Monday, 23 January 2017



“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख:)

अर्धविराम..!

शतशः धन्यवाद..!

माझ्या फेसबुकवरील शिवसैनिक बंधू-भगिनींनो.मी आपल्याशी आज पुन्हा एकदा लेखाच्या माध्यमातून संवाद साधतोय.याच कारण असं की गेल्या दोन आठवड्यात माझा एकही लेख प्रकाशित झालेला नाही.नुकत्याच संपन्न झालेल्या कृतज्ञता दिनाच्या दिवशीही लेखाच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधला होता.गेल्या तीन वर्षात आठवड्याला एक लेख आणि काही विशेष लेख असे माझे तब्बल दीडशेहून अधिक लेख प्रकाशित झाले.त्या सर्व लेखांना आपला प्रचंड प्रतिसाद मिळाला.लेखाबरोबरच शिवसेनेच्या प्रचारार्थ पेज चालवणे आणि पोस्ट करणे यामार्फत मी शिवसेनेच्या प्रचारातील खारीचा वाटा उचलला.मागील सहा महिन्यांत मात्र वैयक्तिक कारणांमुळे पोस्टच प्रमाण अगदिच कमी झाल.आठवड्यात एक लेख मात्र न चुकता लिहायचो.व्यस्त वेळापत्रक असल्यानं मागील दोन आठवड्यात लेखणी उचलायची संधीच मिळाली नाही.

तीन वर्षे अविरत घुमणारी “वाघगर्जना” आपण वाचत आलात.वाचकांना वाट पाहत ठेवण हे योग्य वाटत नाही.सध्या नियमित लेखनास वेळ मिळत नाही.त्यामुळे मी आज खूप विचारानं एका निर्णयापर्यंत आलो आहे.निर्णय कदाचित अनपेक्षित असेल,न पटणारा किंवा न रुचणारा असेल पण तो अंतिम असेल.सध्या केलेल्या चिंतनात लेख लिहिण्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.त्याचप्रमाणे लेखनासाठी आवश्यक तितका वेळ देण काही अपरिहार्य कारणांमुळे शक्य होणार नसल्याचं चित्र दिसतयं.एखादी गोष्ट करावी तर ती शंभर टक्के समर्पणाने करावी,मनापासून करावी हे माझं स्पष्ट मत आहे.त्यामुळे आजपासून या वाघगर्जनेला अर्धविराम देण्याचा निर्णय मी जाहीर करत आहे.हा निर्णय घेण खूप कठीण होत.आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना हा निर्णय घेण योग्य वाटत नव्हत.दुसरी गोष्ट म्हणजे निर्णय घेतला तरी लागलेली सवय जाणार नाही हेही तितकच खरं.

मी मध्यंतरी व्यंगचित्र काढलेली आणि लेख तर गेली तीन वर्षे लिहितोय.त्यामुळे जरी व्यंगचित्र काढाल नाही किंवा लेख लिहिला नाही तरी विरोधकांना सोलून काढण्याची इच्छा मात्र कायमच असणार.ती इच्छा मारण्याचा मात्र माझा हेतू नाही.जेंव्हा वेळ मिळेल आणि उत्स्फुर्तपणे डरकाळी फुटेल तेंव्हा विरोधकांचा थरकाप उडेल यात तिळमात्र शंका नाही.बोलण्यासारख खूप काही शिल्लक आहे मात्र बोलायला वेळ पुरणार नाही.आपण गेली तीन वर्षे माझ्यावर जो कौतुकाचा वर्षाव करत राहिलात,माझ्या पाठीशी राहिलात त्याबद्दल शतशः धन्यवाद..! शेवटी एक निक्षून सांगू इच्छितो,लेखनाला अर्धविराम देतोय याचा अर्थ शिवसेना सोडली असा नाही.आम्ही शिवसेना सोडण कदापि शक्य नाही.यापुढेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या आणि युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार लढत राहून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच स्वप्न साकार करण्यासाठी झटत राहीन असं वचन मी आपणास देतो.आज शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिन,खरतर निर्धार दिन आहे.त्यांना विनम्र अभिवादन करून आजन्म भगवा सोडणार नाही अशी शपथ घेतो.वाघगर्जनेला हा अर्धविराम आहे पूर्णविराम नाही.त्यामुळे यापुढे कधीच वाघगर्जना घुमणार नाही असंही नाही.तूर्तास मात्र आपणा सर्वाची रजा घेतो.

जय महाराष्ट्र..!

Saturday, 7 January 2017


वाघगर्जना

(माझा आजचा लेख:)

उत्तरप्रदेशात यादवी..!

तुका म्हणे उगी राहावे..

उत्तरप्रदेशात सध्या समाजवादी पार्टीत पिता-पुत्रात सुरु असलेल्या कलहावरून नवीन राजकीय तमाशा घडतोय.“नेताजी” म्हणून ओळखले जाणारे मुलायमसिंह यादव आणि त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्यात पक्षातील सर्वोच्च स्थानासाठी चढाओढ सुरु आहे.उत्तरप्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत.या निवडणुकीसाठी जाहीर होणाऱ्या उमेदवारांवरून सुरु झालेल्या मुलायम-अखिलेश वादाच रुपांतर आता पक्षांतर्गत कलहात झालं असून त्यामुळे उत्तरप्रदेशात यादवी माजली आहे.सुरुवातीला अखिलेश यादवांनी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी परस्पर जाहीर करत आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी देण्याचा मनसुबा साध्य केला.त्यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या मुलायमसिंह यादवांनी थेट मुख्यमंत्री असलेल्या अखिलेश यादवांना पक्षातून निलंबित केलं.त्यानंतर अखिलेश यादवांनी जवळपास २०० आमदार सोबत घेऊन शक्तिप्रदर्शन केलं.एवढच नव्हे तर मुलायमसिंहांच्या परस्पर पक्षाचं अधिवेशन घेत त्यात मुलायमसिंह यादवांना समाजवादी पार्टीच्या मार्गदर्शकपदी नियुक्त केल्याच घोषित केलं.

याच अधिवेशनात अखिलेश यादवांच्या कार्यकर्त्यांनी अखिलेश यादवांची समाजवादी पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड जाहीर केली.मुलायमसिंह यादवांनी हे अधिवेशनच अमान्य केलं असलं तरी या सर्व प्रकारात “बाप से बेटा सवाई” या म्हणीचा प्रत्यय त्यांच्यासह सर्वांनाच आला.सत्तेतील पदांवरून किंवा पक्षातील वर्चस्वावरून होणारे वाद राजकारणाला नवीन नाहीत.यापूर्वीही अशी अनेक उदाहरणे हिंदुस्थानच्या राजकारणात पाहायला मिळाली आहेत.उत्तरप्रदेशात सध्या पाहायला मिळत असलेला पिता-पुत्रातील कलह मात्र वेगळाच आहे.पित्याने मुख्यमंत्री असलेल्या पुत्राची पक्षातून हकालपट्टी केल्याचा आणि हे कमी होत म्हणून पुत्राने पक्षाच्या संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी असलेल्या पित्याला “मार्गदर्शक” घोषित करत स्वतः पक्षाचा ताबा घेण असा प्रकार हिंदुस्थानात यापूर्वी क्वचितच घडला असावा.कोणी याला सत्तासंघर्ष म्हणत तर कोणी पुत्राच राजकीय करिअर सेट करण्यासाठी पित्याने केलेली नौटंकी म्हणत.उत्तरप्रदेशात माजलेल्या या यादवीच कारण कोणतही असो किंवा ही नौटंकी ठरो,पण या प्रकाराने राजकारणाचं घाणेरड रूप समोर आलं हे नक्की.

हा प्रकार जर अखिलेश यादवांच राजकीय भविष्य मजबूत करण्यासाठी आणि घराणेशाही केली म्हणून होणारी टीका टाळण्यासाठी केलेली असेल तर ही आजवरची सर्वात मोठी नौटंकी ठरेल.हा प्रकार जर नौटंकी ठरला नाही आणि पिता-पुत्रातील सत्तासंघर्ष म्हणून समोर आला तर “राजकारणात कोणीच कोणाचं नसत” या म्हणीचा प्रत्यय जगाला येईल.सध्या हा वाद पक्षाच्या निवडणूक चिन्हावर येऊन पोहोचला आहे.मुलायम आणि अखिलेश गटांनी या चिन्हावर दावा ठोकत आपल्याच उमेदवारांना “सायकल” हे पक्षाचं अधिकृत चिन्ह निवडणूक चिन्ह म्हणून मिळाव यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत कमीतकमी ५० मतदारसंघात पिता-पुत्र आमने-सामने उभे ठाकलेले पाहायला मिळण्याची शक्यताही सध्या वर्तवली जात आहे.या वादात यापुढे काय काय होईल ते ब्रम्हदेव सुद्धा सांगू शकणार नाहीत असच सध्याचं चित्र आहे.अशा प्रकरणात पुढे काय होईल याचे अंदाज वर्तवण केवळ अशक्य आहे.कदाचित तर अखिलेश-मुलायमसुद्धा सांगू शकणार नाहीत.निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे या संघर्षाचे गुपित समोर येत जाईल आणि शेवटी निवडणूक निकालाच्या दिवशी याचा समारोप होईल अथवा ठिणगी पडून वणवा भडकेल.तोपर्यंत वाट पाहणं हाच आता इतरांसमोर उरलेला एकमेव पर्याय आहे.तुका म्हणे उगी राहावे,जे जे होईल ते ते पाहावे..!

जय महाराष्ट्र.!