून शिवसेनेवर टीका करत आहेत.शिवसेना वाईट म्हणजे भाजप चांगला अस कस होऊ शकत? आम्ही कसे आहोत ते जनताच ठरवेल,पण तुम्ही आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुमची कामे जनतेसमोर मांडा.जनता काय खर काय खोट ठरवेल.लोकशाहीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचा न्यायनिवाडा मतदानाद्वारे जनताच करत असते.ते भाजपच काम नव्हे.मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाला तर आपली पीछेहाट होईल आणि परिणामी २०१९ साली होणाऱ्या लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत भाजपला मागे सारून शिवसेना एकहाती सत्ता मिळवेल अस लक्षात आल्यानं भाजपची ही तडफड सुरु आहे.पराभवाची जाणीव हे यामागच मुख्य कारण आहे.त्यामुळेच भाजपची फडफड सुरु आहे.त्यांच्या मनातील भय नाहीसे होऊन त्यांना शांती लाभावी हीच सदिच्छा..! आगामी काळात मुंबई,ठाणे आणि महाराष्ट्रावर भगवा फडकण तर अटळ आहे.



जय महाराष्ट्र..!

Sunday, 19 June 2016





"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

आजि सोनियाचा दिनू..!

शिवसेना चिरंजीव आहे..!

आज १९ जून २०१६.आजचा दिवस आपल्या शिवसेनेचा वर्धापनदिन. आजि सोनियाचा दिनू..!१९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली.तेंव्हापासून आजतागायत मराठी आणि हिंदुत्वाचा अजेंडा आणि भगवा झेंडा घेऊन शिवसेनेचा अश्वमेध पुढे जात आहे.शिवसेनेची ही वाटचाल ऐतिहासिक आहे.महाराष्ट्रात मराठीची गळचेपी होत असताना आणि हिंदुस्थानात हिंदुत्वाबद्दल बोलण गुन्हा असताना मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा कोणत्याही तडजोडीशिवाय अविरतपणे मांडत राहाण हे सोपं काम नाही.शिवसेनेन हे शिवधनुष्य गेली ५० वर्षे यशस्वीरीत्या पेलवल आहे.सुरवातीला शिवसेना मराठी माणसाच्या न्याय,हक्क व सेवेसाठी झटणारी सामाजिक संघटना म्हणून कार्यरत होती,मात्र समाजकारण करायचे असेल तर राजकारणात उतरण अत्यावश्यक आहे हे लक्षात येताच शिवसेना राजकारणात उतरली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा मंत्र दिला.तोच मंत्र घेऊन शिवसेना आजही कार्यरत आहे.

समाजकारणातून राजकारणात उतरलेल्या शिवसेनेला सर्वप्रथम ठाण्याची सत्ता मिळाली.त्यानंतर लगोलग महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईवर शिवसेनचा भगवा फडकला.शिवसेना महाराष्ट्रभर पसरू लागली.पुढे अयोध्येत राममंदिरासाठी छेडलेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी बाबरी मशीद उध्वस्त केली.बाबरी पडताच बाकीच्यांनी हात झटकले.बाबरी पाडण हे शिवसैनिकांच काम आहे अस वक्तव्य आंदोलनात सहभागी नेत्याने करताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी “बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे” अशी गर्जना केली.त्यामुळे बाळासाहेब हिंदुस्थानातील हिंदूंच्या गळ्यातील ताईत बनले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदूहृदयसम्राट झाले.शिवसेना हिंदुस्थानभर पसरू लागली.महाराष्ट्रात मराठी आणि हिंदुस्थानात हिंदू असा अजेंडा घेऊन वाटचाल करत असलेल्या शिवसेनेची पुढे हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपशी युती झाली.

१९९५ साली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली.हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढला.शिवसेनेचा भगवा झंझावात महाराष्ट्रभर पसरला आणि १९९५ साली शिवसेनेचा भगवा महाराष्ट्राच्या विधानसभेवर मोठ्या डौलान,अभिमानानं,स्वाभिमानान आणि जबरदस्त तेजाने फडकला.महाराष्ट्रात शिवशाही अवतरली.शिवसेनेचे मनोहरपंत जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.राज्याचा कारभार शिवसेनेच्या हाती आला.त्यानंतर केंद्रात अटलजींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार सत्तेवर आलं.दोन्ही सरकारचा रिमोट कंट्रोल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडे होता.देशाचा आणि राज्याचा कारभार “मातोश्री” च्या आदेशानुसार चालत होता.अत्यल्प दरात झुणका-भाकर देण्यापासून ते चकचकीत फ्ल्यायओव्हरपर्यंत अनेक लोकप्रिय विकासकामे या शिवशाही सरकारच्या काळात झाली.मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे,वांद्रे-वरळी सी-लिंक अशा अनेक प्रकल्पांमधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची दूरदृष्टी महाराष्ट्राने पाहिली.

शिवसेनेचा हा प्रवास सुरु असतानाच छगन भुजबळांनी शिवसेना सोडली,पण शिवसेना डगमगली नाही.२००३ साली महाबळेश्वर येथील शिबिरात शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी उध्दवसाहेब ठाकरेंची निवड झाली.शिवसेनेचा कारभार हळूहळू उध्दवसाहेब ठाकरेंकडे यायला सुरुवात झाली.त्यानंतरच्या काळात नारायण राणेला शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेतून हाकलून दिल.राणेन दहशतीच्या बळावर कोकणात काहीकाळ दादागिरी चालवली खरी मात्र शिवसेनेन राणेला शेवटी कोकणच्या मातीत गाडून राणेची दहशत संपवली.पुढे २००५ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे राज ठाकरेंनी उध्दवसाहेब ठाकरेंना कार्याध्यक्ष केल्याच कारण पुढे करत शिवसेना सोडली.त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करत शिवसेनेचाच मराठीचा अजेंडा घेऊन बाळासाहेबांच्याच शैलीत शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.शिवसेना कार्याध्यक्ष उध्दवसाहेबांनी मात्र आपल्या शांत,संयमी आक्रमक शैलीत मनसेच दुकान बंद केल.

शिवसेनाप्रमुखांचे वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थ्य यामुळे शिवसेनेची सूत्र शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानुसार कार्यप्रमुख उध्दवसाहेब सांभाळत होते.२००७ आणि २००९ साली त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेन मुंबई आणि ठाण्याच्या महानगरपालिकांच्या निवडणुका जिंकल्या.शिवसेना कार्याध्यक्ष उध्दवसाहेब ठाकरेंनी आपल्या कृतीतून नेतृत्व सिद्ध करत टीकाकारांची तोंड बंद केली. दरम्यान २०१० साली युवासेनेची स्थापना झाली.युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रातील तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडून तरुणांचा आवाज बुलंद केला.आज युवसेनेचे कार्य हिंदुस्थानसह विदेशातही चालू आहे.त्यानंतर १७ नोव्हेंबर २०१२ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनंताच्या प्रवासाला निघाले.ही घटना केवळ ठाकरे कुटुंबालाच नव्हे तर जगाला हादरवणारी ठरली.या दुःखाच्या महासागरातून सावरत उध्दवसाहेबांनी शिवसेनेला एक पाउल पुढे नेण्याचा निश्चय केला.याच काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत शिवसेनेचा निभाव लागणार नाही,शिवसेना आता संपेल अशी भाकीत वर्तवली गेली.२३ जानेवारी २०१३ साली शिवसेना पक्षप्रमुख पदाची सूत्रे हाती घेत उध्दवसाहेबांनी “रडायचं नाही लढायचं” असा निर्धार केला.२०१३ साली त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला.
२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेन महाराष्ट्रात २० जागा लढवल्या.त्यापैकी तब्बल १८ जागांवर शिवसेनेचा विजय झाला.पुढे विधानसभा निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकावून शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरेंच्या पाठीत मोदी लाटेमुळे हवेत गेलेल्या भारतीय जनता पक्षाने खंजीर खुपसला.शिवसेनेसोबत २५ वर्षांपासून असलेली युती भाजपने ऐनवेळी तोडली.शिवसेनेला एकट पडण्याचा प्रयत्न केला,मात्र तरीही या सर्व संकटांवर मत करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेबांनी मोदी लाटेला आव्हान दिल आणि मोदींच्या विरोधात लढत शिवसेना स्वबळावर ६३ जागी विजयी झाली.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांतही शिवसेनेन बाजी मारली.

आज शिवसेनचा ५० वा वर्धापनदिन मोठ्या जल्लोषात,उत्साहात आणि थाटामाटात साजरा होतोय.या ५० वर्षात शिवसेनेन आडवं येणाऱ्या प्रत्येकाला गाडून आणि आलेल प्रत्येक वादळ थोपवून ऐतिहासिक वाटचाल केली आहे.अगदी सुरुवातीपासून ते आजपर्यंत शिवसेनेवर टीका होत राहिली आहे.सुरुवातीला शिवसेनेला “वसंतसेना” आणि “सदाशिवसेना” म्हणून हिणवल गेलं.शिवसेनेवर बंदी घालण्याचे प्रयत्न झाले.अनेकांनी गद्दारी करत शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.काहींनी शिवसेना जनता पक्षात विलीन करावी असा सल्ला शिवसेनाप्रमुखांना दिला.काहींनी शिवसेना संपवण्याचा अट्टाहास करून पाहिला.पुढे शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रचंड टीका झाली.लोकसभेत शिवसेनेला मिळालेलं यश मोदींच आहे अस म्हटलं गेलं,मात्र शिवसेनेने विधानसभेत त्याच मोदींशी दोन हात करत स्वबळावर ६३ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला.२०१५ च्या दुष्काळात शिवसेना पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी शिवसेनेने मदतयाग केला.त्यासाठी अनेक योजना यशस्वीरीत्या राबवल्या.

शिवसेनेवर टीका करणारे,शिवसेनेवर बंदी घालू पाहणारे,शिवसेनेशी गद्दारी करणारे,शिवसेना जनता पक्षात विलीन करा अस सांगणारे,शिवसेना संपवण्याचा विडा उचलणारे,शिवसेना पक्षप्रमुखांवर टीकेची झोड उठवणारे कोणीही असोत ते सगळेच्या सगळे संपलेले आहेत.शिवसेनेच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला शिवसेनेन आडवं केल आहे.यापुढेही जे शिवसेनेच्या वाटेत येतील ते संपतील.एवढच नव्हे आज शिवसेनेसमोर आव्हान उभे करू पाहणारे पक्षही संपतील.शिवसेना मात्र सदैव जिवंत आणि ज्वलंत राहील.शिवसेनेबद्दल लिहायला शब्द पुरणार नाहीत.खरोखरच खूप शिवसेनेचं कार्य विशाल आहे.अशा या सुवर्णमहोत्सवी शिवसेनेचे आम्ही शिवसैनिक म्हणून एक भाग आहोत हेच आमचे परमभाग्य.

आज शिवसेना ५० वर्षांची झाली तरी शिवसेनेचे कार्य मात्र २५ वर्षांच्या तरुणाप्रमाणे जोशात सुरु आहे.सध्या शिवसेनेने दुष्काळग्रस्त बांधवांना मदतीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली आहे.शिवसेनेच्या यशस्वी “शिवजलक्रांती” योजनेने दुष्काळग्रस्तांची तहान भागायला सुरुवात झाली आहे.याचे समाधान ते केवढे? त्याची तुलना ना पैशांशी होऊ शकते ना सत्तेशी.सत्ता असो वा नसो शिवसेना लोककल्याणासाठी झटत होती,झटत आहे आणि झटत राहणार.शिवसेनेच्या पाठीशी गोरगरीब आणि गरजुंचे तसेच तमाम मराठी बांधवांचे आणि हिंदू जनतेचे आशीर्वाद आहेत.शिवराय आणि बाळासाहेबांचा विचार शिवसेनेकडे आहे.शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरेंचे कुशल नेतृत्वही शिवसेनेकडे आहे आणि युवासेनाप्रमुख आदित्यसाहेबांचे युवा नेतृत्वही शिवसेनेकडे आहे.मराठी आणि हिंदुत्वासाठी प्राण सुद्धा द्यायला तयार असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांची फौज शिवसेनेकडे आहे.मराठी आणि हिंदुत्वाचा अमृतसंगम शिवसेनेकडे आहे.अशा शिवसेनेला कोणी संपवू तर शकतच नाही पण साधा धक्काही लावू शकत नाही.शिवसेना चिरंजीव आहे..!

जय महाराष्ट्र..!
  

  

Monday, 13 June 2016



"वाघगर्जना"


(माझा आजचा लेख:)

भाजपचे मस्तवाल..!

हा माज बरा नव्हे..!


२०१४ साली झालेल्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे तेवढ प्रचंड यश मिळाल्याने भाजप नेते आणि कार्यकर्ते अतिउत्साहात आहेत.दिल्ली आणि बिहार सारख्या राज्यांत भाजपला दारूण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर तरी हे उडते बुडबुडे खाली येतील अशी अपेक्षा होती.प्रत्यक्षात मात्र तसे घडताना दिसत नाही.सरकारच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने जनतेच्या बाजूने काही भूमिका मांडली किंवा सरकारी निर्णयात बदल सुचवले तरी आजकाल भाजपवाल्यांना मिरच्या झोंबतात.या मिरच्या झोंबल्या की त्यांच्या नाकातोंडातून शिवसेनाद्वेषाचे फुत्कार बाहेर पडतात.त्यांच्या शरीराची लाहीलाही होऊ लागते आणि ते शिवसेनेवर नाहक टीका करतात.महाराष्ट्रात तर शिवसेनेवर टीका केली की आपला नाकर्तेपणा झाकला जातो असे समजून फार मोठे शौर्य आणि कर्तृत्व गाजवल्याच्या आविर्भावात भाजप नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेवर टीकेचा भडीमार करत असतात.

सध्या मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ येत असल्याने ती स्वबळावर जिंकण्याचे दिवास्वप्न रंगवत शिवसेनवर हल्लाबोल करण्याचा निष्फळ प्रयत्न करतात.शिवसेनेने एखादी भूमिका मांडताच भाजपचे हे टीकाकार त्या भूमिकेवर तुटून पडतात.अर्थात वाघाच्या डरकाळीनंतर बाकीच्या जनावरांचा थरथराट होऊन त्यांनी कोलाहल माजवणे हे ही साहजिकच आहे म्हणा.अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ देशांचा दौरा करून परतले.त्यातील त्यांचे अमेरिकेतील भाषण जगभर गाजले.त्या भाषणाचे शिवसेनेला कौतुक आहेच आणि अभिमानही आहे.मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून जगभ्रमण करण्याचा जो धडाका लावलेला आहे तसाच धडाका त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी भागाची पाहणी करून तेथील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि त्यांना आधार देऊन त्यांचे अश्रू पुसण्यासाठी लावायला काय हरकत होती? इतकेच आमचे म्हणणे आहे.लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोदींनी हिरीरीने सहभाग घेऊन महाराष्ट्रभर सभा घेतल्या होत्या तेवढ्याच हिरीरीने महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा दौरा केला असता तर आज महाराष्ट्राला बसलेले दुष्काळाची झळ थोडी तरी कमी झाली असती.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरेंनी शिवसेना सत्तेत असूनही सरकारी मदतीसाठी वाट न पाहता दुष्काळी भागाचा दौरा करून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला.दुष्काळी भागातील ५०० हून अधिक मुलींचे कन्यादान केले.आत्महत्याग्रस्तांच्या नातलगांचे अश्रू पुसले.शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख हे सत्ता मिळण्यापूर्वी जसे होते तसेच राहिले.त्यांनी सत्तेऐवजी जनतेला प्राधान्य दिले.शिवसेनाप्रमुखांनी दिलेला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा मंत्र शिवसेनेने आणि शिवसेना पक्षप्रमुखांनी जपला आणि अंमलातही आणून दाखवला.शिवसेना पक्षप्रमुख जे बोलतात ते करून दाखवतात आणि जे करून दाखवतात ते अभिमानाने सांगतात आणि म्हणून जनतेच्या नजरेशी नजर मिळवू शकतात.त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.मोदींनी मते मागताना केलेल्या “ब्याज समेत लौटा दुंगा” च्या घोषणांचे नेमके काय झाले? त्या हवेत विरल्या का? की त्या सुशीलमिया शिंदे फेम निवडणुकीच्या वेळी द्यायच्या घोषणा होत्या? या प्रश्नांची उत्तरे आंधळ्या मोदिभक्त भाजप नेत्यांकडे किंवा त्यांच्या चेल्यांकडे आहेत काय? हे प्रश्न केवळ शिवसेनेचे नसून महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आहेत.आत्ता या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तरी ती २०१९ मध्ये मतांचा जोगवा मागताना द्यावी लागतील आणि ती देता आली नाहीत तर जनता नरेंद्र मोदी आणि भाजपला कायमच घरी बसवून हिशेब चुकता करेल.

जनतेच्या प्रश्नांविषयी जर शिवसेना पक्षप्रमुख बोलले तर भाजपचे मस्तवाल जीवाच्या आकांताने “नमो बचाओ” मोहीम हाती घेतात.भाजपच्या विकासकामांचा कांगावा करतात.शिवसेना पक्षप्रमुखांवर वाटेल तशी टीका करतात.हेच मोदिभक्त लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या छायेखाली आडोसा घ्यायचे,आता हेच आम्हाला मोदींची महती सांगत आहेत.अहो मोदींचा महिमा तुमच्याकडेच ठेवा.त्याची टिमकी शिवसेनेसमोर वाजवू नका.मोदींचा त्यांच्या अंधभक्तांपेक्षा जास्त प्रचार शिवसैनिकांनी केलेला आहे.त्यामुळे मोदींना जाब विचारण्याचा अधिकार शिवसेनेला आणि शिवसैनिकांना आहे.शिवसेनेने जनतेची बाजू घेत सरकारी निर्णयाला विरोध केला किंवा त्यात बदल सुचवला तर थयथयाट करून शिवसेना पक्षप्रमुखांची नाहक बदनामी करून स्वतःच अपयश लपवू पाहाल तर यापुढे याद राखा.आमची बांधिलकी सरकारशी नसून जनतेशी आहे अस आम्ही लाख वेळा सांगितल आहे.जनतेचे कल्याण करणार नसाल तर तुमच्या प्रचंड बहुमताच्या सरकारचा आणि पृथ्वीतलावरील सर्वात मोठ्या पक्षाचा उपयोग काय?

सध्याचा भाजपचा मस्तवालपणा वाढत चालला असून जणू काही यापुढे कधीच हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रात निवडणुका होणार नाहीत आणि झाल्या तरी भाजपचा त्यात पराभव होणार नाही अशा आविर्भावात जवळपास सगळेच भाजप नेते आणि आंधळे नमोभक्त आहेत.त्यांना जनतेशी देणघेण आहे की नाही असा प्रश्न आता सर्वांनाच पडतोय.हा माज बरा नव्हे..! ज्या जनतेने तुम्हाला सत्तेवर बसवलं आहे तीच जनता तुम्हाला सत्तेवरून खाली खेचू शकते हे कायमच लक्षात ठेवा,आणि यापुढे शिवसेनेच्या वाटेत याल तर तुमच सरकार पाडून,नव्हे आपटवून आणि तुम्हाला जमीनदोस्त करून शिवसेनेचा भगवा डौलान फडकवू आणि भाजपमुक्त महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करू. 

जय महाराष्ट्र..!



Saturday, 11 June 2016





"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

काय ही अवस्था?

एकनाथाचा झाला अनाथ..!

मागील आठवड्यात महाराष्ट्र भाजपचे जेष्ठ नेते,राज्य सरकारमधील महसूल,कृषी आणि अनेक महत्वाच्या खात्यांचे मंत्री असलेल्या,विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटल्याचे स्वघोषित शिल्पकार असलेल्या आणि शिवसेना संपवण्याचे दिवास्वप्न पाहणाऱ्या एकनाथ खडसेंना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा देऊन घरी जावे लागले.विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनाद्वेषाचा एककलमी कार्यक्रम हाती घेतलेल्या खडसेंना राजीनामा द्यावा लागल्याने शिवसेनेच्या वाटेत आडवे येणाऱ्यांचे काय होते याचे दर्शन सर्वांना घडले.राणे,भुजबळ,राज अशा अनेक गद्दारांनंतर शिवसेना संपवण्याचे दिवास्वप्न पाहून स्वतःच संपलेल्यांच्या यादीत एकनाथ खडसेंचे नाव समाविष्ट झाले.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत असलेली युती मीच तोडली अशी टिमकी मिरवणाऱ्या खडसेंनी गेल्या दीड वर्षात शिवसेनाद्वेषाचा कळस गाठला होता.त्याचबरोबर “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बहुजनच हवा” अशी वक्तव्ये करून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला अनेकदा अडचणीत आणले होते.ज्युनिअर फडणवीस यांच्यामुळे मुख्यमंत्रीपद हुकल्यामुळे सिनिअर खडसेंनी अनेकदा त्यांच्यावर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला.महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचे आणि शिवसेना संपवण्याचे दिवास्वप्न पाहणाऱ्या एकनाथ खडसेंवर भोसरी येथील जमिनीच्या गैरव्यवहाराचे,अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी फोनवरून संभाषण केल्याचे आरोप झाले.तसेच त्यांच्या पीएने “गंमत म्हणून” मागितलेल्या तब्बल ३० कोटी रुपयांच्या लाचेचे प्रकरणही महाराष्ट्रभर गाजले.खडसेंच्या दुष्कृत्यांची अपकीर्ती वेगाने पसरली.परिणामी भाजपच्या स्वच्छ कारभाराच्या प्रतिमेवर शिंतोडे उडू लागले.जनतेच्या मनात भाजपविषयी शंका निर्माण होत असल्याचे पाहून खडसेंचा राजीनामा घेण्यात आला.

या सर्व प्रकरणात एकनाथ खडसे एकाकी पडले असल्याचे चित्र दिसले.मुंडेंच्या स्मृतिदिनाचे निमित्त साधून खडसेंनी भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्नही केला,मात्र शेवपार्यंत खडसेंना वाचवण्यासाठी कोणीही पुढे सरसावले नाही.शेवटी वरिष्ठांच्या आदेशानुसार “ज्युनिअर” फडणविसांकडे खडसेंना राजीनामा द्यावा लागला.जळगावचे काही नगरसेवक वगळता याचा कोणीच निषेध केला नाहीत किंवा खडसेंच्या समर्थनार्थ राजीनामेही दिले नाहीत.खडसेंच्या राजीनाम्याचे वृत्त समजताच जळगावात शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.जळगावातील भाजप कार्यालय आणि भाजप कार्यकर्त्यांत मात्र सन्नाटा पसरला होता.भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने खडसेंचा चिखलात रुतलेला पाय दिवसेंदिवस खोलात गेला आणि शेवटी खडसेंना राजीनामा द्यावाच लागला.राजीनामा दिल्यानंतरही खडसेंनी “अजूनही सांगतो पुरावे द्या” अशी आरडाओरड केली,मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही.

खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा विषयच बाजूला पडला.मंत्रीपद असताना मागेमागे धावणारे खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर मात्र त्यांची साथ सोडून गेले.अगदी स्वतःची बाजू दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसमोर मांडण्यासाठी गेलेल्या खडसेंना दिल्लीत नितीन गडकरी वगळता कोणीच भेटले नाही.पंतप्रधान मोदींनी खडसेंसाठी अर्धा तास राखीव ठेवल्याचे वृत्त आले होते,मात्र पंतप्रधानांनी खडसेंना अर्धा क्षणही वेळ न दिल्यामुळे हि बातमी अफवाच ठरली.आता खडसेंकडे ना मंत्रीपद आहे ना मानसन्मान.पक्षातही कोणी विचारत नाही आणि समाजातही मान नाही.काय ही अवस्था? त्यामुळे खडसे राजकीयदृष्ट्या अनाथ झालेत असच म्हणाव लागेल.एकनाथाचा झाला अनाथ..!

शिवसेना सोडल्यानंतर भुजबळांनी शिवसेनाप्रमुखांना अटक करण्यासाठी मुंबईचा सैन्यातळ केला होता.आज ते भुजबळ तुरुंगात खितपत पडलेले आहेत.शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेतून हाकलून दिल्यानंतर राणेंनी दहशतीच्या बळावर शिवसेनेशी पंगा घेण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यांना शिवसेनेने सहा महिन्यात दोनवेळा धूळ चारली.अगदी घराचा मतदारसंघ असलेल्या कोकणातही राणेंना पराभून व्हाव लागलं.शिवसेनेची औकात काढणाऱ्या मनसे अध्यक्षांचे दुकान आता जवळपास बंद झाले आहे.त्याचप्रमाणे शिवसेना संपवून टाकण्याची भाषा वापरणाऱ्या खडसेंना राजीनामा देऊन घरी परतावं लागलं.शिवसेना संपली म्हणणारे संपले,शिवसेना अजून जिवंत आहे आणि ज्वलंत आहे हेच खरे.शिवसेना संपवायला खडसेंच्या सातशे पिढ्या जरी खाली उतरल्या तरी ते शक्य नाही.खडसेंनी आता राजकीय संन्यास घेऊन शिवसेनेशी युती तोडल्याचे पोवाडे गात भटकायला हरकत नाही.



जय महाराष्ट्र..!