Saturday, 3 November 2018

उद्धव ठाकरे राजकरणात कसे आले?






लेखक : शशांक देशपांडे 

(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )


“वाघगर्जना: दिवाळी विशेष लेखमाला”

दिवस पहिला – लेख दुसरा

उद्धव ठाकरे राजकरणात कसे आले?

उद्धव ठाकरे सध्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. 23 जानेवारी 2018 रोजी त्यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाच्या कारकीर्दीला 5 वर्षे पूर्ण झाली.तत्पूर्वी ते शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 30 जानेवारी 2003 रोजी शिवसेनेच्या महाबळेश्वर येथे भरलेल्या शिबिरात राज ठाकरेंनी “शिवसेनेत नवीन निर्माण झालेल्या शिवसेना कार्याध्ययक्ष पदावर शिवसेना नेते श्री उद्धव ठाकरे यांची निवड या प्रतिनिधी सभेने करावी” असं म्हणत प्रस्ताव मांडला व त्याला उपस्थित सर्वांनी एकमताने मंजूरी दिली. तरीही त्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि शिवसेनेवर, शिवसेना प्रमुखांवर तसेच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंवर सडकून टीका करत आपल्यावर अन्याय कसा झाला याचे महाराष्ट्रभर जाहीर प्रदर्शन मांडले होते.त्यामुळे तेंव्हा राज ठाकरेंना सर्व स्तरांतून प्रचंड सहानुभूती मिळाली तर उद्धव ठाकरेंना प्रचंड टीकेचा “सामना” करावा लागला. हा सगळा घटनाक्रम अगदी आजही महाराष्ट्रभर “मसाला” लावून चर्चिला जातो.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची राजकीय कारकीर्द इथूनच सुरू झाली. बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमामुळे उद्धव ठाकरे थेट “शिवसेना कार्याध्यक्ष” पदावर विराजमान झाले आणि राज ठाकरेंवर अन्याय झाला असं “गोड गैरसमज” महाराष्ट्रातील आणि हिंदुस्थानातील बहुतांश जनतेला आहे. “हाफ नॉलेज ईज डेंजरस” अशी इंग्रजी म्हण आहे. दुर्दैवाने उद्धव ठाकरे राजकरणात आल्याची “मसालेदार” गोष्ट ऐकण्यातच आणि सत्य जाणून न घेता त्यांच्यावर सडकून टीका अगदी आजही करण्यात महाराष्ट्र व्यस्त आहे.

मार्च 2013 मध्ये “सामना”,एबीपी माझा इत्यादींच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मी दादरकर” या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत बोलताना ते शिवसेनेच्या राजकरणात कसे आले? याचा उलगडा केला होता. सुरूवातीला बाळासाहेबांची भाषणं उद्धवजी शिवतीर्थाच्या मातीत बसून ऐकत असत.तो काळ 1985 चा होता.बाळासाहेब शिवसेनेवर होणारी टीका “मार्मिक” मधून परतवून लावत असत.“मार्मिक” हे साप्ताहिक होतं.शिवसेना वाढत असल्याने शिवसेनेवर होणारी टीकाही वाढत होती. त्यामुळे त्या टीकेला उत्तर देण्यासाठी आणि विरोधकांचा समाचार घेण्यासाठी शिवसेनेला दैनिकाची गरज भासत होती.बाळासाहेब मार्मिक वर्धापनदिन सोहळ्यात दोन-तीन वेळा “मार्मिक” लवकरच दैनिकाच्या रूपात दिसेल असं बोलले पण त्याचा पाठपुरावा होत नव्हता.बाळासाहेबांच्या वाढत्या व्यापामुळे त्यांना दैनिक सुरू करण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता.



ही गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी बाळासाहेबांशी बोलून दैनिकाची जबाबदारी घेतली.सोबतीला बाळासाहेबांच्या “टीम” मधील सुभाष देसाई यांना सोबतीला घेतलं.कालांतराने 23 जानेवारी 1988 रोजी सामना हे शिवसेनेच मुखपत्र असलेलं दैनिक सुरू झालं. यादरम्यान उद्धव ठाकरे सामना च्या कार्यालयात बसत असत.तिथे शिवसैनिक त्यांना भेटायला येऊ लागले.केलेली कामं,आंदोलन,कार्यक्रम इत्यादिच्या बातम्या आणि फोटो “सामना” मध्ये प्रसिद्धी देण्यासाठी आणून देत असतं.यात सामान्य शिवसैनिक ते शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकार्‍यांचा समावेश होता. कालांतराने शिवसैनिक व पदाधिकारी त्याच्या काही कुरबुरी,कामे,अडचणी उद्धवजींच्या समोर मांडू लागले. आम्हाला बाळासाहेबांना त्रास द्यायचा नाही,तुम्ही लक्ष घातलं तरी हा प्रश्न सुटेल असं म्हणत उद्धवजींना त्यांची कामं/कुरबुरी सांगायला लागले.उद्धवजी सुद्धा त्या सोडवू लागले.हे सगळं होतं असतानाच उद्धवजींना कार्यक्रमाची आमंत्रणे येऊ लागली.बाळासाहेबांचा व्याप पाहून वर्धापनदिन,पुजा तसेच इतर कार्यक्रमांची आमंत्रणं शिवसैनिक बाळासाहेबांना देण्याऐवजी उद्धवजींना देऊ लागले.

कार्यक्रमाला हजेरी लावण्याच आमंत्रण स्वीकारताना उद्धवजी आलेल्या शिवसैनिकाला “मी येईन, पण भाषण करणार नाही” अशी अट घालत असत. कार्यक्रम पार पडताच भाषण न करता “अर्जंट काम” असल्याच सांगत उद्धवजी तिथून निघत असत.काही दिवस गेल्यानंतर मात्र उद्धवजींच्या मनात विचार आला की आपण जे करतोय ते काही बरोबर नाही. आपल्याला लोक एवढ्या प्रेमाने बोलंवतात तर आपण जे काही असेल ते बोलावं. त्यानंतर उद्धवजींनी बाळासाहेब जे नेहमी बोलतं असत त्याप्रमाणे “जसं आहे तसं, कोणताही मुखवटा न लावता” भाषण करायला सुरुवात केली. “जे करतोय ते प्रामाणिकपणे करतोय” असं ठामपणे सांगत उद्धवजी सर्वांना सामोरे गेले. अशाप्रकारे उद्धवजी शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात व पर्यायाने राजकरणात  आले.    

आज बाळासाहेबांच्या शैलीत नसलं तरी तितकच स्पष्ट,ठाम,मार्मिक,हजरजबाबी,संयमी आणि प्रसंगी आक्रमक अशा दोन्ही छटा असणारं वक्तृत्व उद्धवजींकडे आणि व बाळासाहेबांप्रमाणे आज उद्धवजी लाखोंच्या सभा व दसरा मेळावे गाजवत आहेत. विरोधकांना नामोहरम करण्यात आणि शिवसैनिकांची मनं जिंकण्यात बाळासाहेबांची “स्टाईल” कॉपी न करता स्वतःची वक्तृत्वशैली निर्माण करणारे यशस्वी झाले आहेत.       
                                                                                                       

लेखक : शशांक देशपांडे 

(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )

No comments:

Post a Comment