Thursday, 18 October 2018






“वाघगर्जना“

(“विजयादशमी विशेष लेख”)


हे सीमोल्लंघन कराच..!


चला उठा, भगव्याचं मोहोळ उठवा..!


आज विजयादशमी.आजच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता तसेच पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरून उतरवली होती.पराक्रम आणि विजयाची आज विजयादशमी.विजयादशमीला शस्त्रपूजन करण्याची परंपरा आहे.तसेच आपट्याची पानं सोनं म्हणून वाटण्याची प्रथा आहे.शिवसेनेचा वैभवशाली,पारंपरिक दसरा मेळावासुद्धा आज संपन्न होईल.म्हणून म्हटलं हाच मुहूर्त साधून पुन्हा “वाघगर्जना” करावी.लेखणीरूपी शस्त्राच पूजन करावं आणि विचारांचं सोनं लुटावं.


विजयादशमीला सीमोल्लंघन म्हणून गावची सीमा ओलांडण्याची प्रथा-परंपरा आहे, पण शिवसेनेचा भगवा विधानसभेवर प्रचंड बहुमताने फडकवायचा असेल तर सीमोल्लंघन थोडसं निराळ्या पद्धतीने करावं लागेल.खास करून सोशल मीडियावर प्रचार करणार्‍या शिवसैनिकांनी काही सीमांच उल्लंघन करावं लागेल.अगदी हजारो शिवसैनिक अहोरात्र सोशल मीडियावर शिवसेनेचा प्रचार स्वखर्चाने करत असतात.तरीदेखील त्याचा म्हणावा तितका परिणाम होत नाही.यामागील मुख्य कारण म्हणजे समन्वय आणि एकवाक्यतेचा अभाव.प्रभावी प्रचारासाठी समन्वय साधण आणि एकवाक्यता राखणं अत्यंत महत्वाचं आहे.यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.एकवाक्यता राखण्यासाठी शिवसेनेविषयी पोस्ट करताना जे सत्य आणि वास्तव आहे तेच योग्य ती पडताळणी करून मांडायला हवं.


सोशल मीडियाद्वारे होणारे नुकसान टाळण्यासाठी सत्याची कास धरणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.प्रचारासाठी फेक सर्व्हे अथवा बातम्यांचा आधार घेऊ नये.एखादी बातमी मोडून-तोडून पोस्ट करू नये.शिवसेनेच्या अधिकृत भूमिका नीट समजून घेऊन मांडण्याचा प्रयत्न करावा.एखाद्या नेत्याचे वक्तव्य ऐकल्याशिवाय व्हायरल क्लिपच्या आधारे त्यावर प्रतिक्रिया/टिप्पणी करू नये.आपल्या पक्षाची भूमिका समजून न घेता त्यावर टीका करू नये.शिवसेनेची ध्येय-धोरणे ठरवण्यास तसेच निर्णय घेण्यास शिवसेना पक्षप्रमुख समर्थ आहेत.त्यामुळे हे करा-ते करा असे सल्ले देण्यापेक्षा त्यांचा आदेश येईल त्याप्रमाणे लढण्यावर भर द्यावा.महत्वाच म्हणजे आज “बाळासाहेब असते तर..” यावर काल्पनिक पोस्ट करू नयेत. एखाद्या नेत्याच्या शिवसेना प्रवेशाच्या अफवा पसरवू नयेत. तसेच इतरही अफवा पसरवणे टाळावे.


शिवसैनिकांनी सकारात्मक प्रचाराचा मार्ग अवलंबला तर त्याचे उत्तम परिणाम होतील.अस्तित्व नसलेल्या नेत्यावर/पक्षावर टीका करण्यात शक्ति खर्च न करता शिवसेनेच्या कार्याच्या पोस्ट तसेच शिवसेनेच्या विचाराच्या आणि भूमिकांच्या पोस्ट करण्यावर भर द्यावा.अतिरंजक/अतिउत्साही पोस्ट करणे टाळावे.शिवसेनेच्या पुढील निवडणुकीत किती जागा लागतील याची अवास्तव भाकितं करणं टाळावं.अशाने आपणच गाफिल राहण्याची शक्यता असते.


शिवसेनेचा प्रचार करताना असभ्य भाषेचा वापर टाळावा.सुसंस्कृत व सभ्य भाषेत चर्चा करावी व पोस्ट/कमेंट्स कराव्यात.तसेच शिवसेनेचा डीपी/प्रोफाइल फोटो लावून इतर पेजेसवर असभ्य वर्तन टाळावे.शिवसेनेच्या प्रतिमेला साजेसे वर्तन ठेवावे.शिवसैनिकांच्या पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करावे.


शिवसेना स्थापनेपासून शिवसेनाप्रमुखांनी जातीभेद गाडून केवळ महाराष्ट्रात मराठी व हिंदुस्थानात हिंदू असा संदेश दिला.त्यामुळे शिवसैनिकांनी जातीचा उल्लेख टाळावा.जातीयवादाला खतपाणी घातले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.महापुरुषांचा अवमान होईल अशा पोस्ट करू नये.


विधानसभेवर भगवा फडकवण्याचे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्नं साकारण्यासाठी झटायचे असेल तर त्यात सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून आपला वाटा उचलता येईल.शिवसेना सोशल मीडिया प्रचारातील काही उणीवा /सीमा आम्ही येथे मांडल्या आहेतं. त्या दूर व्हायला हव्यात.त्यासाठी या वरील गोष्टी अमलात आणाव्यात.शिवसेनेच्या सोशल मीडिया प्रचाराला प्रभावी करण्यासाठी हे सीमोल्लंघन कराच..!चला उठा, भगव्याचं मोहोळ उठवा..!


जय महाराष्ट्र..!