लेखक : शशांक देशपांडे
(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )
“वाघगर्जना: दिवाळी विशेष
लेखमाला”
दिवस सातवा – लेख तेरावा
ठाकरेंची संपत्ती किती आहे?
काही दिवसांपूर्वीच जयदेव
ठाकरेंनी त्यांची याचिका मागे घेताच ठाकरेंच्या संपत्तीचा कोर्टात सुरू असलेला वाद
मिटला. सध्या “मातोश्री-२” चं बांधकाम सुरू आहे. यावरून अनेकवेळा “ठाकरेंची
संपत्ती किती आहे?” हा विषय दबक्या आवाजात चर्चेला येतो. निवडणुकीच्या धुळवडीत विरोधक अनेकदा आरोप करत
ठाकरेंनी त्यांची संपत्ती जाहीर करावी अशी मागणी करतात. अशाच आरोपांना उत्तर
म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या जाहीर सभेत शरद पवारांना
“कोरा कागद आणा, माझी संपत्ती तुम्हाला मी देतो आणि तुमची
जेवढी संपत्ती आहे तेवढी तुम्ही माझ्या नावावर करा” असं आव्हान दिलं होतं. शरद
पवारचं काय ईतर कोणत्याही विरोधकाला हे आव्हान पेलवलं नाही. हे झालं आर्थिक संपत्तीबद्दल, पण ठाकरेंची संपत्ती केवळ पैसा आणि प्रॉपर्टी एवढचं नव्हे. ठाकरेंवर
असलेला कोट्यवधी हिंदूंचा, मराठी माणसांचा आणि शिवसैनिकांचा
विश्वास, आणि निष्ठा, शिवसेनेच्या सभांना होणारी लाखोंची गर्दी आणि ठाकरेंच्या आदेशावर काहीही
करायला तयार असलेले शिवसैनिक हीच ठाकरेंची संपत्ती आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब
ठाकरेंना लहानपणीच त्यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरेंनी घराच्या
दारासमोर असणारे चपलांचे जोड दाखवत “ही आपली संपत्ती आहे आणि तू ती आयुष्यभर जप”
असं सांगितलं होतं. तेंव्हा शिवसेना नव्हती पण ठाकरे कुटुंबाकडे असलेली जनसंपत्ती
मात्र प्रचंड होती. बाळासाहेबांनी ती संपत्ती आयुष्यभर जपली व वाढवली आणि आता
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ती जपत व वाढवत आहेत. “मातोश्री”वर मदत
मागण्यासाठी शत्रू जरी गेला तरी तो रिकाम्या हाताने परतत नाही, मग ती मदत कोणत्याही स्वरूपाची असो. “मातोश्री”चा पाहुणचार जगभर प्रसिद्ध
आहे. बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शिवसैनिकला
आपलं हक्काचं वाटणारं “शिवसेना भवन” सुद्धा जनसामान्यांच्या मदतीसाठी आणि अडचणी
सोडवण्यासाठी सदैव खुलं आहे. त्यामुळेच कोट्यवधी हिंदू,
मराठी जनतेचा ठाकरे घरण्यावर विश्वास आहे. सत्ता असताना अथवा नसताना शिवसेनेने केलेली
जनहिताची कामं, जनहिताच्या आड येणार्या निर्णयांना केलेला विरोध, जनतेच्या न्याय व हक्कांसाठी दिलेले लढे व केलेली आंदोलनं यामुळे शिवसेना
जनतेला आधार वाटते आणि जनतेच्या मनात शिवसेनेविषयी सदैव प्रेम आहे.

ठाकरे घराण्यावर शिवसैनिकांची असलेली
निष्ठा तर काय वर्णावी? नारायण राणे कॉंग्रेसमध्ये गेल्यावर जोपर्यंत
त्यांचा पराभव होत नाही तोपर्यंत मी अनवाणी फिरेन अशी प्रतिज्ञा करणारे अरविंद भोसले
हे तब्बल नऊ वर्ष अनवाणी फिरत राहिले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक
राऊत यांनी नीलेश राणेंना धूळ चारली. त्यानंतर स्वतः शिवसेना पक्षप्रमुखांनी अरविंद
भोसलेंना पादत्राणे परिधान करण्यास सांगितलं, मात्र अरविंद भोसले
नारायण राणेंचा पराभव झाल्यावरचं आपण पादत्राणे परिधान करणार असं शिवसेना पक्षप्रमुखांना
नम्रपणे सांगते झाले. २०१४ विधानसभेत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी नारायण राणेंना धूळ
चारली. त्यानंतरचं अरविंद भोसले यांनी पादत्राणे परिधान केली. २०१५ च्या वांद्रे पूर्व
मतदारसंघात पुन्हा राणेंनी शिवसेनेविरोधात निवडणूक लढवली. अरविंद भोसलेंनी पुन्हा प्रतिज्ञा
केली. निवडणूक शिवसेनेने जिंकली आणि भोसलेंची प्रतिज्ञा पूर्ण झाली. केवढी ही निष्ठा? इतर कोणत्याही पक्ष अथवा संघटनेच्या वाट्याला हे भाग्य येणार नाही.
शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार
मोदींच्या मंत्रिमंडळतील मंत्रीपदाला लाथडणारे अनिल देसाई हे सुद्धा शिवसैनिकांच्या
निष्ठेच अप्रतिम उदाहरण आहे. मोदीलाट येत असल्याचे पाहून अनेक विरोधक सुद्धा
एनडीए मध्ये सामील झाले आणि त्यांनी मंत्रिपद मिळवलं. सुरेश प्रभू यांनी तर मिसकॉल
द्वारे भाजपमध्ये प्रवेश करत मंत्रिपद मिळवलं. अनिल देसाई यांनी मात्र शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार मंत्रीपद स्वीकारण्यासाठी दिल्ली मध्ये दाखल झालेले
असताना सुद्धा मंत्रीपदाला लाथ मारली आणि ते मुंबईकडे परत फिरले. मुंबईत विमानतळावर
दाखल होताच शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशांचा गरज, प्रचंड घोषणा आणि भगवे झेंडे फडकवत
केलं. “शिवसेना भवन” मध्ये दाखल झाल्यावरसुद्धा त्यांचं अशाच पद्धतीने स्वागत केलं
गेलं. मोदींच्या मंत्रीपदाची शपथ घेणार्या देशातील कोणत्याच मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी
किंबहुना मोदी पंतप्रधान झाल्यावर सुद्धा मोदीभक्तांनी जेवढा जल्लोष केला नसेल त्याच्या
कितीतरी पटीने शिवसैनिकांनी मंत्रिपद लाथाडून आलेल्या अनिल देसाईंच्या स्वागतासाठी
जल्लोष केला. आजच्या स्वार्थी युगात स्वार्थापुढे काहीच नाही असं म्हणतात. अनिल देसाई
यांनी स्वार्थापेक्षा निष्ठा महत्वाची आहे हे दाखवून दिलं. याच निष्ठेवर शिवसेना उभी
आहे. अशी शेकडो उदाहरणं देता येतील. ही ठाकरेंची खरी संपत्ती आहे.
कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता
शिवसेनेचा प्रचार करणारे शिवसैनिक, जनतेच्या प्रश्नांवर आंदोलनं करणारे शिवसैनिक, शिवसेनेच्या सभांना लाखोंच्या संख्येनं हजेरी लावणारे शिवसैनिक, शिवसेनेच्या रक्तदान महायज्ञ उपक्रमात रक्तदान करून तब्बल २५ हजारांहून अधिक
बाटल्या रक्त जमा करून विश्वविक्रम करणारे शिवसैनिक, घरचा दसरा
सोडून शिवतीर्थावर विचारांचं सोनं लुटायला जमणारे लाखो शिवसैनिक, अन्यायाला लाथ मारून न्याय मिळवून देणारे शिवसैनिक,
गरजेला धावून जाणारे शिवसैनिक, दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मदत
करून त्यांचे अश्रु पुसणारे शिवसैनिक, आपल्या नेत्याच्या आदेशावर
वाट्टेल ते करण्यासाठी तयार असलेले शिवसैनिक ही ठाकरेंची अफाट इस्टेट आहे. ही कोणत्याही
पक्षाला अथवा संघटनेला मिळवता येणार नाही आणि कोणत्याही विरोधकाला मोजता येणार नाही.
या संपत्तीच्या बळावरचं शिवसेना आचंद्रसूर्य जिवंत आणि ज्वलंत राहील.
लेखक : शशांक देशपांडे
(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )