Saturday, 6 August 2016



"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

“फ्रेंडशिप डे” : आधुनिक अंधश्रद्धा..!

हास्यास्पद कटुसत्य..!

उद्या ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार.हा दिवस म्हणे फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. पाश्चिमात्य देशातून हिंदुस्थानात आलेला हा “फ्रेंडशिप डे” अनेकजण नको तितक्या उत्साहाने साजरा करतात.हिंदुस्थानी संस्कृतीला,प्रथांना,सण,उत्सवांना नावे ठेवणारे प्रामुख्याने पाश्चात्य संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी हिरीरीने सहभाग घेतात.विशेष म्हणजे यातील एक टक्का लोकांनाही “फ्रेंडशिप डे” का साजरा केला जातो? हेच माहिती नाही.“फ्रेंडशिप डे” पाश्चिमात्य देशातून आलेला असल्यामुळे अनेक हिंदुत्ववादी संघटना त्याला विरोध करतात.हिंदुस्थानी संस्कृतीचे जतन करा,पाश्चात्य संस्कृतीमधून आलेला “फ्रेंडशिप डे” साजरा करू नका असे म्हणणे ते मांडत असतात.त्यावरून नेहमीच फ्रेंडशिप डे समर्थक आणि विरोधकांत खटके उडत असतात.अशा या “फ्रेंडशिप डे” मागील इतिहास जाणून घेतले असता एक हास्यास्पद कटुसत्य जगासमोर येईल.

आजची युवा पिढी ही एखाद्या गोष्टीमागे लागली कि ती पार वेडी होऊन त्यामागे धावायला लागते.तसेच आजच्या पिढीला त्यांच्या मनाविरुद्ध एखादी चांगली आणि हितावह गोष्ट सांगितली तरी ती रुचत नाही.त्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन तर होत नाहीच उलट त्यांना बदलायला सांगणे म्हणजे साखळदंडांनी जखडून ठेवल्यासारखे वाटते.त्यामुळे “फ्रेंडशिप डे” करू नका असे सांगायचे असेल तर त्यामागील इतिहास समजावून सांगणे अत्यंत जरुरीचे आहे.

“फ्रेंडशिप डे”चा इतिहास समजल्यास त्यामागे धावणाऱ्या लोकांपैकी किमान ५०% लोकांना तरी स्वतःवर हसू येईल.“फ्रेंडशिप डे” साजरा करण्याची परंपरा नेमकी कशी सुरु झाली हे जाणून घेतल्यास “फ्रेंडशिप डे” साजरा करणाऱ्यांची अवस्था झापड लावलेल्या घोड्यासारखी किंवा कळपातील पहिली मेंढी जिकडे जाईल तिकडे वळणाऱ्या हजारो मेंढरांसारखी होईल.“हॉलमार्क कार्ड” नावाच्या ग्रीटिंग कार्ड बनवून विकणाऱ्या कंपनीचा मालक असलेल्या जॉयस हॉल नावाच्या व्यक्तीने १९३० साली आपल्या दुकानातील ग्रीटिंग्ज खपवण्यासाठी “फ्रेंडशिप डे” ची संकल्पना वापरली.त्यावेळी सुट्टीचा दिवस म्हणून रविवारची निवड करून २ ऑगस्ट हा दिवस “फ्रेंडशिप डे” ,म्हणून निश्चित केला गेला.त्यामागे दुसर काही एक कारण नाही.त्यानंतर काही दशकांचा कालावधी गेल्यानंतर “फ्रेंडशिप डे” चं प्रस्थ वाढायला लागल.अस असलं तरीही फ्रेंडशिप डे हा काही जागतिक पातळीवर एकदाच साजरा केला जातो अस अजिबात नाही.

जागतिक “फ्रेंडशिप डे” ची संकल्पना प्रथम २० जुलै १९५८ रोजी मांडण्यात आली.काही देशांत ३० जून, काही देशांत २० जुलै तर काही देशांत ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी “फ्रेंडशिप डे” साजरा केला जातो.“फ्रेंडशिप डे” हा काही “युनिव्हर्सल” दिवस नाही.तो विविध ठिकाणी विविध दिवशी साजरा केला जातो.हातात “फ्रेंडशिप बँड” बांधून मैत्री जपण्याचा,मित्रांबद्दल सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून अनेकजण “फ्रेंडशिप डे” साजरा करतात.हा दिवस साजरा करण्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही.कोणतीही धार्मिक परंपरा नाही.कोणताही इतिहास नाही आणि कोणताही वारसा नाही.त्यामुळे “फ्रेंडशिप डे” साजरा केल्याने कोणताही सामाजिक अथवा सांस्कृतिक फायदा नाही. “फ्रेंडशिप डे” साजरा केल्याने हिंदुस्थानी संस्कृतीचा ऱ्हास होईल असे अनेकांचे म्हणणे.ते खरेही आहे,मात्र आपली संस्कृतीही एवढ्या छोट्या कारणामुळे ऱ्हास पावेल इतकी कमकुवत नाही,अजिबात नाही.हिंदू धर्मातील प्रथांना शास्त्रीय कारणे असतानाही आणी ते सिद्ध झालेलं असतानाही त्याला अंधश्रद्धा ठरवणे आणि कोणतेही शास्त्रीय अथवा सांस्कृतिक कारण नसलेल्या “फ्रेंडशिप डे” चा मात्र उदोउदो करणे ही गोष्ट कदापि खपवून घेतली जाणार नाही.

“फ्रेंडशिप डे” साजरा करण्याचा फायदा अजिबात नाही हे जितके सत्य आहे,तितकेच तो साजरा करण्याचे तोटेही नाहीत हेही सत्य आहे.आपली संस्कृती न विसरता “फ्रेंडशिप डे” साजरा केला तर त्यामुळे फायदा आणि तोटा दोन्हीही होणार नाही.आधी आपली संस्कृती जपायला हवी.मगच दुसरीकडच्या चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात.त्याला काहीतरी अर्थही असण गरजेच आहे. “फ्रेंडशिप डे” हे खरतर अंधश्रद्धेच प्रतिक मानायला हव.जी गोष्ट काहीच आधार नसताना अवलंबली जाते ती अंधश्रद्धा. “फ्रेंडशिप डे” चे सुद्धा असेच आहे.कोणी एकाने स्वार्थासाठी “फ्रेंडशिप डे” सुरु केला म्हणून आपण त्यामागे धावण याला मूर्खपणाच म्हणावं लागेल.असा मूर्खपणा तर आजच्या युगातील गाढवं आणि मेंढरही करत नसतील.त्यामुळे “फ्रेंडशिप डे” ही आधुनिक अंधश्रद्धाच आहे.त्याबद्दल कमीतकमी जागरूकता तरी व्हायलाच हवी.



जय महाराष्ट्र..!

No comments:

Post a Comment