Monday, 3 February 2020

होय.. राज्य आमच्या बापाचं आहे..






हो.. राज्य आमच्या बापाचं आहे..


भाजप नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत "राज्य काय तुझ्या बापाचं आहे का?" अशी टीका केली आहे. वास्तविक पाहता राज्य हे राज्यासाठी झटणारा जो कोणी असेल त्या प्रत्येकाचं असतं याचा शेलार यांना सोयीस्कररीत्या विसर पडलेला दिसतो.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांची सध्या सामना दैनिकात मॅरेथॉन मुलाखत सुरू आहे. यात संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात येऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे आशिष शेलार यांचे पित्त खवळले.

दिल्ली देईल तो आदेश आणि मोदी म्हणतील ती पूर्व दिशा अशी सवय गेली ६ वर्षे अंगवळणी पडलेल्या शेलारांना केंद्रात मंजूर झालेला कायदा राज्यात लागू करणे हे मुख्यमंत्री महोदयांच्या निर्णयावर अवलंबून असते हेदेखील लक्षात घेता आले नाही. मोदी - शहांनी मंजूर करून घेतलेला कायदा राज्यात लागू होणार नाही हे समजताच त्यांनी मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत "राज्य काय तुझ्या बापाचं आहे का?" अशी टीका केली.

आशिष शेलार, आपण एक लक्षात ठेवा.. राज्य आमच्या बापाचं आहे.. कारण आमचा बाप या राज्यासाठी झटला आहे..
हे राज्यं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या महात्म्यांनी घडवलं आहे. हे राज्यं या महात्म्यांच्या वारसा सांगणाऱ्या प्रत्येकाचं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतीने स्वराज्य स्थापन करण्यासाठी लढलेल्या आणि धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांचा तसेच संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या वारसा सांगणाऱ्या प्रत्येकाचं हे राज्य आहे.

हे राज्यं राज्यासाठी कोणत्याही प्रकारचं योगदान देणाऱ्या प्रत्येकाचं आहे. हे राज्यं महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं आहे. हे राज्यं महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांना आपण एकेरी भाषेत राज्य काय तुझ्या बापाचं आहे का असं विचारून तुमची बौद्धिक दिवाळखोरी दाखवली. पण आम्ही असं करणार नाही. आशिष शेलार, हे राज्यं तुमचेही आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून हे राज्यं मोदींचे सुद्धा आहेच.

देशाचे पंतप्रधान म्हणून देशासाठी निर्णय घेणे जसे पंतप्रधान मोदींच्या हातात आहे तसेच महाराष्ट्राच्या हितासाठी कोणते निर्णय महाराष्ट्रात घ्यावेत आणि कोणते कायदे महाराष्ट्रात लागू करावेत यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे हे बहुमताने विराजमान आहेत आणि राज्याच्या हितासाठी निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत.

मोदींनी सांगायचं आणि ते केवळ मोदींनी सांगितलं म्हणून ऐकायचं अशी नंदीबैलासारखी भूमिका महाराष्ट्राने कधीच घेतली नाही. महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा होता, आहे आणि राहील.

त्यामुळे आशिष शेलार, तुम्ही निर्णय घेताना जसं हे राज्य तुमच्या बापाचं असतं, तसचं तो निर्णय लागू न करण्याचा निर्णय घेताना हे राज्यं आमच्याही बापाचं असतं. शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाचे मायबाप म्हणजे मतदार आहेत. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या मतांच्या आधारे निवडून आलेल्या पक्षांनी लोकशाही पद्धतीने बहुमत सिद्ध करून अस्तित्वात आले आहे. त्यांचं मायबाप जनतेसाठी मुख्यमंत्री झटत आहेत. होय.. हे राज्यं आमच्या मायबाप जनतेच आहे. हे राज्यं शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे.. हे राज्यं सर्वांचं आहे.. होय हे राज्यं आमच्या बापाचं आहे.. आणि दिल्लीची पुंगी वाजली की डोलणाऱ्या सापांच नाही.