Sunday, 16 April 2017



वाघगर्जना

 (माझा आजचा लेख-:)

मुख्यमंत्री महोदय तुम्ही काय करताय?

..तशी तुम्हालाही जनता लाथ घालेल..!

येत्या मे महिन्यात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या भाजप सरकारला तीन वर्षे पूर्ण होतील.त्यापाठोपाठ महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारला अडीच पूर्ण होतील.महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तरी लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपची सत्ता आली.नगरपालिका निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला.त्यापाठोपाठ झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपला " भूतो- भविष्यति" असे यश मिळाले.मुंबई आणि ठाणे वगळता सर्वत्र भाजपचाच जोर दिसला.अपेक्षेपेक्षा जास्त मोठा विजय मिळवत भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीचे गड खालसा केले.जिल्हा परिषदेतही भाजप यशस्वी झाला.सर्वत्र भाजपचा बोलबाला दिसून आला.या यशाच्या बळावर २०१९ साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळावर विजय मिळवण्याचे दिवास्वप्न भाजप नेत्यांना पडत आहे.

गेल्या अडीच-तीन वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने विकासकामे केली नाहीत अशातला भाग नाही,परंतु अग्रक्रमाने सोडवले जायला हवे होते असे अनेक  प्रश्न  अजूनही जिथल्या तिथे आहेत.खासकरून महाराष्ट्र सरकार याबाबतीत कमी पडलेले दिसत आहे.महाराष्ट्राला गेल्या तीन-चार वर्षात दुष्काळाने ग्रासले होते.यंदा त्यामानाने चांगला पाऊस झाला असला तरी अनेक भागात दुष्काळी स्थिती कायम आहे.तसेच मागील तीन-चार वर्षे शेतात काहीच पिकल्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर साचलेला आहे.कर्जाची परतफेड करता येणे शक्य नसल्याने शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत.शेतकरी बापाची  खालावत जाणारी परिस्थिती पाहून आपल्या लग्नासाठी वडिलांनी खर्च केल्यास कर्जाचा डोंगर वाढेल असा विचार करत शेतकऱ्याच्या मुली आत्महत्या करत आहेत.पाण्याचा प्रश्न तसाच आहे.रस्त्यांची स्थिती तर अतिशय खराब झाली आहे.मूलभूत सुविधांची अजूनही कमतरता आहे.मग मुख्यमंत्री महोदय तुम्ही काय करताय?

सध्या घरबसल्या महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेणं शक्य नसल्याने आपण फक्त सोलापूर शहराचा आढावा उदाहरणादाखल घेऊ.सोलापुरात लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे सुशीलमिया शिंदे खासदार होते.ते काँग्रेस सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री होते.२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीच्या शरद बनसोडेंनी त्यांचा जवळपास दिड लाख मतांनी दारुण पराभव केला आणि भाजपचा झेंडा फडकवला.त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहरातील पैकी मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले.त्यापैकी शहर उत्तर मतदारसंघातून विजयकुमार देशमुख यांची हि तिसरी टर्म आहे.सध्या ते राज्यमंत्री आणि पालकमंत्री आहेत.शहर दक्षिण मधून विजयी झालेल्या सुभाष देशमुख यांची थेट राज्य सरकारच्या सहकारमंत्री पदावर वर्णी लागली.नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रथमच सोलापूर मनपावर भाजपची एकहाती सत्ता आली.सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपप्रणित आघाडीचा अध्यक्ष विराजमान झाला.हा सगळा भाजप पक्षाचा विकास झाला,शहराचं काय?

सोलापूर शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे,पण शहरात अजून मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत.लोकसभा निवडणुकीत केंद्रात सरकार आलं तेंव्हा म्हणाले अजून आमच्याकडे विधानसभा आणि महापालिकेतील सत्ता नाही.विधानसभेत सत्ता आली.तरी विकासकामे ठप्पच.तेंव्हा म्हणाले आमच्याकडे महापालिका नाही.रस्ते-पाणी यासारख्या गोष्टी महापालिकेच्या अंतर्गत येतात.आता महापालिकेतही सत्ता आली.आता काही तक्रार केली कि उत्तर काय तर म्हणे सत्ता आली तरी मागच्या सत्ताधाऱ्यांनी काय केलंय ते दुरुस्त करायला नको का? त्यांना ६० वर्षे दिली,आम्हाला वेळ नको का? हा काय प्रकार आहे? पाच वर्षे झाल्यावर म्हणतील त्यांना ६० वर्षे दिली आम्हाला फक्त .मग काय तुम्ही पण ६० वर्षे वाया घालवणार काय?ज्या शहरात पाणी उपलब्ध असून त्याच नियोजन नाही,हद्दवाढ भागात सांडपाण्याची विल्हेवाट लावायची सोया नाही,शहरातील बहुतांश रस्ते होते कि नव्हते या स्थितीत आहेत,उद्याने सुसज्ज नाहीत,तलावांची स्थिती खराब आहे,उत्तम दर्जाची मैदाने नाहीत,जलतरण तलाव नाहीत,भव्य नाट्यमंदिर नाही अशा शहराला स्मार्ट सिटी करायचं स्वप्न दाखवून निवडून आलेल्यांनी आधी या मुलभूत सुविधा द्याव्यात

 पृथ्वीतलावरील सर्वात मोठ्या पक्षाला "पार्लमेंट ते पालिका" सत्ता मिळूनही शहराचा विकास होणार नसेल आणि जाब विचारल्यास त्यांना ६० वर्षे दिली असं उत्तर मिळणार  असेल तर त्यांना ६० वर्षे घालवली म्हणून जनतेने जशी लाथ घाली तशी तुम्हालाही जनता लाथ घालेल

जय महाराष्ट्र..!