Friday, 25 March 2016



“वाघगर्जना”


(माझा आजचा लेख-:)


काहीही हं श्री..!


महाराष्ट्र अखंडच ठेवू..!


महाराष्ट्राच्या दुर्दैवाने इतके दिवस महाराष्ट्राच्या महाधिवक्ता पदावर असलेले महाराष्ट्रद्रोही,स्वतंत्र विदर्भछाप श्रीहरी अणे मागील आठवड्यात पुन्हा बरळले.विदर्भाप्रमाणेच महाराष्ट्रापासून मराठवाडाही वेगळा करा अशी बिनडोक मागणी त्यांनी केली.तसेच विदर्भापेक्षा मराठवाड्यावर जास्त अन्याय झालेला असून वेगळ्या मराठवाड्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा अशी भाषा वापरत अणेंनी अखंड महाराष्ट्रद्रोहाची सीमा ओलांडली.महाराष्ट्राला मुंबई मिळण्यासाठी लढा द्यावा लागला.या लढ्यात अनेकांनी प्राणांची आहुती दिल्यामुळेच आज संयुक्त महाराष्ट्र उभा आहे आणि मुंबई महाराष्टाची राजधानी आहे.शिवाय बेळगाव महाराष्टाला जोडण्यासाठीही लढा चालूच आहे.हे सगळ विसरून वेगळा विदर्भ,वेगळा मराठवाडा अशा मागण्यांद्वारे महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणे हा हुतात्म्यांचा अपमान आहे.


शिवसेना नेहमीच स्वतंत्र विदर्भाच्या मागणीच्या विरोधात होती,आहे आणि राहील.मराठवाडा वेगळा करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.भारतीय जनता पक्ष जरी छोट्या राज्यांच्या भूमिकेचे समर्थन करत असला तरी शिवसेना महाराष्ट्राचे तुकडे कदापि होऊ देणार नाही.शिवसेना सदैव बेळगावसह अखंड संयुक्त महाराष्ट्रासाठी लढत राहील.भारतीय जनता पक्षाला जर खरोखरच विदर्भाची काळजी वाटत असेल तर आज भाजपचे अनेक प्रमुख मंत्री आणि नेते विदर्भातील आहेत,त्यांच्या माध्यमातून भाजपने विदर्भाचा विकास करून दाखवावा.ते जमणार नसेल तर भाजपने स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर घेतलेली सत्ता सोडावी.सत्ता घेण्याआधी स्वतंत्र विदर्भ असे आश्वासन देणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मध्यंतरी आम्ही स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिलेच नव्हते असे वक्तव्य केलेले होते.आता भाजप पुन्हा स्वतंत्र विदर्भाचा नारा देत आहे,मात्र हे त्याचे दिवास्वप्न आहे.शिवसेना ते कदापि पूर्ण होऊ देणार नाही.

श्रीहरी अणेंनी हे महाराष्ट्रद्रोही वक्तव्य करताच शिवसेनेने त्याचा तीव्र शब्दात निषेध केला.तसेच अणेंची हकालपट्टी होईपर्यंत शिवसेना विधिमंडळ कामकाज चालू देणार नाही,शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकांमध्ये सहभागी होणार नाहीत अशी आक्रमक भूमिका घेतली.विधान परिषदेतही तुफान रणकंदन झाले.शिवसेनेसोबतच काँग्रेस-राष्ट्रवादीनेही अणेंच्या वक्तव्याचा निषेध केला.अणेंची महाधिवक्ता पदावरून हकालपट्टी करा अशी मागणी शिवसेनेसह सर्व विरोधकांनी केली.अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी श्रीहरी अणेंना राजीनामा द्यायला लावत त्यांची पदावरून हकालपट्टी केली.शिवसेनेच्या अखंड महाराष्ट्राच्या भूमिकेचा विजय झाला.ज्या महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी शेकडो हुतात्म्यांनी बलिदान दिल,त्या महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे या अणेंनी केली होती.उद्या सगळेच उठून प्रत्येक जिल्हा स्वतंत्र करा अशी मागणी करतील.एखाद्या भागाचा विकास झाला नसेल तर त्या भागाचा विकास करणे सरकारचे काम आहे.श्रीहरी अणेंनी “भाजपने विदर्भाचा विकास करावा.जमत नसेल तर सत्ता सोडावी” अशी भूमिका का नाही घेतली? राज्याच्या एखाद्या भागाचा विकास झाला नसेल म्हणून तो भागच राज्यापासून वेगळा करा अशी मागणी अणेंनी का करावी.महाराष्ट्राचे तीन तुकडे पडण्याची मागणी म्हणजे काहीही हं श्री..!

अणेंचे प्रकरण संपते न संपते तोवर भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या प्रमुख विजया रहाटकर यांनी नाशिकमध्ये स्वतंत्र मराठवाडा ही लोकभावना आहे अस वक्तव्य केल.यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी त्यांचा निषेध करण्यासाठी भाजपचे कार्यक्रमस्थळ गाठले.शिवसैनिक निषेद करत असतानाच कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून भाजप कार्यकर्त्यांनी चिथावणीखोर भाषा वापरली.यामुळे चिडलेल्या शिवसैनिकांनी अखंड महाराष्टाच्या घोषणा देत कार्यक्रमच उधळून लावला.हे सगळं कमी होत म्हणून की काय संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो.वैद्यही बरळले.त्यांनी महाराष्ट्राचे तीन नव्हे तर चार भाग करा असे वक्तव्य केले.अरे महाराष्ट्र म्हणजे तुम्हाला कलिंगड वाटतोय का? दोन भाग करा,नाही दोन नको तीन भाग करा आणि आता चार भाग करा.हा सगळं संघ परिवार आणि महाराष्ट्राचा अजेंडा आहे.समोरून करता येत नाही म्हणून आडून करायचं,पण करायचं असा त्यांचा डाव आहे.

महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे मूळ हे संघ विचारधारेत आणि संघ कार्यपद्धतीत आहे.संघाच्या अजेंड्याद्वारे हे विष पसरवले जात आहे.संघाच्या कार्यपद्धतीत महाराष्ट्राचे चार भाग आधीच केले गेलेले आहेत.अभाविपनेही महाराष्ट्राचे तुकडे करून तीन राज्यात विभागणी असलेली कार्यरचना केली आहे.आता भाजपची सत्ता केंद्र व राज्यात असल्याने महाराष्ट्राच्या विभाजनाचे स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा डाव आहे.महाराष्ट्र विभाजनाचा मुद्दा मुळासकट उखडायचा असेल तर आपल्या कार्यपद्धतीत महाराष्ट्राची शकले करणाऱ्या संघ आणि संघ परिवारातील अभाविप यांसारख्या महाराष्ट्रद्रोही विभाजनवाद्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.शिवरायांचे नाव घ्यायचे आणी त्यांच्या महाराष्ट्राचे तुकडे करायचे ही कोणती पद्धत?

संघ आणि संघ परिवाराला “अखंड हिंदुस्थान” करायचा आहे.ही उत्तम गोष्ट आहे,पण हिंदुस्थानचा विस्तारानी महाराष्ट्राचे तुकडे हा विरोधाभास कसा काय? शिवसेना नेहमीच अखंड महाराष्ट्रासाठी लढा देत आली आहे.वेळप्रसंगी महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करू पण महाराष्ट्र अखंडच ठेवू..!

 जय महाराष्ट्र..!



No comments:

Post a Comment